प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपण (प्रेग्नंसी)

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपण (प्रेग्नंसी)

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

गरोदरपण हे स्त्रीच्या जीवनाचा अमूल्य असा भाग आहे. पुरुष मंडळींना हे भाग्य लाभत नाही. हे स्त्रियांबद्दल असूया असण्याचे कारण असू शकत नाही.
पूर्वापार विचार केला तर मूल होणे हे देवावर अवलंबून असते, असे प्रत्येकाचे मत होते. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर असे आढळून येईल की त्या काळात पाळण्यात लग्ने होत होती. मग लग्नात पुरुष व स्त्री यांच्या वयात फार अंतर दिसून यायचे. वयात आल्यावर मुलीला तिच्या नवर्‍याच्या घरी पाठवायचे. मग लहान वयातच ती मुलगी आई व्हायची.. चार.. पाच.. दहा मुले व्हायची. त्यातली कितीतरी दगावत असत. कधी कधी आईबरोबर तिची मोठी मुलगीसुद्धा गर्भवती राहायची. त्यावेळी बायकांची प्रसूती त्यांच्या घरीच व्हायची. सुईण बाई सर्व तयारी करून घरीच बायकांची सुटका करायची. त्या काळी धनुर्वाताने मरणार्‍या नवजात मुलांची संख्याही मोठी होती.
तेव्हा कुटुंबात मुलेही पुष्कळ असायची. गोव्यात तर पोर्तुगीज राजवटीत जास्त मुले असणार्‍यांना पुरस्कार दिले जायचे. कारण इथले मुले होण्याचे प्रमाण (फर्टिलिटी रेट) युरोपियन देशांपेक्षा जास्त होते. त्या काळात कुटुंब नियोजन नव्हते. तेव्हा आम्ही आमच्या आईवडलांना दोष देता कामा नये!
एकत्र कुटुंब पद्धती असल्याकारणाने एका कुटुंबात कितीतरी छोटी कुटुंबे होती, जी मोठ्या वाड्यात राहायची. मूल झाल्यावर त्याची जोपासना करायला कितीतरी माता असायच्या. तेव्हा कुणाचे मूल कोण सांभाळतंय, कोण त्यास जेवण भरवतंय याचा पत्ताच लागत नव्हता.
आजच्या युगात तर सगळे चित्र बदललेय. नाना प्रकारचे शोध लागलेत. एकत्र कुटुंब पद्धती संपल्यात जमा आहेत. बायका शिकल्या… घराबाहेर पडायला लागल्या… पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करू लागल्या. ज्या गोष्टींचा पुरुषांना त्रास होत होता तोच त्रास आता बायकांना होऊ लागलेला आहे. निसर्गाने स्त्रीला नाजूक बनवलेली आहे. ही नाजूक स्त्री आज जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिच्यावर ताण पडतो. ऑफिसातल्या पुरुषाची वाईट नजरही तिच्यावर पडते. त्यातून ती कशी आपली सुटका करून घेते हे आपण जाणतोच. तो आजचा विषय नाही.
आजचा विषय म्हणजे गरोदरपणा व हे गरोदरपण यायच्या अगोदर स्त्रीने काय करावे? त्याचबरोबर तिच्या नवर्‍याने काय करावे?
‘‘शुद्ध बिजांपोटी फळे रसाळ गोमटी|’’ जर आपले शरीर सुदृढ असेल तरच चांगले, गुटगुटीत मूल आपल्या मांडीवर असू शकेल! त्यासाठी स्त्रीचे आरोग्य चांगले असायला हवे. तसेच स्त्री बनण्याअगोदर प्रत्येक स्त्री ही मुलगी असते. पूर्वीच्या काळात मुलीचे महत्त्व नगण्य होते. आजच्या काळात मुलापेक्षा मुलीला लोक प्राधान्य देतात. कारणे पुष्कळ आहेत. तर जी मुलगी पुढे माता होणार आहे ती आरोग्याने परिपूर्ण असायला हवी.
मुलींमध्ये पंडुरोगाचे (ऍनिमिया) प्रमाण फार आहे. गोव्यात ते प्रमाण ३० ते ३६% आहे. ‘‘मुलींमधील व स्त्रियांमधील पंडुरोग’’ हा वेगळा विषय आहे. त्यावर आपण पुढे विचार करूच. पण एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की मुलींमधील व स्त्रियांमधील पंडुरोगाचे प्रमाण वाढल्याकारणाने नवजात मुलांच्या वजनावर त्याचे परिणाम दिसतात. गोव्यात ‘‘लो बर्थ वेट बेबीज(कमी वजनाची मुले)’’चे प्रमाण ३३% आहे. हासुद्धा एक मोठा विषय आहे- यावर पुढे बोलूच.
तर पंडुरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुली आणि स्त्रिया यांना चांगला लोहयुक्त आहार व फोलिक ऍसिड हे विटामिन देणे गरजेचे आहे. त्यांच्या आहारात ताजी भाजी (सलाद), पालक, हिरवी भाजी देणे गरजेचे आहे. त्याचे रक्त बनत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे त्यांना देणे अत्यंत गरजेचे आहे.
आता लग्नाचे वय हे भविष्यात कुटुंबात जन्म घेणार्‍या बाळाच्या आरोग्यावर प्रभाव करते. भारत सरकारच्या कायद्याप्रमाणे मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असे ठरलेले आहे. लग्नाची नोंदणी गोव्यात चोखपणे पाळली जाते. बाकीच्या राज्यात ते होत नाही. तेव्हा त्या राज्यांमध्ये मुला-मुलीचे लग्नाचे वय बघितले जात नाही.
