प्रख्यात कादंबरीकार आणि व्यासंगी इतिहाससंशोधक प्रा. स. शं. देसाई

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

त्यांचा जीवनप्रवास हा प्रयत्नवादी कर्मयोग्याचा प्रवास आहे. एकलव्यनिष्ठेने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी इतिहाससंशोधनाचे धडे गिरवले आणि नव्या पिढीसमोर अभ्यासक कसा असावा याचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवला.

प्रा. स. शं. देसाई यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाबद्दल माझ्या मनात सदैव अत्यंत आदराची भावना वसत आलेली आहे. याचे कारण ते आमच्या पाळोळे गावातील होते. मी प्राथमिक शाळेत असताना दोन नावे ऐकत आलेलो होतो. एक प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी आणि शल्यविशारद डॉ. पुंडलिक गायतोंडे आणि दुसरे प्रख्यात साहित्यिक आणि इतिहाससंशोधक प्रा. स. शं. देसाई. त्या वयात एकूण समज कमीच. पण स्वातंत्र्यासाठी झुंज देणारे आणि लिहिणारे मला मोठेच वाटत आलेले होते. या दोघांना पाहण्याचा योग तसा उशिराच आला. प्रा. स. शं. देसाई यांचे वास्तव्य तर सुरुवातीला बरीच वर्षे पुण्यात होते. अभ्यासाच्या निमित्ताने मी उदय नगर्सेकर आणि प्रकाश नगर्सेकर या मित्रांसह- डॉ. वसंतबाब नगर्सेकर यांच्या घरी- अनेक वर्षे जात असे. डॉ. वसंतबाब यांना साहित्य, संगीत आणि कला या क्षेत्रांतील माणसांच्या सहवासाची आवड होती. प्रा. स. शं. देसाई हे तर त्यांचे मित्रच होते.

पुण्याहून आल्यानंतर ते डॉ. वसंतबाब यांच्या घरी आवर्जून यायचे. त्यांच्या गप्पागोष्टी होत असत. शालेय वयात पांढरा शर्ट-पँट परिधान करणार्‍या आणि डोक्यावर त्या काळात हॅट घालणार्‍या प्रा. स. शं. देसाई यांना मी पाहिले होते. पण भेट झाली ती १९६६ मध्ये मे महिन्याच्या सुट्टीत पाळोळ्याच्या समुद्रकिनार्‍यावर. ते फिरायला गेले होते. पांढरेशुभ्र धोतर, वर मलमलीचा पांढरशुभ्र शर्ट असा त्यांचा वेश होता… मुद्रा अत्यंत देखणी- काहीशी गंभीर… मनाचा हिय्या करून मी त्यांना नमस्कार केला. तसे ते आमच्या घरापासून जवळच राहणारे… अमक्याचा मुलगा म्हटल्यावर त्यांनी मान डोलावली आणि अगत्याने माझी विचारपूस केली. त्यावेळी मी इंटरमिजिएट आर्टस्‌ची परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांची ‘इभ्रत’ आणि हैदराबादच्या मुक्तिसंग्रामावरची ‘आहुती’ ही कादंबरी तेवढी मी वाचली होती. ‘आहुती’ कादंबरीमुळे मला निजाम, रझाकार आणि तेथील स्वातंत्र्योत्सुक जनता यांमधील संघर्षाचे स्वरूप कळले होते. त्यातील ‘विश्‍वास’ ही केंद्रवर्ती व्यक्तिरेखा माझ्या मनात ठसली होती. त्या कादंबरीचा मी त्यांच्याशी उल्लेख केल्याचे पुसटसे मला आठवते. त्यांनी त्यावेळी ‘तू काय लिहितोस की नाही’ इत्यादी प्रश्‍न विचारले. माझ्याकडे सांगण्यासारखे तसे विशेष काहीच नव्हते. फक्त आवड तेवढी होती. कित्येक वर्षांपूर्वीचे त्यांचे ‘डोंट बी डिसहार्टन्ड’ हे निरोपाच्या वेळचे शब्द आठवतात. ‘सुट्टीत मी आल्यावर घरी भेटत जा!’ असेही त्यांनी सांगितले. ते ऋणानुबंध त्यांनी सातत्याने जपले. माझी त्यांच्याकडे ये-जा वाढली. शिवाजी विद्यापीठातील त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पाळोळ्याला नवीन वास्तू बांधली. मी चौगुले कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना आणि त्यानंतरच्या काळात त्यांच्याकडे नित्य-नेमाने जात राहिलो. त्यांनी माझ्यावर पितृवत प्रेम केले. अनेक घटनांचे साक्षीदार असलेले, अनेक मोठी माणसे पाहिलेले, अनेक ग्रंथांचे सखोल परिशीलन केलेले, विविध प्रकारच्या वाङ्‌मयाची निर्मिती केलेले आणि जीवनप्रवासात संपन्न अनुभवांचे धन गाठीशी असलेले ते श्रेष्ठ साहित्यिक, इतिहाससंशोधक. पण कोणताही अभिनिवेश न बाळगता मोकळेपणाने ते गतकालीन इतिहासाविषयी, नजीकच्या भूतकाळाविषयी, गोव्याच्या मुक्तिसंग्रामाविषयी, तत्कालीन पत्रकारितेविषयी व मराठी साहित्यविश्‍वाविषयी मोकळेपणाने माझ्याशी बोलायचे. मतांविषयी त्यांच्यात परखडपणा होता; पण तो पूर्णतः अभ्यासाधिष्ठित होता.

