प्रादेशिक भाषांतून बँकपरीक्षा निर्णयाचे ‘जीएफ’कडून स्वागत

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भरती परीक्षा प्रादेशिक भाषांतून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वागत केले आहे. स्पर्धा परीक्षा स्थानिक (प्रादेशिक) भाषांतूनही घेण्यात याव्यात अशी गोवा फॉरवर्ड पक्षाने मागणी केली होती. ती पूर्ण झाली असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांतून घेण्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून त्यासाठी त्यांचे आभारही मानत असल्याचे कामत यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.
सीतारामन यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे बँकांच्या भरतीसाठीच्या परीक्षेत स्पर्धेला वाव मिळेल, असा विश्‍वासही कामत यांनी व्यक्त केला आहे. जे विद्यार्थी हिंदी अथवा इंग्रजी भाषेतून ही परीक्षा देऊ शकत नाहीत त्यांना याचा फायदा मिळणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

गोव्यातील विद्यार्थी ही परीक्षा कोकणी भाषेतून देऊ शकतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मराठी, मल्याळम, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू ह्या १३ भाषांतून आता ही परीक्षा देता येणार आहे.