ब्रेकिंग न्यूज़

प्रसूतीविषयक लाभ अधिनियम

  • सौ. माधवी भडंग

प्रसूतीचे हे नियम कारखाना, खाण किंवा मळा या स्वरूपाच्या प्रत्येक आस्थापनाला, शासनाच्या मालकीच्या अथवा खाजगी अशा कोणत्याही आस्थापनात तसेच कलम २ मध्ये वर्णन केलेल्या सर्व आस्थापनांना लागू आहे.
शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना ‘प्रसूतीविषयक लाभ’ हे त्यांच्या राज्याचे नियम लागू पडतात.

‘प्रियंका’ एका कारखान्यात कर्मचारी होती. तिला पहिल्यांदाच दिवस गेले होते. घरात सर्वत्र आनंदीआनंद होता. प्रियंका मात्र रजा मिळणार की नाही या ताणात होती. शेवटी तिनं तिच्या जवळच्या मैत्रिणीला रजेबाबत विचारलं. ती नुकतीच या सर्व अनुभवातून गेली होती. खरं म्हणजे हा कायदा १९६१ साली पारित करण्यात आला. परंतु वेळोवेळी या कायद्यात सुधारणा झालेली आढळते. हा कायदा विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांसाठी आहे. ‘प्रसूतीविषयक लाभ’ याचा अर्थ स्त्रीला मिळणारी सुटी किंवा रजा आणि प्रसूतीसाठी मिळणारी रक्कम. या कायद्यात प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरची रजा सांगितली आहे. प्रियंकाची मैत्रीण म्हणाली, ‘‘मिळणारी रजा केवळ प्रसूतीसाठीच असते असे नाही तर नैसर्गिकरीत्या गर्भपात झाला असल्यास, डॉ.च्या सल्ल्यानुसार गर्भपात करवून घ्यावा लागला असेल तरीही रजा मंजूर होते.’’ किंवा ‘‘दुर्दैवानं बाळ जन्मतःच मृत आहे असं घोषित झालं तरीही कायद्यानं सुटी मिळते.’’ थोडक्यात ‘प्रसूती’ याचा अर्थ ‘बालकाला जन्म देणे’ हा तर आहेच, यासोबतच गर्भपात आणि मृत बालक जन्माला येणं इ. गोष्टी या कायद्यात अंतर्भूत होतात. सर्व गोष्टींचा ऊहापोह झाल्यानंतर प्रियंकानं बाळाची चाहूल खर्‍या अर्थानं एन्जॉय केली.

‘अनिकेता’ला दुसर्‍यांदा दिवस केले होते. गरोदरपणात तिची तब्येत नाजूक झाली होती. डॉ.नी तिला काळजी घेण्यास सांगितलं होतं. अचानक तिचा त्रास वाढला आणि तिला गर्भपात करवून घ्यावा लागला. ‘कोणताही नियोक्ता (नियोक्ता म्हणजे कामावर नियोजन करणारी व्यक्ती) कोणत्याही आस्थापनामध्ये जाणून बुजून कोणत्याही स्त्रीला प्रसूती किंवा गर्भपात झाल्यादिवसापासून पुढील ६ आठवड्यांपर्यंत कामावर ठेवू शकणार नाही.’ याचा अर्थ तिला काम देता येणार नाही. त्यामुळे अनिकेताला ६ आठवड्यांची रजा मिळाली. तिनं या सक्तीच्या सुटीत स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेऊन, पूर्ववत कामावर रुजू होऊन, जोमानं कामाला सुरुवात केली.

गंगुबाई एका मळ्यात माल वाहण्याचं अतिशय काबाडकष्टाचं काम करीत होती. पहिले काही महिने ती सहजरीत्या काम करू शकत होती. परंतु गर्भाची वाढ जसजशी होऊ लागली तसतशी कष्टाची कामे झेपेनाशी झालीत. अशावेळी ‘‘कोणत्याही गर्भवती स्त्रीने, जे काम काबाडकष्टाच्या स्वरूपाचे आहे अथवा ज्यामध्ये तासन्‌तास उभे रहावे लागते, ज्यामुळे तिच्या गर्भाला, गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, गर्भपात घडण्याची शक्यता आहे. तिच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. अशावेळी स्त्रीने कामाच्या ठिकाणी विनंती केली असता तिचा नियोक्ता तिला हलकेफुलके काम देऊ शकतो किंवा काम देणार नाही’’. तिला ६ आठवड्यांऐवजी १० आठवड्यांची रजा असते. गंगुबाईला काम झेपत नाही असं लक्षात येताच नियमानुसार अर्ज करून रजा घेतली. पोटातल्या बाळाची, स्वतःची उत्तम देखभाल करून बाळाला जन्माला घातले.

