प्रकाशाचा कवडसा हवा

0
113

आत्महत्यांच्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. कुंभारजुव्यात परवा झालेली तिहेरी आत्महत्या ही याच शृंखलेतील आणखी एक दुर्दैवी घटना. समाजामध्ये नैराश्य आणि नकारात्मकतेचा हा प्रवाह का निर्माण झाला आहे हा चिंता करण्यासारखा विषय आहे. गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. नॅशनल क्राईब ब्यूरोपाशी सर्वांत ताजी आकडेवारी सन २०१२ ची उपलब्ध आहे. त्या आकडेवारीनुसार आत्महत्यांची राष्ट्रीय सरासरी १० टक्के, तर गोव्यातील आत्महत्यांची सरासरी १५.८ टक्के आहे. देशात त्या वर्षी एक लाख पस्तीस हजार आत्महत्या घडल्या. २००२ ते २०१२ या दशकामध्ये आत्महत्यांच्या घटनांत २२.७ टक्के वाढ दिसून आली. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण अधिक वाढलेले असू शकते. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण देशात रोज सरासरी २४२ पुरूष आणि १२९ स्त्रिया आत्महत्येचा मार्ग अनुसरतात अशी ही नॅशनल क्राईम ब्यूरोची ही आकडेवारी सांगते. यामध्ये २९ वर्षांखालील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे आणि त्यानंतर ३३ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचा क्रम लागतो. म्हणजे आयुष्य पुरते उमलण्याआधीच सर्वनाश करून घेण्यास माणसे उद्युक्त होत आहेत. मानवी आयुष्य हे सुख दुःखाच्या चढउतारांनी भरलेले आहे. त्यामुळे निराशा, अपेभाभंग, वैफल्याचे क्षण वाट्याला कधी ना कधी येतच राहणार. परंतु रात्रीनंतर नव्या दिवसाचा सूर्य उगवतच असतो हे चिरंतन सत्य आपल्याला परमेश्वराने रोज अनुभवायला दिलेले असतानाही माणसे हताश होतात, वैफल्याच्या दरीत खोल खोल उतरत जातात आणि आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अनुसरून या अनमोल जीवनाला कवडीमोल करून निघून जातात हे न समजण्यासारखे आहे. पूर्वी गरीबी, बेकारी, आर्थिक संकटे, कौटुंबिक छळ ही आत्महत्येची कारणे मानली जायची, परंतु अलीकडे क्षुल्लक कारणावरूनही माणसे आपला लाखमोलाचा जीव द्यायला पुढे सरसावतात हे आकलनापलीकडचे आहे. भाऊ रागावला म्हणून दोन बहिणी आमोणे पुलावरून नदीत उडी टाकतात, सासरची माणसे छळतात त्याला आपल्या माहेरच्या माणसांच्या पाठिंब्यावर खंबीरपणे तोंड देण्याऐवजी एखादी वेदश्री आपल्या सोन्यासारख्या मुलीला घेऊन जुवारी पूल गाठते, आपल्या मानसिक विकलांग मुलाच्या मृत्यूचे सलते दुःख सोसून आपल्या कन्येच्या उज्ज्वल भवितव्याभोवती लक्ष केंद्रित करण्याऐवजी कुंभारजुव्याचे नाईक पती पत्नी मुलीचा जीव घेऊन स्वतःलाही संपवतात, हे आपल्या या शांत, सुंदर, पवित्र भूमीमध्ये काय चालले आहे? गोवेकरांची भावुक वृत्तीच कसोटीच्या क्षणांना तोंड देण्यास कमकुवत ठरू लागली आहे का? देशातील आत्महत्यांची आकडेवारी पाहिली तर पुडुचेरी, तामीळनाडू, केरळ ही दक्षिणी राज्ये आघाडीवर आहेत. तेथील माणसेही अशीच आत्यंतिक संवेदनशील असतात. भावनेच्या भरात आत्मदहनालाही तयार होतात. जीवनाच्या प्रवासातील खाचखळग्यांना तोंड देण्याचे मानसिक सामर्थ्य आपण का गमावून बसलो आहोत याचा विचार समस्त विचारवंतांनी करायला हवा. गेल्या दोन महिन्यांत आत्महत्यांच्या कितीतरी घटना घडल्या. रोज कुठे ना कुठे कोणी ना कोणी आपले जीवन संपवल्याच्या बातम्या येत आहेत. आत्महत्येची ही लाट थोपवण्याच्या दिशेने एक खारीचा वाटा म्हणून नवप्रभेने गेल्याच रविवारी डॉ. व्यंकटेश हेगडे यांना ‘अंगण’ पुरवणीत लिहिते करून या समस्येचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे प्रत्येक आत्महत्येेचे मूळ हे मानवी मनामध्येच असते. मन निराश होते, वैफल्यग्रस्त होते, काळवंडून जाते आणि जीवनावरचा विश्वास उडून जातो. परिस्थितीला तोंड देण्याची हिंमतच ते गमावून बसते आणि मृत्यू हाच या समस्येवरचा उपाय असा अविचार करून बसते. आत्महत्या रोखायच्या असतील तर मानवी मनामध्ये सकारात्मकता पेरणारे उपक्रम आवश्यक आहेत. जीवनावरचा विश्वास दृढ करणारे उपक्रम गरजेचे आहेत. बालवयातील संस्कार, शालेय जीवनातील समुदपेशन, कौटुंबिक जीवनातील सकारात्मकता, समस्यापूर्ती करणारे, निराशेतून बाहेर काढणारे समुपदेशन गरजेचे आहे. सगळे काही संपलेले नाही, भोवतीच्या अंधारातही प्रकाशाची एक तिरीप दिसते आहे हा विश्वास जेव्हा जागेल, तेव्हाच या दुर्दैवी आत्महत्या थांबतील.