गोव्यात गोवेकर लोकांत वेगळेपणा जाणवतो. पंडित नेहरू म्हणाले होते, ‘‘गोवा के लोग अजीब हैं|’’ खरेच आम्ही वेगळेच आहोत. पण गोव्यात आजकाल कित्येक लोंढे यायला लागलेत. पूर्वी गोव्यात फक्त महाराष्ट्र व कर्नाटकमधील लोक यायचे. आजकाल आम्ही एवढी प्रगती केलेली आहे की लोंढे रेल्वेने ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, केरळ व आंध्र प्रदेशमधील यायला लागलेत व जेवढी गोवेकरांची संख्या आहे तेवढीच संख्या या बाहेरील राज्यातील लोकांची आहे. तेव्हा आरोग्याबाबतही गोव्याचे हे वेगळेपण नष्ट होण्याच्या मार्गी लागलेले आहे.
गोव्यात लग्नाचे वय वेगवेगळे आहे. आज अशिक्षित लोकांत १८.४ तर शिक्षित लोकांत २४.३ आहे. ख्रिश्‍चनांमध्ये हे वय २८ आहे तर मुस्लीम लोकांत हे वय १८ ते १९ आहे.
मूल होण्याचा दर (फर्टिलिटी रेट) –
अशिक्षित – प्रत्येक कुटुंबात ३.७ % तर
शिक्षित – फक्त १.७ % मुलांचे प्रमाण असते.
* लग्नानंतर पहिल्या २३ महिन्यात मूल होण्याचे प्रमाण – २४%. लग्नानंतर २४ ते ३५ महिन्यात – २८% तर ३६ महिन्यानंतर ते प्रमाण – ४८% आहे.
‘मुलगा हवाय..’ असे म्हणणार्‍यांचे प्रमाण जरी पूर्वी जास्त होते तरीही आज सर्वसामान्यांना पहिले मूल – हा ‘मुलगा’च हवा असतो. मुलाला जास्त जपणे, त्याच्यावर जास्त प्रेम करणे, जास्त दिवस अंगावरचे दूध पाजणे हे चालूच आहे. गोव्यातल्या ग्रामीण भागांत या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतात.
ख्रिश्‍चन लोकांत हे लग्नाचे वय आजकाल ३० च्या वर गेलेले आहे व त्यांना होणार्‍या मुलांची संख्याही आजकाल ‘एकच’ असते. कारण वय वाढल्यानंतर मुले होण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येते.
३०-४०% लोकांना दुसरे मूल नको असते. अर्ध्याअधिक कुटुंबांना कुणीही चालते म्हणजे (मुलगा किंवा मुलगी). पूर्वी मुली-मुलगे कॉलेजात जायचे व पदवी घेतल्यावर नोकरी करायचे व लग्न करायचे. आजकाल मुले पुढे शिकतात, पीएचडी करतात… वयाची २८ वर्षे गाठली तरीही शिकतात. मनाजोगती नोकरी मिळाल्यानंतर दोन वर्षे राहून मगच लग्न करतात. लग्न झाल्यावर जीवनाची मजा चाखायला तीन-चार वर्षे घेतात. तोपर्यंत कुटुंब-नियोजनाची सर्व साधने वापरतात. त्यामुळे तोपर्यंत मूल होण्याचे वय वाढते… मग कितीतरी प्रश्‍नांची मालिका समोर उभी राहते.
गरोदरपणाची तयारी कां करावी?
प्रत्येक स्त्रीने त्यावर विचार करायलाच हवा. पुरुषानेही करावा. पण मुलाला जन्म देणार्‍या स्त्रीला त्याची तयारी ही करावी लागते.
गरोदरपणाचे नियोजन (प्लान प्रेग्नंसी)-
शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्त्रीने तयार होणे अत्यंत गरजेचे आहे…
१) पहिल्याप्रथम – गरोदरपणाअगोदरचा आहार – फोलिक ऍसिड हे विटामिन अत्यंत गरजेचे आहे. याचे प्रमाण कमी झाले तर ‘स्पायना बायफिडा’च्या केसेस नवजात बालकांत आढळतात. तेव्हा स्त्रियांनी हिरव्या भाज्या- पालक (सलाद) बनवून खाव्यात. त्यातून फोलिक ऍसिड मिळत नसेल तर त्याच्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्यानुसार घ्याव्या.
२) ‘जंक फूड’ टाळा – खाण्यात केक, कँडी, कुकीजचा वापर टाळावा.
– सॅच्युरेटेड फॅट्‌स टाळा – चिकन फ्राय, ग्रिल्ड चिकन टाळणे.
३) योग्य आहार घेणे – जेवणात भाज्यांचा, सलादचा वापर करणे. गाजर, पपई, आंबे, जर्दाळूचे सेवन करणे.
– गव्हाच्या पिठाची ब्रेड, हातसडीचे तांदूळ (ब्राऊन राईस), ओट मीलचा वापर करणे.
४) उपवास करू नये.
५) जेवण भरपूर प्रमाणात घेणे. फळे खावीत. मासे खावीत, त्यात भरपूर प्रथिने असतात. मांस व अंड्यांचा जेवणात वापर करावा.
स्त्रियांनी काय करू नये?…
* दारू पिऊ नये. आजकाल स्त्रिया पार्टीमध्ये सहभागी होतात व क्रेझ म्हणून वाईन, बियर व इतर दारू ही चाखतात. आई होणार असाल तर हे सगळं बंद करायला हवं.
* सिगरेट, विडी व इतर तंबाखूचा वापर करणे टाळा.
* ताण टाळा. स्त्रीच्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण असणे योग्य नव्हे! त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.
गरोदरपणाच्या तयारीला लागा. आजच्यापुरते इतकेच पुरे! स्वतःस जपा!
…………………………………………

Leave a Reply