दिवस गेलेल्या स्त्रीचा कामावरती रजेचा कालावधी एकूण १२ आठवड्यांचा असतो. परंतु ही रजा विभागून देण्यात येते. प्रसूतिपूर्व ६ आठवडे आणि प्रसूतीनंतर ६ आठवडे – अशी रजा घेता येते. खरं म्हणजे, प्रसूतीविषयक लाभ दोन प्रकारचे असतात- १) रजा २) पैशांच्या स्वरूपात. आत्तापर्यंत आपण ढोबळमानानं रजेचा अंदाज घेतला. आता पैशांच्या स्वरूपात मिळणारा लाभ बघू या.
प्रियंकाला रजेची कल्पना मिळाली होतीच. कारखान्यात किंवा इतरत्र सलग ८० दिवस काम करण्याचा अनुभव ज्या स्त्रीला आहे त्या स्त्रीला ३ दिवसांचा पगारदेखील मिळणार होता- १. प्रसूतीचा आदला दिवस, २. प्रसूतीचा दिवस आणि ३. प्रसूतीनंतरचा दिवस. प्रियंकासाठी हा सुखद धक्का होता.

‘रत्ना’ आपल्या बाळाला जन्म देताना मृत्यू पावली. घरात दुःखाचे सावट होते. परंतु बाळ मात्र सुखरूप होते. ती एका खाणीत कामावर होती. डॉ.नी तिची जगण्याची आशा सोडल्यानंतर, तिनं लगेच प्रसूतीविषयक लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या वडिलांना नामोनिर्देशित केलं होतं. थोडक्यात, खाणीतून मिळणारी रक्कम ही वडलांजवळ देण्यात आली. बाळंतपणात अचानक स्त्रीचा मृत्यू झाल्यास, प्रसूतीविषयक मिळणारा लाभ तिच्या वैध प्रतिनिधीला दिला जातो म्हणजे पती किंवा तिने सांगितलेली व्यक्ती.

अनेक स्त्रिया दोन मुलांनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करतात. आपण बघतो. अशावेळी त्यांना पगारी २ आठवड्यांची सुटी मिळते.
प्रियंकाने आपल्या गोंडस बाळाला जन्म दिला. तिची एकूण १२ आठवड्यांची सुटी संपली. ज्यावेळी ती कामावर रुजू झाली त्यावेळी तिचं बाळ अवघं दीड महिन्यांचं होतं. परंतु नियमानुसार कामावरती रुजू होणे भाग होते. अशावेळी, बाळाला जन्म दिलेली स्त्री अशा प्रसूतीनंतर कामावर परत येईल, त्या प्रत्येक स्त्रीला तिचे मूल १५ महिन्यांचे होईपर्यंत स्तनपानासाठी तिच्या रोजच्या कामाच्या वेळात, तिला मिळणार्‍या विश्रांतीच्या मध्यंतराशिवाय विहित आवधीच्या आणखी दोन सुट्‌ट्या देण्यात येतील. थोडक्यात, बाळ १५ महिन्यांचं होईपर्यंत तिला दिवसातून ३ सुट्‌ट्या देण्यात येतील. प्रियंकाला बाळाच्या जन्माच्या निमित्तानं अनेक नवीन गोष्टी कळल्या. त्यामुळे लहानग्या बाळाला सोडताना त्रास झाला नाही. घर आणि कारखाना ती उत्तमरीत्या सांभाळू शकत होती.

‘मंजूषा’ गोंडस बाळाचा आनंद आणि सुटी उपभोगत असताना तिला कार्यालयातून नोटीस आली की ‘तिला काढून टाकण्यात आलं आहे’. ती जरा गोंधळात पडली. ‘‘एखादी स्त्री या नियमाच्या उपबंधानुसार कामावर अनुपस्थित राहिली तेव्हा, नियोक्ताने अशा अनुपस्थितीच्या काळात किंवा त्या कारणावरून तिला कार्यमुक्त करणे, कामावरून काढून टाकण्याची नोटीस देणे’’. थोेडक्यात गरोदरपणाच्या निमित्तानं अनुपस्थित असण्याच्या काळात कामावरून काढून टाकणे. परंतु कायद्याने प्रसूतीनंतर सहा आठवड्यांच्या तिच्या सुटीत नोकरीतून तिला बरखास्त करता येत नाही. हा नियम मंजूषाने कामावरती दाखविल्याने तिला परत कामावर रुजू होण्याची परवानगी दिल्या गेली.

करिष्माने गरोदरपणात कामावरून मिळालेली सुटी घेतली परंतु तिची तब्येत ठणठणीत होती. मिळालेल्या सुटीचा फायदा करून घ्यावा ही डाळ तिच्या डोक्यात शिजली. थोडक्यात रजेचा उपयोग इतरत्र नोकरी करून पैसा कमावणे हा उद्देश होता. अशावेळी स्त्रीने दुसरीकडे काम केले तर, ती अशा कालावधीसंबंधीच्या प्रसूतीविषयक लाभावरील हक्क गमावेल.
प्रसूतीचे हे नियम कारखाना, खाण किंवा मळा या स्वरूपाच्या प्रत्येक आस्थापनाला, शासनाच्या मालकीच्या अथवा खाजगी अशा कोणत्याही आस्थापनात तसेच कलम २ मध्ये वर्णन केलेल्या सर्व आस्थापनांना लागू आहे.
शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना ‘प्रसूतीविषयक लाभ’ हे त्यांच्या राज्याचे नियम लागू पडतात.