प्रा. प्राची जोशी यांची कादंबरी-समीक्षा

प्रा. प्राची जोशी यांची कादंबरी-समीक्षा

  •  डॉ. वासुदेव सावंत

प्रा. प्राची जोशी यांच्या समीक्षापर पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पीईएस महाविद्यालय, फर्मागुढी येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, तसेच प्रकाशक स्नेहल तावडे व मराठी समीक्षक नीला पांढरे यांची उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर व विभागप्रमुख दीपक छत्रे असतील.

प्राची जोशी यांनी विविध मराठी कादंबर्‍यांवर लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांचे हस्त-लिखित या लेखांविषयी मी काही लिहावे म्हणून माझ्याकडे दिले तेव्हा मला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. आपल्या एका विद्यार्थिनीने वीसएक मराठी कादंबर्‍यांवर सविस्तर स्वरूपात समीक्षात्मक विवेचन करावे याबद्दल आनंद वाटला. आणि आश्चर्य यासाठी की विद्यार्थीदशा संपवून तीन-चार वर्षे झाली नाहीत एवढ्यातच अशा प्रकारचे लेखन करावे ही गोष्ट कौतुकास्पद अशीच. मराठी साहित्यात एम.ए. करताना प्रत्येक परीक्षेत पहिल्या क्रमांकावर असणार्‍या प्राची जोशी यांचे साहित्यविषयक आकलन आणि जाणीव याची कल्पना होतीच. पण कादंबरीवर त्यांनी केलेले हे लेखन वाचल्यावर त्यांच्या या वाङ्मयीन आकलनाची स्पष्ट प्रचिती आल्याशिवाय राहात नाही.
जोशी यांनी अन्य वाङ्मयप्रकारांवरही काही समीक्षालेख लिहिलेले असले तरी त्यांना कादंबरी या साहित्यप्रकाराची विशेष आवड असावी असे दिसते. समीक्षेसाठी निवडलेल्या कादंबर्‍यांचे वैविध्यही लक्षात घेण्यासारखे आहे. श्याममनोहरांच्या प्रायोगिक कादंबरीपासून ते ‘दुर्दम्य’सारख्या चरित्रात्मक कादंबरीपर्यंत आणि राजन गवस यांच्या ‘चौंडकं’, ‘धिंगाणा’ यांसारख्या ग्रामीण कादंबर्‍यांपासून ते सरस्वतीसन्मान विजेत्या ‘हावठण’ या कोंकणी कादंबरीपर्यंत विविध कादंबर्‍या समीक्षेचा विषय झालेल्या आहेत. मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या कादंबर्‍यांवर जशी समीक्षा लिहिली गेलेली आहे, त्याचप्रमाणे गोमंतकीय लेखकाच्या मराठीत दुर्लक्षित राहिलेल्या एखाद्या कादंबरीचीही दखल घेतलेली आहे. हे समीक्षात्मक लेखन वाचताना समीक्षकाच्या लेखनाचे विविध वैशिष्ट्ये लक्षात येतात. प्रथमत:च लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रूपवादी, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय अशा कोणत्याही एकाच प्रचलित समीक्षापद्धतीचा आधार न घेता प्रत्येक साहित्यकृतीच्या स्वरूपानुसार स्वत:चे स्वतंत्र आकलन मांडण्याचा प्रयत्न समीक्षकाने केलेला आहे. या स्वतंत्र आकलनामागेही कादंबरीसाठी अपरिहार्य अशा सामाजिकता आणि वास्तवता या संकल्पना गृहित धरलेल्या दिसतात. काही कादंबर्‍यांचा तपशीलात जाऊन सखोल विचार केलेला आहे, तर ‘जिणे गंगौघाचे पाणी’ यासारख्या कादंबरीवर संक्षिप्त टिपणच लिहिलेले दिसते. कधी एखाद्या कादंबरीकाराच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा परिचय करून दिला जातो (मधु मंगेश कर्णिक) तर कधी कधी दोन कादंबर्‍यांचा/लेखकांचा (राजन गवस-महाबळेश्वर सैल, ‘दुर्दम्य’ आणि ‘लिलीचे फूल’) तुलनात्मक अभ्यास केला जातो.

