ब्रेकिंग न्यूज़

पोनप्पा-रेड्डी उपांत्य फेरीत

अव्वल मानांकित अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी काल शुक्रवारी हैदराबाद ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल शुक्रवारी त्यांनी मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांचा पराभव केला. पोनप्पा -रेड्डीने आठव्या मानांकित जोडीचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत हॉंगकॉंगच्या कान यान फान व यी टिंग वू यांच्याशी गाठ पक्की केली. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित सौरभ वर्मा याने अंतिम चारमध्ये प्रवेश करताना बिगरमानांकित अजय जयराम याचा २१-१८, २१-९ असा सहज पाडाव केला. उपांत्य फेरीत वर्मासमोर इस्कंदर झुल्करनैन याचे आव्हान असेल. एकेरीतील आव्हान टिकून ठेवलेला वर्मा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. पाचव्या मानांकित शुभंकर डे याला सिंगापूरच्या किन यिव लोह याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकित मनू अत्री व सुमीत रेड्डी यांना दक्षिण कोरियाच्या सुंग सियोंग ना व चान वांग यांनी १९-२१, २१-११, २१-१७ असे हरविले. पुरुष दुहेरीतील भारताची अन्य एक जोडी एमआर अर्जुन व श्‍लोक रामचंद्रन यांना तैवानच्या झे हुई ली व पो सुआन यांग या जोडीने २१-१९, २१-९ असा बाहेरचा रस्ता दाखविला.