ब्रेकिंग न्यूज़

प्रवेश तर घेतला, पण नियोजन महत्त्वाचे!

  •  प्रा.रामदास केळकर

एखादी गोष्ट मिळविण्यासाठी तुमच्या मनात इच्छा उत्पन्न होते, पण ती इच्छा उद्दात्त असावी ह्यासाठी नियोजनावर भर द्या आणि त्याला कृतीची जोड द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

आपल्या नियोजनात शारीरिक व्यायाम, योग, प्राणायामाचा समावेश, नियमित वृत्तपत्रातील अग्रलेख, लेखांचे वाचन, ज्ञान वाढविण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, तज्ञ लोकांची चर्चा ऐकण्यासाठी टीव्हीचा कार्यक्रम बघणे यांचाही अंतर्भाव असायला हवा.

स्व-विकासावर आधारित नामवंत लेखकांची कित्येक पुस्तके उपलब्ध आहेत, विशेषतः इंग्रजी. उदा. डेल कार्नेजी, शिव खेडा, स्टीफन कॉव्ही, जोसेफ मर्फी या काही लेखकांचे मराठी अनुवादही उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या पुस्तक वाचनाने मनाला उभारी देण्याचे काम होते.

एव्हाना शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनी आपला पुढील प्रवेश नक्की केलेला असणार (पुरवणी परीक्षा देणार्‍यांना अजूनही निकाल झाल्यानंतर प्रवेश मिळेल). १०वी असो की १२वी किंवा कॉलेज प्रवेश घेणारे या सर्वांसाठी प्रवेशानंतर काही गोष्टी समान असतात. त्यामुळे या सर्व घटकांना पूरक ठरेल असे मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे. विशेष म्हणजे हा विषय कालातीत आहे कारण अभ्यासक्रम कुठलाही असला तरी परिश्रम काही चुकणार नाही, अभ्यास टाळू शकत नाही. अनेकदा १०वीनंतर आपण घेतलेली बाजू आपल्याला जमणे कठीण असा अनुभव येतो. तेव्हा अशी अडचण एखाद्या विद्यार्थ्याला येईल तर त्याने एकतर समुपदेशकाकडे जाऊन सल्ला घ्यावा, शिक्षकांशी बोलावे आणि ह्यातूनही मार्ग न मिळाला तर दुसर्‍या शाखेचा विचार करावा. खास करून विज्ञान शाखेत जाणार्‍यांनी प्रवेश घेण्यापूर्वी चौकशी करून, शाखेतील विषयांची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, कारण आपल्या करिअरची ती सुरुवात असते.

यानंतर प्रवेशाचे एकदा नक्की झाले की ज्या शाखेतून आपण शिक्षण घेणार आहोत त्यात पुढे मी काय करणार? हे ध्येय पक्के करावे आणि ११वीतूनच त्या कामाला लागावे. ह्यासाठी आवश्यक आहे ते अभ्यासाचे नियोजन. या नियोजनात नियमित अभ्यासाबरोबर अतिरिक्त माहिती, ज्ञान मिळविण्यासाठी काही वेळ राखून ठेवावा. यातच तुम्ही करिअरचा विचार सुरू करणार आहात. इथेच तुमचा पाया तुम्हाला भक्कम करायचा आहे. जसे ६वीसाठी ५वीतील अभ्यास चांगला होणे आवश्यक असते कारण तो वर्ग त्याचा पाया असतो. तसेच पुढे महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पाया हा ११वीत होत असतो. उदा. तुम्ही कला अर्थात ह्युमॅनिटीज शाखेचा अभ्यास करताना समजा तुम्ही नागरी सेवा परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा. याची माहिती देणारे संकेतस्थळ उपलब्ध आहे. शिवाय वृत्तपत्रातून, मासिकातून याची वेळोवेळी माहिती दिलेली असते. सोमवार ते शनिवार असे हे नियोजन असावे कारण तेवढे विषय तुम्ही शिकत असता. रविवारी तुम्ही राहिलेल्या अभ्यासासाठी ठेवायचा आहे. अनेकदा घरी विद्यार्थ्याला वाटते की आपल्याला सर्व कळते पण परीक्षेच्या वेळी तो मार खातो. ही स्थिती येण्याचे कारण असते ते म्हणजे सरावाचा अभाव. नियमित अभ्यास, त्याची उजळणी, खेळासाठी, करमणुकीसाठी वेळ, पुरेशी विश्रांती हे तुमच्या नियोजनात कसे येईल… याचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला आत्मविश्वास येऊ लागेल, लक्ष केंद्रित करणे तुम्हाला जमू शकेल.