कादंबरीची जी दीर्घ परीक्षणे आहेत त्यातून समीक्षकाच्या व्यासंगाचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. त्यादृष्टीने श्याम मनोहर यांच्या उत्सुकतेने मी झोपलो आणि राजन गवस यांच्या ‘चौंडकं’ किंवा जयंत नारळीकरांच्या कादंबर्‍यांची समीक्षणे लक्षणीय आहेत. श्याम मनोहरांच्या कादंबरीवर लिहिताना मराठी कादंबरीचा तिच्या उगमापासून विचार करताना नेमाडे यांनी सांगितलेल्या तिच्या प्रवृत्ती व परंपरा यांचा उल्लेख करून १९४५ नंतरच्या म्हणजे नवसाहित्योत्तर काळातील कादंबरीचे चार कालात्म टप्पे स्वतंत्रपणे सांगितलेले आहेत. श्याम मनोहर यांच्या साहित्याचा परिचय प्रायोगिक लेखन म्हणून करून देऊन त्यांची ‘उत्सुकतेने मी झोपलो’ ही कादंबरी प्रायोगिक स्वरूपाची कशी आहे ते विस्ताराने उलगडून दाखविलेले आहे. विस्कळित वाटणार्‍या घटना, पात्रे, अनुभव, विचार, चिंतन, कथाविषय एकत्र आणून स्वगत, संवाद, नाट्यात्म गद्य अशा भिन्न निवेदनशैलीमुळे आणि जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा चिकित्सात्मक दृष्टिकोन यामुळे ही कादंबरी विषय, रचना आणि भाषा याबाबतीत पारंपरिक कादंबरीहून वेगळी- प्रायोगिक ठरते असे सांगून श्याम मनोहरांनी मराठी कादंबरीला नवे परिमाण दिल्याचे प्रतिपादन केलेले आहे. कादंबरीचे केलेले हे विश्लेषण उत्तम असले तरी त्यासाठी पार्श्वभूमी म्हणून प्रारंभापासून मराठी कादंबरीचा आढावा घेणे हा अनावश्यक विस्तार ठरतो. ‘चौंडकं’चा ग्रामीण कादंबरी म्हणून विचार करताना नेमाडेकृत कादंबरीच्या व्याख्येचा संदर्भ देत ग्रामीण कादंबरी म्हणजे काय हे स्पष्ट करून ‘चौंडकं’चे कथानक, व्यक्तिचित्रे, भाषा इ. घटकांच्या आधारे तपशीलवार परीक्षण केलेले आहे. ग्रामीण कादंबरी म्हणून विचार करताना ग्रामीण भाषा व ग्रामीण समाजातील अंधश्रद्धा यावर समीक्षकांने भर दिलेला आहे. देवदासी स्त्रीची होरपळ नेमकेपणाने व संयमाने मांडणारी ही कादंबरी स्त्रीदु:खाचा नेमका वेध घेते असा योग्य निष्कर्ष काढलेला आहे. पण ‘जोगतीण’ व ‘देवदासी’ यातील समीक्षकाने स्पष्ट केलेला फरक या कादंबरीच्या संदर्भात लागू पडणारा नाही. शिवाय ग्रामीण कादंबरीचे मूल्यमापन अशी काही वेगळी संकत्पना असते का असाही प्रश्‍न पडतो.

समीक्षकाच्या व्यासंगाची प्रचिती त्यांनी केलेल्या जयंत नारळीकरांच्या कादंबर्‍यांच्या समीक्षेतूनही येते. जयंत नारळीकरांच्या विज्ञान-कादंबर्‍यांवर लिहिताना विज्ञानसाहित्याच्या व्याख्येपासून प्रारंभ करून, विज्ञान-कादंबरी म्हणजे काय हे स्पष्ट करून नारळीकरांच्या प्रत्येक कादंबरीचे कथानक, व्यक्ती, कथनशैली इ. घटकांच्या आधारे सविस्तर परिचय करून दिलेला आहे. विज्ञान-कादंबर्‍या लिहिण्यामागील नारळीकरांचा दृष्टिकोन प्रबोधनात्मक असल्याने वैज्ञानिक संकल्पनांचे ते संदर्भासह स्पष्टीकरण देतात. त्यामुळे कथानक अधिक खरेखुरे वाटते, पण त्यामुळे कथानकाच्या ओघवतेपणाला बाधाही येते असा अभिप्राय नोंदवलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती ही वैज्ञानिकाची जबाबदारी या भानातून हे कादंबरीलेखन झालेले असून घटनांतून समस्येचे स्वरूप व तोडगा निश्चित करण्याची वैज्ञानिक पद्धती लेखकाने वापरल्याचा निष्कर्ष अभ्यासकाने काढलेला आहे.

