ब्रेकिंग न्यूज़
प्रवासातील सोबती…

प्रवासातील सोबती…

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

‘‘आजचे जेवण बरे नव्हते. काय तो सूप… खायच्या लायकीचा नव्हता. भात तर शिजलाच नव्हता, वगैरे दूषणे देत, ढेकर देत स्वारी उठली. त्याच्या ढेकरांसमोर माझ्या ढेकरांनी बाहेर पडायचे धाडसही केले नव्हते. माझ्या नावडत्या शाकाहारी जेवणाने मला ढेकरच येणार नव्हता. सौ.कडे बघत मी तोंड कडू केले. ती तर मनातल्या मनांत हसत असणार चांगली.. खोडे घडणार ह्यांना म्हणून! हे हवे… ते हवे… हे असेच झाले… ते तसे… हे खारट.. हे तिखट. तिचे डोळे मला विचारत होते. ‘‘काय हो, आता कुठे गेल्या तुमच्या त्या खोडी?’’भावापाठोपाठ बहीणही निघाली. तिच्याही ढेकरांनी भावाच्या ढेकरांना साथ दिली. सफरीची सुरुवात बसप्रवासाने झाली. प्रवास २६० किलोमीटरचा होता. कुणी कुठे बसावे हे ठरवावे लागत नव्हते. आम्ही नवरा-बायको, वर डॉक्टर म्हटल्यावर आम्हाला सवलत होती. ती जोडी पाठी पडली. बहीण तशी सत्तरवर पोहोचलेली. ठीक-ठाक होती. गुडघ्यात गेली होती. भावावर तिचा भारी पगडा होता. म्हणजे नवर्‍यावरच्या पगड्याचा विचारच नको! तिच्या नवर्‍याची कीव येत होती. तिचे बोलणे, रागावणे, भाऊ नेहमी हसण्यावारी न्यायचा ही गोष्ट वेगळी. ही लोकं खा..खा..खातच होती. मी दूर टेबलच्या एका टोकावर बसायचो. दुसरी बका बका खात असतील तर मला खाववत नव्हते. हल्ली मोसंबीच्या रसाचा भडिमार व्हायचा. मग शेवट झाले.. बूच सुटली! ढेकर यायचे बंद झाले. पोटात खळखळ व्हायला लागली. दुसर्‍या दिवशी जेवणाला खाडा. तिसर्‍या दिवशी – पहिल्या दिवशी खाल्लेल्या पावभाजीने माझी दांडी उडवली. चित्तोडगडपर्यंत ठीक होते… हळदीघाटीची लढाईचे स्थळ बघणे जमले नाही. नारळाचे पाणी पोटात गेल्यावर बरे वाटले. आता भाऊ ठीक होता. तो परत एकदा खाण्यावर तुटून पडला.
माझे पोट बरे होते. मी व सौ.नी वेगळा बेत ठरवला. वेगळ्या टेबलावर बसलो. तर ही जोडी पण आमच्यात घुसली. मी वरकरणी दाखवले नाही.. पण कपाळावर आठी पडली होती. एक हाफ चिकनची प्लेट आम्ही शेअर पण त्याने चक्क स्वतःकरता एक फुल प्लेट मटण ऑर्डर केले. ताव मारत जेवला. आइस्क्रीम हवे होते त्याला, पण हॉटेलवर ती सोय नव्हती. आजचे जेवण चांगले नव्हते… मटणात नुसती हाडं…! खरे तर एक हाडूक होते, वर चार-पाच पीस होते. ते मांस बकर्‍याचे होते का मेंढ्याचे ‘‘मज कशाला हवे!’’ म्हणत त्याचा ढेकर तोंडावर यायच्या अगोदर मी बायकोसकट पळ काढला. भावाच्या पोटात दुखतच होते. रात्री तोे जेवला नाही. सूपवरच राहिला. बिच्चार्‍या पोटावर मटणाचा मारा केल्यावर बोंबलणार नाही तर काय करणार?
