प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज ः उपराष्ट्रपती

केंद्र सरकारने नव्याने दुरुस्त केलेला नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा (सीएए) सखोल अभ्यास न करताच काही जणांकडून कायद्यातील दुरुस्तीला केला जाणारा विरोध दुर्दैवी आहे. सीएए दुरुस्तीला विरोध करणार्‍यांनी प्रथम सीएए दुरुस्तीचा सखोल अभ्यास करून त्यानंतर आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे. मतप्रदर्शन करणे हा अधिकार असला तरी चुकीच्या माहितीचा फैलाव करणे अयोग्य आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे काल केले. मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज आहे. मातृभाषेतील शिक्षणातून पारंपरिक कला, वारसा, संस्कृती, भाषेचे रक्षण शक्य आहे. मातृभाषेतून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.
येथील गोवा कला अकादमीच्या आवारात आयोजित गोवा विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीदान सोहळ्यात उपराष्ट्रपती नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल सत्य पाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुलसचिव प्रा. वरुण सहानी, रजिस्ट्रार वाय.वी. रेड्डी यांची उपस्थिती होती.

नायडू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणी भाषेतून केल्याने उपस्थितांकडून चांगली दाद मिळाली. सोशल मिडिया हा सुद्धा चिंतेचा विषय बनत चालला आहे. सोशल मिडियावर अचूक माहिती मिळणे कठीण बनत चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी अचूक माहिती मिळविण्यावर भर दिला पाहिजे, असेही नायडू यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नये. सार्वजनिक जीवनासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा आणि बांधीलकीची आवश्यकता आहे.

जीवनात काहीही साध्य करणे शक्य आहे, परंतु त्यासाठी आपण निवडलेला मार्ग एक नीतिमान असला पाहिजे. अल्प मुदतीच्या किंवा स्वार्थी ङ्गायद्यासाठी कधीही मोहात पडू नका. चिकाटी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, संयम आणि आत्मविश्वास आपल्याला आपली स्वप्ने साध्य करण्यास मदत करू शकतो.