या लेखसंग्रहातील भाऊ पाध्ये यांच्या ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’ या कादंबरीवरचा समीक्षालेखही महत्त्वाचा आहे. साठोत्तरी काळात नवकादंबरी म्हटल्या गेलेल्या मराठीतील या आधुनिकतावादी कादंबरीची समीक्षा करणे हे तरुण समीक्षकाच्या दृष्टीने आव्हानच वाटावे, पण प्राची जोशी यांनी हे आव्हान पेलण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न केलेला आहे. आशय आणि जीवनदृष्टी याबाबतीत भाऊ पाध्ये यांची ही कादंबरी पारंपरिक कादंबरीपेक्षा कशी वेगळी आहे हे या लेखातून दाखवून दिलेले आहे. सच्चेपणाने जगू पाहणार्‍या व्यक्तिमत्त्वाची घुसमट अनिरुद्धच्या माध्यमातून व्यक्त करणारी ही कादंबरी बाह्यवास्तव आणि नायकाची आत्मजाणीव यांच्यातील संघर्ष व्यक्त करते हे सांगताना कादंबरीच्या आशयातून नायकाचे कोणते व्यक्तिमत्त्व उभे राहते हे स्पष्ट केलेले आहे. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील प्रतिष्ठितपणाच्या हव्यासाचे दर्शन घडविणार्‍या पत्नी प्रियंवदेऐवजी दाखवेगिरीच्या जगात सरळपणा जपणार्‍या आयव्हीच्या पाठीशी अनिरुद्ध उभं राहतो. यातून नातेसंबंधांतील दिखाऊपणा, खोटेपणा यामुळे परात्म झालेला, नवी नैतिकता जपणारा नायक लेखकाने कसा उभा केलेला आहे हे सांगितलेले आहे. वास्तवता हा निकष या समीक्षणात वापरलेला आहे. ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’ या कादंबरीचे स्वरूप या लेखात नेमकेपणाने उलगडलेले असले तरी नवनैतिकता ही संकल्पना थोडी स्पष्ट करायला हवी होती असे वाटते. या कादंबरीचे स्ववरूपविवेचन पाहता लेखाच्या शीर्षकात अतिवास्तववादी का म्हटलेले आहे हे स्पष्ट होत नाही.

या संग्रहात ‘निवडुंग’ (-बाळ सप्रे), ‘जिणे गंगौघाचे पाणी’ व ‘मोठी तिची सावली’ (-रेखा मिरजकर), ‘सत्याग्रही’ (-मुक्तेश्वर मराठे), ‘मृत्युंजय’ (-अरुण हेबळेकर), ‘वनराईचा लढा’ (-अनिल परुळेकर) आणि ‘हावठण’ (-महाबळेश्वर सैल) अशा सात गोमंतकीय (लेखकांच्या) कादंबर्‍यांचा ‘तररीटा वेलिणकर’ (-शांता गोखले), ‘कांचनगंगा’ (-माधवी देसाई) अशा स्त्रीलिखित कादंबर्‍यांची समीक्षा समाविष्ट आहे. वर उल्लेखलेल्या गोमंतकीय कादंबर्‍यांपैकी दोन स्त्रीलिखितच आहेत. समीक्षक स्वत: गोमंतकीय असल्याने गोमंतकीय लेखक व साहित्य याविषयी आपलेपणा वाटणे स्वाभाविक आहे. पण या आपलेपणातून गोमंतकीय साहित्याकडे केवळ कौतुकाच्या भावनेतून न पाहता समीक्षकाची अलिप्तता व तटस्थता टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच ‘निवंडुग’ कादंबरीविषयी लिहिताना तिला कादंबरीचा आकारच प्राप्त झालेला नसून ती कादंबरीऐवजी गूढकथा किंवा रहस्यकथा वाटते, अनेक गोष्टी बुद्धीला न पटणार्‍या असून कथानकाबाबत उपस्थित होणारे अनेक प्रश्न अनुउत्तरित राहतात अशा मर्यादा दाखविल्या जातात. गोमंतकीय कादंबरी म्हणजे प्रादेशिक असे गृहीत धरून कादंबरीचे मूल्यमापन करताना प्रादेशिकतेचा निकषही वापरला गेलेला आहे. उदा. मुक्तेश्वर मराठे यांच्या सत्याग्रही कादंबरीचे समीक्षण करताना ‘कादंबरीच्या कथानकापासून ते संवादापर्यंत प्रादेशिकतेची पार्श्वभूमी लाभल्यामुळे कादंबरीच्या परिणामकारकतेत भर पडलेली आहे’ असे मूल्य-मापनात्मक विधान केलेले आहे. प्रादेशिकतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी ही कादंबरी प्रादेशिकतेच्या मर्यादा न ओलांडता बदलत्या समाजवास्तवाचे चित्रण करणे हा तिचा विशेष असल्याचे सांगून केवळ गोमंतकीयच नव्हे तर संपूर्ण मराठी कादंबरीच्या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारी आहे असा तिचा गौरवही केलेला आहे.