पूर्वग्रहदूषित मुळीच नव्हता. त्यांचा राग-लोभ उत्कट असे, असे बरेच जण सांगतात. पण माझ्या वाट्याला त्यांचे वात्सल्यच आले. त्यांच्या वाङ्‌मयीन गुणवत्तेबरोबरच ‘माणूस’ म्हणून मला सदाशिवबाब सदैव प्रिय वाटत आले. ‘गोवा मराठी अकादमी’ आणि ‘गोमंत विद्या निकेतन’ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दीसोहळ्यात प्रख्यात इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केलेल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषणातून इतिहाससंशोधनक्षेत्रातील त्यांची कामगिरी किती मौलिक स्वरूपाची आहे हे अधिक कळले. त्यासंबंधी अनभिज्ञता होती अशातला भाग नाही. गोवा पुराभिलेख आणि पुरातत्त्वखात्याचे माजी संचालक आणि प्रख्यात इतिहाससंशोधक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी त्यांच्या कार्याचा मागोवा घेतलेलाच आहे.

एक मात्र निश्‍चित की मराठीत इतिहाससंशोधकांची दीर्घ परंपरा आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, श्री. रा. पारसनीस, साने, रियासतकार गो. स. सरदेसाई, दत्तो वामन पोतदार, सेतु माधवराव पगडी, डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्याच परंपरेतील इतिहाससंशोधक गोमंतकातही निर्माण झाले. जुन्या पिढीतील डॉ. पांडुरंग स. पिसुर्लेकर आणि प्रा. स. शं. देसाई यांचे या क्षेत्रातील कार्य तर अव्वल दर्जाचे. प्रा. स. शं. देसाई यांनी डॉ. पांडुरंग स. पिसुर्लेकर व डॉ. आंतोनियू द यागाद परेरा यांनी संपादित केलेल्या मराठ्यांच्या इतिहासासंबंधीच्या पोर्तुगीज दस्तऐवजाचा मराठीत अनुवाद केला. ‘ताराबाईकालीन कागदपत्रे’ तसेच ‘ताराबाई आणि शिवकालीन पोर्तुगीज कागदपत्रे’ या अप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील त्यांचे मौलिक सहकार्य उल्लेखनीय आहे. ‘हिस्टोरिकल एन्सायक्लोपिडिया ऑफ मराठा’ या तीन खंडांचे कार्यही त्यांनी पूर्ण केले. ‘मराठ्यांचा इतिहास’ या विषयासंबंधी त्यांनी ध्यासपूर्वक संशोधन केले.

इतिहाससंशोधनाबरोबर ललित वाङ्‌मयाविषयी संवेदनक्षम वयापासून प्रा. स. शं. देसाई यांचा ओढा होता. त्यामुळे कादंबरीविश्‍वात लक्षणीय स्वरूपाची कामगिरी ते पार पाडू शकले. ‘चंबळेच्या पलीकडे’, ‘महापर्व’ आणि ‘अखेरची लढाई’ या कादंबरीमालिकेतून त्यांनी मराठेशाहीच्या उत्थान-पतनाचा कालखंड अत्यंत प्रभावीरीत्या उभा केलेला आहे. प्रा. स. शं. देसाई यांच्या कादंबरीलेखनाचे वैशिष्ट्य असे की ते इतिहासाशी प्रामाण्य राखतात आणि त्याचबरोबर साहित्यकृतीतील कलात्मकतेचे भान राखतात. विश्‍वसाहित्यातील उत्तमोत्तम कादंबर्‍यांचे वाचन आणि परिशीलन त्यांनी केलेेले असल्यामुळे ही गोष्ट त्यांना सहजसाध्य झाली. या तीनही कादंबर्‍या स्वतंत्र असल्या तरी ऐतिहासिक कालखंडाचे अंतःसूत्र त्यांनी त्यात योजलेले आहे. ‘अब्बास अली’ हीदेखील त्यांची हैदराबादच्या राजकीय पार्श्‍वभूमीवर आधारलेली कादंबरी. १९६३ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘इभ्रत’ या कादंबरीवर आधारलेला ‘कुलदैवत’ हा चित्रपट निघाला. रॉबर्ट क्लाईव्हच्या जीवनावर आधारलेली ‘कथा एका साम्राज्यसंस्थापकाची’ ही चरित्रात्मक कादंबरी त्यांनी लिहिली. ‘निष्कलंक’ आणि ‘विजयकमान’ या त्यांच्या अन्य कादंबर्‍या आहेत.