त्यांची खरेदी हा वेगळाच विषय होता. प्रत्येक ठिकाणची साडी, फोटो, माहिती त्यांनी गोळा केलेली. गाइड माहिती देत असताना भाऊ फोटो काढायचा. फोटो काढायची भारी हौस हो त्याला… बहीण लाडे म्हणायची. कॅमेर्‍याचे पैसे भरायचे नाहीत. लपून छपून फोटो काढायचा. शेवट आयोजकांना ताकीद द्यावी लागली… फी अदा केली नाही तर कॅमेरा जप्त करणार म्हटल्यावर कॅमेरा पोतीत घातला. मोसंबीचा रस चालूच होता… व पोटशूळही! जयपूरचा हवामहल आला… त्याची परत बूच सुटली. बहिणीची वाचाळ बडबड चालूच होती- ‘‘अहो, भावाने काहीच खाल्ले नाही हो, पोरगा उपाशी आहे. डॉक्टरसाहेब मी काय घेऊ?’’ मनातल्या मनात मी म्हटले, ‘‘मटण खा’’. सध्या मी फक्त पापड व दहीभात खात होतो. वर दुपारची केळी, सफरचंद. सकाळी दूध, सँडविच. या सगळ्यांमध्ये माझा चांगला सँडविच झाला होता. हवामहलला भावाने फक्त मोसंबी रस घेतला व रिक्शा घेऊन हॉटेलवर गेला. सफरीच्या तिसर्‍या दिवसापासून सफरीच्या तिसर्‍या दिवसापासून बहिणीची भावावर खफामर्जी झाली. तिने फोनवर मुलीकडे मामाच्या कृत्यांचा पाढा वाचला. ‘‘…ऐकायला कमी येते तरी मशीन कानावर लावत नाही.., मी सांगितलेले ऐकत नाही.., पुढच्या वेळी मी काही याच्याबरोबर येणार नाही.’’
खरी गंमत तर पुढेच आहे. ‘‘करनी माता की जय’’ करून आम्ही बिकानेरला पोहोचलो. तिथल्या करनी माता मंदिराला भेट दिली. या मंदिराला ‘‘उंदराचे देऊळ’’ही म्हणतात. हजारो काळे उंदीर सगळीकडे पसरलेले होते. पांढरा उंदीर दिसला तर म्हणे भाग्य खुलते. आमच्या ही..ला पांढरा उंदीर दिसला. एक नाही दोन दिसले. तिने बरोबरच्या चार जणांना दाखवले. मला नाही दाखवला. तसे आम्ही बाहेर निघालो, तर हा भाऊ तावातावाने मंदिराकडेच चालला होता. म्हणाला, कानात पाणी घालायला जातो… कानात पाणी घातले तर श्रवणयंत्रात जाणार… त्याचे काय?
दंतकथा अशी आहे की उंदराने उष्टे केलेले पाणी जर प्राशन केले तर व्याधी दूर होतात. रोगही बरे होतात. तिथे उंदरांना पिण्यासाठी पाण्याची पातेली ठेवलेली आहेत. मी ओरडलो ‘‘पाण्याकरता एक रिकामी बाटली न्या’’… जन्मभर कानांत थेंब थेंब घालत रहा (मनातल्या मनात मी म्हटले) त्याला ऐकू गेले नसावे. कारण दोन थेंब कानात घालून ते गाडीने परतले.
यायच्या दिवशी तर कहरच झाला. भाऊ म्हणाला, ‘‘मला थोडेफार ऐकायला येतेय!’’ बाटली भरून आणल्याच्या खुणा त्याच्या चेहर्‍यावर दिसत होत्या. मी कपाळावर हात मारला. बहुदा पुढच्या वेळी तो नक्की मोठाली बाटली घेऊनच करनीमाता मंदिरात येईल, असे वाटते! भाऊ बहिणीपासून दूर बसला होता. ‘मी काही हिच्याबरोबर येणार नाही’, त्यानेही हे म्हटले!
छे…छे… मला तर बिलकूल जायचेच नाही ह्यांच्याबरोबर.. जन्मात नाही! भावाला ढेकर येताना दिसत होता. मघाचा ढेकर बेचव होता.. ढेकर यायच्या अगोदर पळ काढलेला बरा..!!