गोवा मुक्तिलढ्यावर आधारित ‘जिणे गंगौघाचे पाणी’ या स्वातंत्र्य-सैनिक शारदाबाई सावईकर यांच्यावरील कादंबरीची समीक्षा करताना चरित्रात्मक कादंबरी लिहिणे कसे आव्हानात्मक असते हे सांगून संस्कृती-परंपरा जोपासणार्‍या निसर्ग-संपन्न प्रदेशाबरोबरच शारदाताईंचा जीवनपट शब्दरूपी कॅमेर्‍याने चित्रफितीप्रमाणे वेधकपणे मांडणारी ही कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरी लेखनाचा निश्चितच एक यशस्वी प्रयत्न आहे असे समीक्षकाला वाटते. रेखा मिरजकर यांच्याच ‘मोठी तिची सावली’ या कादंबरीचा आशय स्त्रीने सरोगेट मदर होणे हा असल्याने या कादंबरीत प्रदेशचित्रणाला फारसा वाव नाही, त्यामुळे स्त्रीच्या मानसिक धैर्यावर, तिच्या अस्तित्वावर भाष्य करणारी कादंबरी म्हणून कादंबरीचा फक्त सारांशच सांगितला जातो. अरुण हेबळेकर आणि अनिल परूळेकर या गोमंतकीय लेखकांच्या ‘मृत्युंजय’ व ‘वनराईचा लढा’ या कादंबर्‍यांबद्दलचे समीक्षकाचे आकलन फारसे योग्य नसल्याचे दिसते. वैज्ञानिक वातावरण असले तरी ‘मृत्युंजय’ही सामाजिक-राजकीय कादंबरी वाटते हे म्हणणे तितकेसे बरोबर नसून आज अस्तित्वात नसणार्‍या एका वैज्ञानिक शोधाभोवती केंद्रित झालेल्या या कादंबरीचा विज्ञान-कादंबरी म्हणूनच विचार करणे आवश्यक होते. अनिल परूळेकर यांची ‘वनराईचा लढा’ ही कादंबरी समीक्षकाला वाटते त्याप्रमाणे पर्यावरण-प्रदूषणविरोधी लढ्याबद्दलची नसून वास्तविक अशा पर्यावरणवादी चळवळी व राजकारण गोव्यासारख्या राज्याला आवश्यक असणार्‍या उद्योगप्रकल्पासाठी कसे विनाशकारी ठरते हे लेखकाला दाखवायचे आहे.

