पोटनिवडणूक : महापालिका मार्केटच्या सफाईने गोवा सुरक्षा मंचाचा प्रचार सुरू

पोटनिवडणूक : महापालिका मार्केटच्या सफाईने गोवा सुरक्षा मंचाचा प्रचार सुरू

पणजी पोटनिवडणुकीसाठीचा आपला प्रचाराचा नारळ अभिनव पद्धतीने फोडताना काल गोवा सुरक्षा मंचने पणजी महापालिका मार्केटची साफसफाई करून तेथील कचरा उचलला. यावेळी बोलताना पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी या पोटनिवडणुकीत लोकांनी गोवा सुरक्षा मंचचा उमेदवार या नात्याने आपणाला निवडून दिल्यास पणजी शहर चकाचक करण्याचे आश्‍वासन लोकांना दिले.
यावेळी श्री. शिरोडकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री व पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्यावर जोरदार टीका केली. मनोहर पर्रीकर यांनी आपला ३६५ दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असल्याचे सांगून एखाद्या नवख्या आमदाराप्रमाणे त्यांनी असा कार्यक्रम का जाहीर केला आहे, असा प्रश्‍नही शिरोडकर यांनी यावेळी केला.
पणजी शहरातील समस्या शोधून काढण्यासाठी पर्रीकर यांना आयएएस् अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील समिती स्थापन करावी, असे का वाटले, असा प्रश्‍न करून ते म्हणाले की आयएएस अधिकारी फक्त त्यासंबंधीचा अहवाल सादर करतील. पणजीच्या समस्या शोधून काढण्यासाठी बुध्दीची गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्याला काम करायचे आहे त्याला समस्या आपसूकच कळू शकतात, असे शिरोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पक्षाचे मार्गदर्शक अरविंद भाटीकर, पक्षाचे पदाधिकारी हृदयनाथ शिरोडकर, पक्षाच्या महिला प्रमुख रोशन सामंत तसेच आत्माराम गावकर आदींचीही भाषणे झाली. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या निवडणूक प्रचार फेरीत पक्षाचे सुमारे १५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.