ब्रेकिंग न्यूज़

प्रिय मित्र मयुरेश,

  • डॉ. शिल्पा डुबळे-परब (पर्वरी)

कधी वाटलं नव्हतं अशा परिस्थितीत तुझ्याविषयी काही लिहावं लागेल मला… खरंच खूपच चटका लावून गेलं तुझं.. एक्झिट…! काय लिहू? कुठून सुरुवात करू? समजत नाही. आठवणी फेर धरून नाचताहेत.

खरं तर गोव्याच्या दोन टोकाला असलेल्या गावातून संगीत शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेने तू आणि मी कला अकादमीमध्ये यायचो त्यावेळी तू संगीत महाविद्यालयाचा विद्यार्थी. मी मात्र फॅकल्टीमध्ये शिकले होते. संगीत महाविद्यालय त्याकाळी कला अकादमी, कांपाल येथे काही वर्गांमध्ये भरायचे. त्या काळी तुझ्यासकट काही मंडळी जिवाभावाची झाली ती आजतागायत! तेथेच आपण सर्व संगीताचा अभ्यास करत मोठे झालो. तद्नंतर प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या तरीही मैत्री व जिव्हाळा कायम राहिला. संगीत क्षेत्रात आपण आपापल्या परीने पावले टाकत होतो. तुझाही नावलौकिक ऐकू येत होता. तुला आठवतो तो मोपाचा (पेडणे) कार्यक्रम? त्या दिवशी तू मला शास्त्रीय संगीत मैफलीत प्रथम साथ केली होतीस. उत्तम, दमदार व लयबद्ध अशी साथ! राग होता ‘रागेश्री’. त्यानंतर असंख्य कार्यक्रमांना साथ केलीस – शास्त्रीय असो, नाट्यसंगीत असो वा भावगीत – तीच तन्मयता, तादात्म्यता! तू अनेक मान्यवर दिग्गजांना साथ केलीस आणि तुझ्या तबल्याने तुला प्रत्येकाकडून कौतुकाची थाप मिळवून दिली. सन्मान दिले – सुहृद दिले!

तद्नंतर तू संगीतकाराच्या रूपात भेटलास. मला तुझ्या काही पहिल्या-वहिल्या संगीत दिलेल्या कविता दूरदर्शनसाठी गाण्याचे भाग्य लाभले व त्या चालीही तू सर्वप्रथम कला अकादमीत मला ऐकवून विचारलेला प्रश्‍न- ‘‘कशा वाटल्या?’’ आठवला. त्या चालींसोबतच त्यात कोणत्या रागांची, ठेक्यांची योजना तू केली आहेस हे सांगताना चमकणारे तुझे डोळे आठवून माझे डोळे पाणावले आहेत. माझ्या ‘अव्यक्त सूर’ मधील ओबडधोबड कवितांना तू असा काही स्वरसाज चढवलास की आश्चर्याने थक्क व्हायला होते. एके दिवशी फोन करून म्हणालास, ‘‘तुझे पाचहजार रुपयांचे बक्षीस घेऊन जा. चेक आहे माझ्याकडे’’. मी आश्‍चर्याने विचारले, ‘‘कसले बक्षीस?’’ तर तू मला न सांगताच माझ्या कविता चालीत बांधून तुझ्या विद्यार्थ्यांना शिकवून स्पर्धेत पहिले बक्षीस पटकावून मोकळा! आणि कवीचे बक्षीस देताना स्वतःचे डोके खाजवत तुझ्या ‘खास’ अंदाजात… ‘‘तुझी परमिशन घेवपाक विसल्लो!’’, असे भाबड्या चेहर्‍याने म्हणालास तेव्हा हसू आवरले नाही.
आपण शिवाजी विद्यापीठात एम.ए.(संगीत) केले त्यावेळी गोव्यात एम.ए./एम.पी.ए.(संगीत)ची सोय नव्हती. कित्येकदा कोल्हापूरला विद्यापीठात जातानाचा प्रवास/परीक्षा/मंच प्रदर्शने सोबतच दिली आहेत. खूप खस्ता खाल्ल्या, कष्ट केलेस – तू व तुझ्या सोबत तुझ्या सर्व कुटुंबियांनी. पण एक खूपच वाखाणण्यासारखी गोष्ट तुम्हा सर्वांची.. म्हणजे सदा हसतमुख असणे. तू तर हास्याचा धबधबाच! कुणाची नक्कल, कुठले विनोद, कार्यक्रमांच्या गमतीजमती… सर्वच किस्से तुझ्याकडे खजिन्यासारखे असत. समोरच्याला मनसोक्त हसवणे व स्वतः खळाळून हसण्याची कोण आवड!

तुझा अजून एक मोलाचा गुण म्हणजे कुणालाही पटकन् मदत करणे. या गुणामुळे तू अनेकांच्या मैत्रीस व विश्वासास पात्र ठरला होतास. माझ्या पी.एच.डी. प्रवंधाच्या वेळी मलाही तू पुस्तकं, जुन्या गायकांच्या रेकॉडर्‌‌स इत्यादी उपलब्ध करून देऊन मोलाची मदत केली होतीस. त्याबद्दल थँक्स म्हटलेलेही तुला आवडले नव्हते!
अनेक नाटके, भावगीते, कवितांचे संगीत केलेस. विद्यार्थ्यांना व बिंदीयाला शिकवून ठेवायचास कारण तुझ्या चाली नंतर तूच विसरायचास. ‘‘नवसर्जन चेतना’’ हा राज्य पुरस्कार मिळवलास, अनेक बक्षिसे मिळवलीस.

संगीत महाविद्यालयातच प्राध्यापक म्हणून रुजू झालास. तुझ्या एक एक यश शिखराचे कौतुक सर्वांनाच होते. अलीकडेच एन्.ई.टी. परीक्षाही उत्तीर्ण झाला होतास…! सर्वच छान चालले होते ना रे? सुखाचा संसारही…
मग असं चटका लावणारे एक्झिट का?? तुझ्या संपर्कात सान्निध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या निगर्वी स्वभावाने व आपुलकीने जोडून ठेवलेस. आणि म्हणूनच परवा गोमेकॉमध्ये १४६ वॉर्डसमोर माणसांची रीघ लागली होती. तुझी ती मृत्युशी जीवघेणी झुंज… वेदनामय तडफड पाहिली आणि परमेश्वराला विचारावेसे वाटले…. ‘‘का?’’
गोव्याच्या संगीत क्षेत्रासाठी मोठीच पोकळी तुझ्या अकाली जाण्याने झालीये आणि प्रत्येकाच्याच हृदयात तुझ्या स्मृती निरंतर तेवत राहतील. जिथे कोठे असशील तिथे तुला चिरशांती लाभो. तुझ्या कुटुंबियांच्या या दुःखात आम्ही सर्वच संगीत क्षेत्रातील कलाकार सहभागी आहोत.
तुझी खूपच आठवण येईल मयुरेश!