जागतिकीकरणाच्या प्रभावातून झालेली कुंभार समाजाची पडझड दाखविणारी १९९० नंतरची श्रेष्ठ गोमंतकीय कलाकृती म्हणून महाबळेश्वर सैल यांच्या ‘हांवठण’ या सरस्वती-सन्मान विजेत्या कादंबरीवर लिहिलेला विस्तृत समीक्षालेख विशेष दखल घेण्याजोगा वाटतो. ही कादंबरी समीक्षकाच्या आवडीची असावीशी वाटते, त्यामुळे तिच्या वाङ्मयीन गुणवत्तेचे भरभरून कौतुक केलेले आहे आणि ते अस्थानी वाटत नाही. या कादंबरीची समीक्षा समाजशास्त्रीय अंगाने झालेली आहे. त्यामुळे कादंबरीत दिसणारे कुंभार समाजातले सामाजिक स्तरभेद, त्यांची भाषा, त्यांचे धार्मिक-सांस्कृतिक विधी, सण-समारंभ, त्यांची लोकसंस्कृती, लोकगीते, लोकोक्ती, त्यांच्या अंधश्रद्धा इ. कादंबरीतून कसे प्रकट झालेले आहे याची समीक्षकाने तपशीलवार नोंद घेतलेली आहे. गावतळ्यातल्या ज्या चिकणमातीवर कुंभार समाजाचा चरितार्थ चालतो त्या तळ्याला बांध घालून पाणी अडविण्याच्या सरकारी निर्णयामुळे कुंभार समाज हलाखीच्या स्थितीत येऊन शोषित, वंचिताचे जिणे कसा जगू लागतो, ही करुण कहाणी सांगणार्‍या या कादंबरीचे विवेचन करताना समीक्षकाने प्रथम जागतिकीकरण व त्याचा समाजावर परिणाम या मुद्द्याचा विचार केलेला आहे. तो योग्यच आहे. पण तळ्याचे पाणी अडविणे याचा जागतिकीकरणाशी काय संबंध हे स्पष्ट होत नाही.
स्त्रीलिखित कादंबर्‍यांपैकी शांता गोखले यांच्या ‘रीटा वेलिणकर’ या कादंबरीची स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी म्हणून समीक्षा केलेली आहे. कादंबरी म्हणून तशी लहान असली तरी आशयदृष्ट्या महत्त्वाची असल्याने तिच्यावरील लेख विस्तृत असणे स्वाभाविकच आहे. प्रारंभी स्त्रीवादाचा थोडक्यात परिचय करून देऊन कथानक आणि व्यक्तिरेखा यांच्या आधारे कादंबरीचे विश्लेषण केलेले आहे. यातील स्त्री-व्यक्तिरेखांविषयी तपशीलवार लिहिताना पुरुषी वर्चस्व नाकारून लौकिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी झगडणार्‍या तीन पिढ्यातील स्त्रियांची ही कथा असल्याचे दाखवून दिलेले आहे.

कादंबरीचा तुलनात्मक अभ्यास करणार्‍या दोन लेखांपैकी एक लेख गंगाधर गाडगीळ यांच्या ‘दुर्दम्य’ आणि ‘लिलीचे फूल’ या दोन कादंबर्‍यांची तुलना करणारा आहे. तर ‘धिंगाणा’ आणि ‘अरण्यकांड’ या मराठी आणि कोंकणी कादंबरीचा अभ्यास तौलनिक साहित्याभ्यासाच्या शिस्तीला धरून केलेला आहे. त्यासाठी तौलनिक साहित्याभ्यासाची संकल्पना स्पष्ट करून दोन्ही कादंबर्‍यांत चित्रित झालेला समाज-समूह कोणता हे सांगून कथानक, पात्र, संघर्ष, भाषा, संवाद, निवेदनशैली इ. घटकांच्या आधारे दोन्ही कादंबर्‍यांतील साम्यभेद तपशीलात जाऊन मुद्देसूदपणे स्पष्ट केलेले आहेत. शेवटी प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून दोन्ही कादंबर्‍या समाजाचे वास्तवचित्रण करणार्‍या यशस्वी कादंबर्‍या आहेत असा रास्त निष्कर्ष समीक्षकांने काढलेला आहे.

याशिवाय ह. मो. मराठे यांच्या गाजलेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीची निराशाग्रस्त नायकाची शोकांतिका म्हणून केलेली व त्यांच्याच मार्केट या बाजारू जगाच्या व्यवहारीपणावर भाष्य करणार्‍या कादंबरीची केलेली समीक्षा या महत्त्वाच्या आहेत. पण अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीची समीक्षा मला दखलपात्र वाटते. कारण आजच्या तरुण पिढीच्या समीक्षकाने अण्णा भाऊंच्या कादंबरीबद्दल आस्था दाखवणे महत्त्वाचे आहे. दलित-शोषित समाजापैकी मातंग समाजाला केंद्रस्थानी ठेवणारी नायकप्रधान कादंबरी म्हणून ‘फकिरा’ची समीक्षा करताना तिच्यातील तरल काव्यमय भाषेची सोदाहरण चर्चा केलेली आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील लेख हा समीक्षालेख म्हणण्यापेक्षा ‘लेखक-जीवन आणि कार्य’ अशा स्वरूपाचा आहे. कर्णिकांच्या समग्र साहित्याची सूची आणि त्यांना मिळालेल्या सर्व सन्मानांची नोंद यामुळे संदर्भ म्हणून तो महत्त्वाचा ठरणारा आहे.