कादंबरीलेखनाबरोबरच त्यांनी कथालेखनही केले आहे. त्यांचा मराठी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि फ्रेंच वाङ्‌मयाचा व्यासंग दांडगा होता. ते समीक्षक म्हणून किती तोलामोलाचे आहेत हे त्यांच्या ‘विविध लेख’ या समीक्षाग्रंथातून प्रत्ययास येते. आपल्याला जाणवलेले सत्य प्रकट करताना ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. त्यांची विशुद्ध वाङ्‌मयीन दृष्टी मात्र सदैव प्रत्ययास येते. ‘एक विलक्षण साहित्यशर्विलकी’, ‘आळीमिळी गुपचिळी’ आणि ‘टीकाविवेकाच्या निमित्ताने’ ही तीन ग्रंथपरीक्षणे या ग्रंथात समाविष्ट आहेत. आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रतिक्रिया त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडलेल्या आहेत. ‘ग्रीक संस्कृतीचे क्रांतिकार्य’, ‘कादंबरीचे भवितव्य’ आणि ‘इंग्रजी कविता ः कालची व आजची’ या प्रदीर्घ स्वरूपाच्या लेखांतून प्रा. स. शं. देसाई यांच्या वाङ्‌मयीन व्यासंगाचा पैस किती विस्तीर्ण स्वरूपाचा आहे हे ध्यानात येते. वाङ्‌मयीन विमर्शकार म्हणूनही त्यांनी या ग्रंथामुळे आपले स्थान निश्‍चित केले आहे.

इतिहास हा प्रा. स. शं. देसाई यांच्या चिंतनशीलतेचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांनी केलेले लेखन त्यांच्या अवतीभवतीचे आहे. ‘पहिले महायुद्ध’, ‘दुसरे महायुद्ध’, ‘स्टालिनग्राडची लढाई’, ‘मानवी इतिहासातील महान क्षण’ हे इतिहासावर आधारलेले ग्रंथ आहेत. ‘शेवटचा सेनापती बापू गोखले’ आणि ‘सर विन्स्टन चर्चिल यांचे चरित्र’ हे चरित्रपर ग्रंथ आहेत. त्यांच्या विविधांगी वाङ्‌मयसंपदेचा समग्रतेने वेध घेणे हे या लेखाचे उद्दिष्ट नव्हे. तो विस्ताराने मांडण्याचा विषय आहे.

वाङ्‌मयीन संस्कृतीच्या उपासनेत निमग्न राहिलेल्या प्रा. स. शं. देसाई यांचे जीवन एकारलेले नव्हते. त्यांनी आपली समाजमनस्कताही प्रकट केली. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी आपला वाटा उचललेला आहे. ‘नॅशनल कॉंग्रेस गोवा’च्या पुणे विभागाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी धुरा वाहिली. त्यांचे पत्रकारितेतील कार्यही महत्त्वपूर्ण स्वरूपाचे. त्यानंतर पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृतिकोश मंडळा’तही त्यांनी काम केले. त्यांचा जीवनप्रवास हा प्रयत्नवादी कर्मयोग्याचा प्रवास आहे. एकलव्यनिष्ठेने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी इतिहाससंशोधनाचे धडे गिरवले आणि नव्या पिढीसमोर अभ्यासक कसा असावा याचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवला.
प्रा. स. शं. देसाई यांच्याशी अनुबंध जुळून आले याविषयी मला सात्त्विक समाधान वाटते. त्यांची सुविद्य कन्या प्रा. अकल्पिता राऊत देसाई यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ते कायम ठेवले आहेत.