पैसे मागणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार

पैसे मागणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार

>> भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे अनेक तक्रारी

>> भ्रष्ट अधिकार्‍यांची गय करणार नाही

मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या नावे सरकारी नोकर्‍यांसाठी काही सरकारी कर्मचारी आणि काही व्यक्ती नागरिकांकडे पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार आहे. सरकारी नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊ नये. नागरिकांनी पैसे मागणार्‍यांच्या विरोधात मुख्यमंत्री कार्यालय किंवा पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करावी. काही सरकारी कर्मचारी नोकरीसाठी पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. राज्यात भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. भ्रष्ट अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिला.

भाजप मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांकडून तक्रारी, गार्‍हाणी ऐकून घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा इशारा दिला. भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाबाबत वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत. सरकारी नोकर भरतीबाबत सुध्दा तक्रारी केल्या आहेत. सरकारी नोकरीसाठी काही सरकारी कर्मचारी आणि काही व्यक्ती पैशांची मागणी करीत आहेत, अशी तक्रार आहे. सरकारी नोकरीसाठी पैसे द्यावे लागत नाही. आपल्याकडे सरकारी कर्मचार्‍याविरोधात दोन – तीन तक्रारी आलेल्या आहेत. सरकारी नोकरीसाठी पैसे मागणार्‍यांना पैसे देऊ नये. त्याच्याविरोधात मुख्यमंत्री कार्यालय किंवा पोलीस स्टेशनवर तक्रारी नोंदवाव्यात. या प्रकरणी कडक कारवाई केली जाणार आहे. सरकारी कार्यालयात विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांकडून सरकारी कर्मचार्‍यांनी लाच घेऊ नये. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची तक्रार खपवून घेतली जाणार नाही. सोशल मिडियावर सरकारी नोकरीसाठी पैशांची मागणी करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सोनसडो येथील कचरा विल्हेवाटीच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मासळीतील फॉर्मेलीन प्रश्‍नावरून मासळीची तपासणी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री दिल्लीला
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय वित्त समितीच्या बैठकीला उपस्थिती राहण्यासाठी नवी दिल्लीला गुरूवारी संध्याकाळी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्ली येथे २१ जून रोजी केंद्रीय वित्त समितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०% कर्मचारी
करत नाहीत काम
साधारण २० टक्के कर्मचारी काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी योग्य प्रकारे कामकाज केल्यास अनेक तक्रारी सुटू शकतात. वीज, पाणी याबाबत जास्त तक्रारी आहेत. विकास कामांबाबत जास्त तक्रारी नाहीत. राष्ट्रीय महामार्गाची काम सुरू असलेल्या विभागात तक्रारी आहेत. नागरिकांच्या सरकारी कर्मचार्‍यांविरोधातील तक्रारी खपवून घेण्यात येणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.