प्राची जोशी यांचा हा लेखसंग्रह वाचल्यावर त्यांची साहित्यविषयक- विशेषत: कादंबरीविषयक जाणीव प्रगल्भ असल्याचा प्रत्यय येतो. त्यांची ही जाणीव साठोत्तरी काळातल्या समीक्षाव्यूहात तयार झालेली आहे. त्यामुळे कादंबरीची समीक्षा करताना मराठीत रूढ झालेल्या पारंपरिक कलावादी दृष्टीचा अवलंब न करता सामाजिकता, वास्तवता, नैतिकता, प्रदीर्घता, प्रादेशिकता अशा निकषांचा वापर करतात. पण नेमाडे यांच्या कादंबरीविषयक व्याख्येचा आधार घेऊनही (लेखकाची) नैतिकता या निकषाचा कमी प्रमाणातच वापर केलेला आहे. श्याम मनोहरांच्या प्रायोगिक कादंबरीचे त्या जसे समर्थपणे आकलन करतात त्याचप्रमाणे नारळीकरांच्या विज्ञान-कादंबर्‍यांचे रूपही विस्ताराने उलगडून दाखवतात. ग्रामीण-प्रादेशिक कादंबर्‍यांविषयी समीक्षकाला विशेष आस्था असल्याचे दिसते. पण ग्रामीणता व प्रादेशिकता या स्वरूपवर्णनात्मक संकल्पना मूल्यमापनाचे अंतिम निकष म्हणून कितपत मान्य करता येतील अशी शंका वाटते. कादंबरीतील स्त्रीचित्रणाचा विचार करताना समीक्षकाने अगदी कट्टर स्त्रीवादी नसला तरी स्त्रीविषयक पुरोगामी आणि स्त्री-स्वातंत्र्यवादी दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसते. कादंबरी-समीक्षा म्हणून ‘उत्सुकतेने मी झोपलो’, ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘हांवठण’, ‘चौंडकं’, ‘धिंगाणा’ व ‘अरण्यकांड’, ‘रीटा वेलिणकर’, जयंत नारळीकरांच्या कादंबर्‍यायांवरील समीक्षालेख उत्तम आहेत. पण समीक्षक वास्तववादाचा पुरस्कर्ता असूनही ‘वनराईचा लढा’ या वास्तव आशयद्रव्य तपशीलाने मांडणार्‍या कादंबरीवरील लेख फार त्रोटक वाटतो.

समीक्षकाचा व्यासंग व अभ्यास व्यापक असल्याचा उल्लेख वर केलेलाच आहे. लेखाला आवश्यक असणारी पार्श्वभूमी (लेखकाची माहिती वगैरे) व संदर्भ सांगणे, कादंबरीच्या स्वरूपाबद्दलची आपली कल्पना तिची व्याख्या वगैरे देऊन स्पष्ट करणे, कादंबरीच्या आशयाशी संबंधित ग्रामीण-प्रादेशिक साहित्य, जागतिकीकरण, मिथक, स्त्रीवाद इ. संकल्पना स्पष्ट करणे यातून समीक्षकाच्या व्यासंगाची कल्पना येते. बहुतांश लेखनात मुद्देसूद मांडणी, प्रमुख मुद्दे व उपमुद्दे यांसाठी शीर्षक-उपशीर्षके वापरणे, क्रमांक, कोष्टके, ग्राफिक्स यांचा वापर करणे, लेखाअंती निष्कर्ष मांडणे ही लेखनाची शिस्त पाळलेली दिसते. प्रत्येक समीक्षालेखाला दिलेली ग्रामीण समाजदर्शन घडविणारी चौंडकं, स्त्री-अस्तित्वाचा आत्मशोध घेणारी रीटा वेलिणकर, मांग समाजाचा जिवंत हुंकार फकिरा अशी शीर्षके कादंबरीचे आशयस्वरूप नेमकेपणाने व्यक्त करणारी आहेत.

एकूणच जोशी यांचे लेखन शिस्तशीर आहे. शेवटी, प्राची जोशी यांचे अभिनंदन करताना त्यांच्या या लेखसंग्रहामुळे मराठी कादंबरीच्या समीक्षेत मोलाची भर पडलेली असून मराठी असून मराठी समीक्षाक्षेत्रात एका नव्या दमाच्या तरुणसमीक्षकाने दमदार पाऊल टाकलेले आहे असे निश्चित म्हणता येईल.