प्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा भरतीची प्रक्रिया आठवड्याभरात

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा रिक्त असून ही पदे भरण्यासाठीचे काम आठवडाभरात सुरु होणार असल्याचे शिक्षण मंत्री ह्या नात्याने बोलताना काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला काल अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

सांगे मतदारसंघातील प्राथमिक शाळा, विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत याची शिक्षण खात्याला जाणीव आहे काय, असा प्रश्‍न गांवकर यांनी विचारला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना राज्यात प्राथमिक शिक्षकांची १८२ पदे रिक्त असल्याची माहिती सावंत यांनी दिली व ही पदे भरण्यासाठीची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार असल्याचे सांगितले. माजी सैनिक, क्रीडापटू, अनुसूचित जाती ह्या आरक्षित गटांसाठी किती पदे आहेत, ती माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक, तसेच ‘पॅरा’ शिक्षकही कामावर आहेत. मात्र, हे शिक्षक आठवड्यातून तीनच दिवस शाळेत येत असतात, असे सावंत यांनी सांगितले. काही प्राथमिक शिक्षकांना बढत्या देऊन हायस्कूलमध्ये पाठवण्यात येईल. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची पदेही भरण्यात येतील व त्यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.