‘सेव्हन हॅबिट्स’ या प्रसिद्ध पुस्तकात ‘बिगीन विथ एंड इन माईंड’, अशी एक सवय सांगितली आहे. आपल्या संत साहित्यात याच्याजवळ जाणारी गोष्ट प्रसिद्ध आहे. कोण एक व्यापारी एका संतांकडे येतो व आपल्याला शांतपणे झोप येत नाही, समाधान नाही अशी तक्रार करतो. तेव्हा ते संत त्याला ‘अरे तू तर जास्तीत जास्त सप्ताहभर जगशील’, असे सांगून त्याची झोपच उडवतो. पण तो व्यापारी स्वतःला सावरतो आणि जर माझे जगण्याचे अवघेंच दिवस राहिले आहेत तर ते परोपकार करून, दान-धर्म करून, लोकांशी चांगले बोलून का घालवू नये? … असा विचार करून ते आपली सवय बदलून टाकतात. आश्‍चर्य म्हणजे ते संतांनी सांगितल्याप्रमाणे सप्ताहात मरण पावत नाहीत. सांगायचे तात्पर्य म्हणजे आपण देखील असा विचार करून प्रत्येक दिवसाचे सोने केले तर!
तुमचे आयुष्य कसे असायला हवे? त्याचे चित्र आताच डोळ्यापुढे ठेवा आणि त्याप्रमाणे नियोजनाची कृती प्रत्यक्षात आणा. यातून तुम्हाला तुमच्या ध्येयाची सतत आठवण राहील. जो भाग समजत नसेल, अवघड वाटत असेल तो भाग, विषय शिक्षकाकडून लागलीच समजून घ्या. नियोजन केले की आपण दिवसभरात काय केले आणि काय करू शकलो नाही… याचा सरळ हिशोब डोळ्यासमोर येतो. आपण आढावा घेऊ शकतो. यातून आपण जे केले नाही ते करण्याची प्रेरणा मिळू शकते. वेळेचे महत्त्व तुम्हाला ह्ळुहळू समजू लागेल- अभ्यासात येणार्‍या बाह्य अडचणी आणि आपण निर्माण केलेल्या अडचणी. जरा कष्ट घेतल्यास नियोजन करणे आणखी सोपे होईल. मोबाईल हवाच का, मोटर सायकल आवश्यक आहे का, सहकारी मित्राबरोबर किती वेळ गप्पा करीत राहायचे आणि त्या अभ्यासाला पूरक असतात का, याचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि प्राधान्य कशाला द्यावे हे ठरवायचे आहे. या वेळेसाठी येणार्‍या मुख्य अडचणी असतात. शैक्षणिक वयात यातून कुणाचे भले झाले आहे का? याउलट यामुळे तुम्ही अडचणींना निमंत्रण देत असता. ताण – तणावाला इथूनच प्रारंभ होतो. शिवाय नाहक पैसे खर्च होतात ते वेगळेच. यापेक्षा या पैशातून आपला आहार चांगला होण्यासाठी खर्च केले तर निदान आपले आरोग्य तरी चांगले राहील.
चांगले खेळाडू, चांगले वैज्ञानिक निर्माण होण्यासाठी प्रशिक्षकाबरोबर त्या खेळाडूनेही सातत्याने परिश्रम घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. वैज्ञानिक होण्यासाठी प्रश्‍न विचारणे आणि त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती जोपासायला हवी. या सर्व गोष्टींच्या नियोजनाची एकदा सवय लावली आणि त्या दृष्टीने तुम्ही कृती करू लागलात की तुमच्या ध्यान्यात येऊ लागतील.
आपल्या नियोजनात शारीरिक व्यायाम, योग, प्राणायामाचा समावेश, नियमित वृप्तपत्रातील अग्रलेख, लेखांचे वाचन, ज्ञान वाढविण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, तज्ञ लोकांची चर्चा ऐकण्यासाठी टीव्हीचा कार्यक्रम बघणे यांचाही अंतर्भाव असायला हवा.

