ब्रेकिंग न्यूज़

प्रत्युत्तराची प्रतीक्षा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकवार आपली कुरापतखोरी सुरू केली आहे. नुकत्याच राजौरी जिल्ह्यातील भिंबर गली भागामध्ये पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आपल्या कॅप्टन कपिल कुंडू या उमद्या अधिकार्‍याला त्याच्या तीन सहकार्‍यांसह हौतात्म्य प्राप्त झाले. गेल्या वर्षीपासून पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन करीत असे हल्ले सुरू ठेवले आहेत. अशा प्रकारचा क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे जणू युद्धाचीच ललकार आहे आणि त्याच गांभीर्याने या हल्ल्याकडे पाहिले गेले पाहिजे. पाकिस्तानकडून होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाची उपलब्ध आकडेवारी पाहिली तर सातत्याने त्या घटनांत वाढच होत गेलेली दिसेल. गेली काही वर्षे हे प्रकार वर्षाला पाचशेच्या घरात घडत आले होते, परंतु गतवर्षात पाकिस्तानने तब्बल ८४० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन करून भारतीय ठाण्यांवर हल्ले चढवले आणि हे नववर्ष सुरू होऊन अद्याप केवळ एक महिना उलटला असताना तब्बल २४१ वेळा पाकिस्तानकडून भारतीय बाजूला गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. केवळ आपल्या सैन्याच्या ठाण्यांवरच हे हल्ले चढवले जात आहेत असे नव्हे, तर सीमावर्ती भागांमध्ये थेट नागरी वस्त्यांमध्ये असे भीषण हल्ले चढवले जात आहेत. पाकिस्तानचे हे अतिशय अमानवी कृत्य आहे. सीमावर्ती गावांतील गोरगरीब जनतेला घरदार सोडून निर्वासित छावण्यांमध्ये राहावे लागते आहे. मुलांच्या शाळा बंद पडल्या आहेत. आपला शेती व्यवसाय सोडून लोकांना आपल्याच देशात अकारण निर्वासिताचे जिणे जगावे लागत आहे. आपल्या घरात कुटुंबासह गुजराण करीत असलेल्या जनतेला कधी कुठून सुसाटत गोळी येईल, कुठून तोफगोळा आदळेल, कुठून क्षेपणास्त्र वेध घेईल याची काहीही शाश्‍वती राहिलेली नाही. येणारी प्रत्येक रात्र अत्यंत भीतीदायक ठरत आहे. सततच्या गोळीबाराने घरांच्या भिंतींची चाळण झालेली आहे. पाकिस्तानचे हे आततायी कृत्य थांबवण्यासाठी तेवढीच जरब बसवणारी कारवाई आपल्याकडून होण्याची आवश्यकता आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या संरक्षणमंत्रिपदाच्या अल्प काळात गोळीला गोळीने उत्तर देण्याचे स्वातंत्र्य आपल्या सैन्यदलांना बहाल केले होते. त्यामुळे पलीकडून आगळीक घडताच तेवढ्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले जात होते. सर्जिकल स्ट्राईकने तर पाकिस्तानच्या उरात धडकी भरविली होती. परंतु पर्रीकर गोव्यात परतल्यापासून भारताच्या प्रत्युत्तराला ती धार राहिली नसल्याचे जाणवू लागले आहे. विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण तर स्वतःची सैनिकी पोशाखातील छायाचित्रे काढून घेण्यातच व्यस्त दिसत आहेत. सैन्य कधी तोंडाने बोलत नसते हे खरे, परंतु ते पुरेशा क्षमतेने गोळीने बोलले असेल तर पाकिस्तानची सतत चाललेली कुरापतखोरीही अद्याप का थांबलेली नाही हा प्रश्न उरतोच. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या एकाकी पडत चाललेला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या अंतर्भागामध्ये द्रोन हल्ले चढवून योग्य तो संदेश दिला आहेच. आता भारतानेही या बदलत्या वातावरणाचा लाभ घ्यायला हवा. गिलगिट – बाल्टिस्तानातील पाकिस्तान – चीन आर्थिक कॉरिडॉरवर घातपात घडवण्याचा बेत भारत आखत असल्याचा कांगावा पाकिस्तानने सध्या चालवलेला आहे. म्हणजे चीनलाही या विवादात ओढण्याचा हा खटाटोप आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवण्याचे सत्र सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानने थांबवलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच दोघे दहशतवादी पकडलेही गेले. आता तर काश्मिरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्यांच्या नावाखाली निमंत्रित करून दहशतवादी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे उघड झालेले आहे. लातोंके भूत बातोंसे नही मानते हेच खरे. त्यामुळे किमान पाकिस्तानी रेंजर्सना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोळीबार थांबवणे भाग पडेल एवढा धाक निर्माण होण्याची नितांत आवश्यकता संपूर्ण देशभरातून व्यक्त होते आहे. आपण बचावात्मक पवित्रा किती काळ घेत राहणार? ही जनभावना सरकारला दुर्लक्षिता येणार नाही. युद्ध कोणालाच नको असते, परंतु प्रत्यक्ष युद्ध नसतानाही शांततेच्या या काळामध्ये आपले लष्करी अधिकारी हकनाक मारले जात असल्याने सीमेवर युद्धजन्य परिस्थितीच तर दिसते आहे. आपल्या जवानांवर क्षेपणास्त्राचा हल्ला चढवला जात असताना आपल्याजवळील क्षेपणास्त्रे ही केवळ २६ जानेवारीच्या संचलनात प्रदर्शनासाठीच आहेत काय हा शिवसेनेचा सवाल भले काहींना उथळ वाटेल, परंतु देशाची भावनाच जणू त्यातून व्यक्त झालेली आहे. आपली सैन्यदले केवळ मार खाण्यासाठी नाहीत, हा विश्वास जनतेमध्ये जर निर्माण करायचा असेल, सैन्यदलांचेही मनोबल उंचावायचे असेल तर पाकिस्तानला अधिक कडक आणि कठोर प्रत्युत्तर याक्षणी आवश्यक आहे.