प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर आईची काळजी…

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर आईची काळजी…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी

आता आपण माता झालात! खरेच हे तुम्हा बायकांचे.. स्त्रियांचे भाग्य आहे की तुम्हीच माता- आई होऊ शकता… व ते भाग्य पुरुषांना लाभत नाही!

आता तुम्ही एका अपत्याला जन्म दिलाय.. तेव्हा स्वतःबरोबर तुमच्या तान्हुल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे.
पहिल्यांदा हे बघायला हवे की झालेले अपत्य हे मुलगा आहे की मुलगी? भारतात लिंग निदान करणे हा गुन्हा आहे. तरी देखील लोक लिंग निदान करून घेतात… त्या करता ते डॉक्टर मंडळींना लाच देतात व आजच्या या कलियुगात लाच पत्करणे ही लाचारी समाजात आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते.
हल्लीच एका डॉक्टरला ‘‘लिंग निदान’’ न केल्याबद्दल गोळीने ठार मारले गेले. यावर सरकार मायबापांनी पुढे काय केले हे समजण्यापूर्वी हे मात्र खरे – त्या डॉक्टरांना आपल्या प्राणास मुकावे लागले. जर लिंग निदान झाले तर गर्भपात हा ठरलेला. तेव्हा त्यावर जास्त न बोलता आपण पुढे बोलू.
म्हणजे झालेले अपत्य घरच्यांना आवडणारे होते का? तुम्हाला काय वाटते? तुमच्या पतीदेवांना काय वाटते? यावर पुढे हा प्रश्‍न खरेच महत्त्वाचा आहे. कारण वरकरणी आम्ही कितीही चर्चा, विचारमंथन केले तरी ही आजच्या समाजात आजही प्रत्येकाला मुलगाच हवा. कारण भारतातील पुष्कळ लोक गावात राहतात. शहरी लोकांची विचारसरणी जरी बदललेली असली तरीही जास्त लोकांना अजूनही मुलगाच हवाय.
तेव्हा घरात नवीन आलेले नवजात बालक घरात आनंदाचे वातावरण निर्माण करते व ते वातावरण दूषितही करू शकते! याचा परिणाम त्या जन्मास आलेल्या बालकाच्या मातेवर होऊ शकतो! शहरी भागात आज नवरा-बायको नोकरीनिमित्त वेगळी राहतात.. केव्हा केव्हा बाळंतपणात ती आपल्या गावात जातात.. पण हल्ली हे चित्र वेगळे भासते. त्याच्या घरी त्याचे नातेवाईक येऊन त्याची मदत करतात. जास्त करून मुलीची आई नि त्यांच्याकडे येणारी नातेवाईक ही असते कारण मुलीचे तिच्या आईशी जास्तच जमते..! पण तुम्हा सर्वांना माहीत आहे की जर सासू-सून पुढारलेली असली तर मात्र सासूबाईच सुनेला मदत करते. विचार करा, हल्ली तर दिवसेंदिवस बदल होत चाललेत..
पूर्वी सासूबाई वरचढ होत्या. मग थोडे दिवस सासूचे तर थोडे सुनेचे..! आता तर थोडे दिवस सासूचे, राहिलेले सर्व दिवस सुनेचे!
तर हो सूनबाई तुम्ही आता आई झालात! आई झाल्यावर तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी… व झालेल्या बाळाचीही काळजी घ्यायला हवी.
स्वतःची काळजी कशी घेणार?…
जर बाळंतपण नॉर्मल झाले तर काय कराल?…
* बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव १५ दिवस ते १ महिन्यापर्यंत चालूच असतो. सुरुवातीला रक्तस्राव होतो, मग हळूहळू स्राव पिवळा होतो.. नंतर पांढरा.
* जर टाके द्यावे लागले असतील तर जखमेची काळजी घेणे योग्य ठरेल. त्यातून पू येत असेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. दररोज नॅपकिन बदलणे, घावावर मलम लावणे गरजेचे आहे.
