प्रतीक, राल्टे बंगळुरू एफसी संघात

इंडियन सुपर लीगमधील फ्रेंचायझी असलेल्या बंगळुरू एफसीने आगामी २०२०-२१ मोसमासाठी अनुभवी बचावपटू प्रतीक चौधरी व गोलरक्षक लालथुआमाविया राल्टे यांना करारबद्ध केले आहे. चौधरी मागील मोसमात मुंबई सिटी एफसी संघाकडून खेळला होता. राल्टे हा २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळुरू संघासोबत होता. यानंतर त्याने क्लबला सोडचिठ्ठी दिली होती.

वैविध्यपूर्ण खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या चौधरी याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०११ साली एअर इंडिया संघाकडून केली होती. यानंतर त्याने आयलीग मध्ये मोहन बागान, मुंबई एफसी व रंगदाजिद युनायटेड या संघांचे प्रतिनिधित्व केले. इंडियन सुपर लीगमधील चौधरी याचा हा पाचवा क्लब असेल. यापूर्वी तो केरला ब्लास्टर्स, दिल्ली डायनामोज व जमशेदपूर एफसीकडून खेळला आहे. ‘देशातील सर्वोत्तम क्लबांमधील एक असलेल्या क्लबचा भाग बनण्यासारखी मोठी गोष्ट दुसरी नाही. मिळालेल्या संधीचे सोने करून क्लबसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सदैव प्रयत्न असेल,‘ असे चौधरी याने करारबद्ध झाल्यानंतर सांगितले. दुसरीकडे राल्टे याला बंगळुरुचा संघ नवीन नाही. क्क्लबच्या चार पदकविजेत्या संघाचा तो अविभाज्य घटक होता.

२०१६ एएफसी कप फायनलमध्ये एअर फोर्स क्लबचा सामना केलेल्या बंगळुरू संघातही त्याचा समावेश होता. २७ वर्षीय राल्टे हा आयएसएलमध्ये नॉर्थईस्ट युनायटेड, एफसी गोवा व केरला ब्लास्टर्स या क्लबांकडूंनही खेळला आहे. सध्या तो ईस्ट बंगाल एफसी संघात ‘लोन’वर होता.
विदेशी खेळाडू जुआनन गोंझालेझ, एरिक पार्टलू व दिमास दाल्गादो यांच्यासोबतचा तसेच लिओन आगुस्तिन, पराग श्रीवास, एडमंड लालरिंदिका, अजय छेत्री, नाओरेम रोशन सिंग व नामगायल भूतिया या प्रतिभावान खेळाडूंचा करार वाढवल्यानंतर आता चौधरी व राल्टेमुळे बंगळुरूचा संघ अधिक बलाढ्य झाला आहे, असे क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हणे यांनी सांगितले आहे.