आपली ध्येये निश्चित करताना त्यात दोन प्रकार असू द्या. एक म्हणजे – या वर्षाचे आणि दुसरे दीर्घ पल्ल्याचे. लघु पल्ल्यात यावर्षी आपण गत सालच्या परीक्षेत जेवढे गुण मिळविले होते त्यापेक्षा सरस कामगिरी करेन. नियोजनाने तुम्हाला पहिला टप्पा पुरा करायला मदत होईल. विद्यार्थी अतिरिक्त वाचनाकडे दुर्लक्ष करतात. तसे न करता आपण चरित्र, आत्मचरित्र प्रकार वाचायला तरी प्राधान्य द्यावे. याशिवाय स्व-विकासावर आधारित नामवंत लेखकांची कित्येक पुस्तके उपलब्ध आहेत, विशेषतः इंग्रजी. उदा. डेल कार्नेजी, शिव खेडा, स्टीफन कॉव्ही, जोसेफ मर्फी इ. या काही लेखकांचे मराठी अनुवादही उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या पुस्तक वाचनाने मनाला उभारी देण्याचे काम होते. आपल्या मनावर आलेली मरगळ दूर होते, अध्ययन करण्याला स्फूर्ती मिळते. यासाठी कॉलेज व्यतिरिक्त मोठ्या सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य व्हा. माणसाचा मूळ स्वभाव आराम करण्याचा आणि अलीकडच्या काळात ऐष आराम करण्याला पूरक आधुनिक तंत्रज्ञान घराघरामध्ये घुसले आहे. त्यासाठी स्वतःला चांगली सवय लावण्याचे हेच वय आहे. दुधाचा रतीब घालणे, वृत्तपत्रे दारोदारी पोचविणे, पाट्या रंगविण्याचे काम करणे, अर्ध वेळ मजुरी करणे, इ. कामे करणारे विद्यार्थी गोव्यात सहसा आढळत नाहीत. त्यातून श्रम करण्याची वृत्ती जोपासण्यासाठी अन्य मार्ग नसल्याने आपल्या नोकरीच्या बाबतीतही आपण अशा नोकर्‍यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, जे पुढे आपल्या करियरला मारक ठरू शकते. आपण शिकून नोकरी करणार की नोकरी देणारे उद्योजक होणार? हेही आत्तापासूनच ठरवा
जे यशस्वी झालेले आहेत ते फक्त नशिबामुळे नव्हे तर त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने, जिद्दीने. आपल्या या काळात जर तुम्ही अशाप्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम आखलात व कृतीत आणला तर आशावादी, प्रयत्नवादी होण्याकडे तुमचा स्वभाव घडत जाईल. नाहीतर क्षुल्लक अपयशाने तुम्ही खचून जाऊ शकता. त्यातून जीवन संपविण्याचे विचार तुम्हाला ग्रासू शकतील किंवा तुमच्याकडून तुमची क्षमता तुम्हीच कुजवून टाकाल.

मराठी रंगभूमीवरील जुन्या पिढीतले श्रेष्ठ अभिनेते बालगंधर्व यांचे नाव तुम्ही ऐकले, वाचलेले असेल. त्यांनी गंधर्व नाटक कंपनी काढली होती. त्यांच्या यशात कठोर परिश्रम आणि निश्चयाची पण जोड होती. एका रात्रीच्या प्रयोगाला तिकीट विक्री झाली होती, पण सकाळी सकाळी त्यांची लहान मुलगी देवाघरी गेली. दुसरा कुणी असता तर त्याने प्रयोग रद्द केला असता. पण त्याकाळी वाहन नसल्याने दूरदूरचे प्रेक्षक चालत काहीतरी सोय करून यायचे, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याही दु:खी अवस्थेत प्रेक्षकांना याचा पत्ता लागू न देता त्यांनी प्रयोग केला. अशा अनेक गोष्टी तुम्हाला वाचनातून भेटतील. हे प्रसंग तुम्हाला तुमच्या जीवनात आलेल्या अडचणींवर मात करायला शिदोरी ठरतील. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी तुमच्या मनात इच्छा उत्पन्न होते पण ती इच्छा उद्दात्त असावी ह्यासाठी नियोजनावर भर द्या आणि त्याला कृतीची जोड द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.