जर सिझेरियन ऑपरेशन झाले असेल तर गुंगी उतरल्यावर पोट दुखणार. मग चालवणार नाही. नीटपणे उठता-बसता येणार नाही व पोटावर मुलाला घेऊन दूध पाजणे कठीणच! त्यासाठी नर्सचा सल्ला घेणे योग्य ठरते.
* बाळंतपणानंतर स्तन गारठतात. त्यात दूध साचते व मग त्याने ‘मिल्क ऍब्सेस’ होऊ शकतो. तेव्हा स्तनाला दाबून त्यातले दूध बाहेर काढणे गरजेचे आहे. मुलाला वरचेवर स्तनाला लावले पाहिजे. स्तनाचे अग्र(निप्पल) मुलाच्या तोंडात दिल्यानंतर मुलाने ते चोखल्यावरच स्तनातून दूध निघते नाहीतर कधी कधी दूध सुकून जाते. नोकरी करणार्‍या स्त्रियांना सरकारमार्फत सुट्टी दिली जाते. या सुट्टीत त्यांनी आपल्या मुलाला अंगावरचे दूध पाजावे. त्याची काळजी घ्यावी. त्याचाच विचार करून सरकारने ही सुविधा स्त्रियांना दिली आहे.
* मूल झाल्यावर मातेच्या झोपेवर फार परिणाम होतो. कधी कधी मातेला झोप पण येत नाही. ७१% स्त्रियांना चांगली झोप येतच नाही. तेव्हा त्यांनी केव्हा झोपावे हे सुद्धा ठरवावे लागते.
* मूल झाल्यावर स्त्रियांचे लक्ष आपल्या बाळांवर जास्तच असते. तेव्हा नवर्‍याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. नवरा जर समजूतदार असला तर ठीक आहे. नाहीतर यामुळेही कुटुंबात तणाव होतो व त्याचा परिणाम त्या मातेवर व बाळावरही होतो. बाळाचा जन्म हे नवरा-बायकोतल्या कलहाचे कारण बनू शकते.
* मूल झाल्यावर पुढे काय?… असा विचार करून कुटुंब नियंत्रणाच्या लोकांचा सल्ला घेणे व ते नियोजन करायला कोणते साधन वापरायला हवे याचाही विचार करणे योग्य ठरेल.
* बाळंतपणानंतर दोन-तीन महिन्यात कामावर हजर होणार्‍या बायकांना मुलांना अंगावर पाजणे बंद करावे लागते. त्याकरिता गोळ्या घेणे योग्य ठरेल. त्याचबरोबर मुलाला डब्याचे दूध सुरू करावे लागणार!
* बाळंतपणात नैसर्गिकरीत्या संप्रेरकांमध्ये बदल होत असतात, तेव्हा स्वतःचा मूड सांभाळणे जड जाते.
* स्वतःच्या आहारावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
* बाळंतपणानंतर व्यायाम करणार ना! सल्ल्यानुसार पोटाचा, पोटरीच्या स्नायूंचा योग्य तो व्यायाम गरजेचा आहे व तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. गावात तो सल्ला घरच्या पोक्त बायका देत असतात. ते ऐकावे. मुलगा झाला की कुटुंबात एवढा आनंद होतो की सुनेला कुठे ठेवू नि कुठे नको, असे होते बघा! मग लाडे लाडे एवढे लाडू खाऊ घालतात की सूनबाई लाडू बनतात. तेव्हा स्वतःच्या प्रकृतीला जपा. सल्ल्यानुसार खा. बाळंतपणानंतर स्त्रिया सुटतात… बेढब होतात… चक्क गलेलठ्ठ बनतात. हे धोक्याचे आहे. तेव्हा खाण्यावर पथ्य पाळणे योग्य ठरेल!
* बाळंतपणात व नंतर स्तनांची योग्य काळजी घ्यायला हवी. स्तनाच्या निप्पलची काळजी घ्यावी. त्यावर घाव पडता कामा नये.
* बाळंतपणानंतर झालेल्या बाळाची काळजी घेण्यातच दिवस निघून जातात. त्यांना आंघोळ घालताना, दूध पाजताना, कपडे बदलताना, … आपली एवढी धावपळ होते सांगता सोय नाही.
म्हणून स्वतःचीही काळजी घ्या. भरपूर खा, भरपूर पाणी प्या. स्वच्छ राहा. राहणार ना! बाळंतपणानंतर स्वतःची काळजी घेतली की पुढे मुलाची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा पुढच्या मंगळवारी भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. आता आपण आई झालात!
……………………………………………….

Leave a Reply