ब्रेकिंग न्यूज़

‘पे पार्किंग’मधून दुचाकींना वगळण्याचा मनपाचा निर्णय

पणजी महानगरपालिका शहरातील दोन प्रमुख मार्गांवरील पे पार्किंगमध्ये दुचाकी वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क न आकारण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ही माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
शहरातील वाहतुकीमध्ये शिस्त आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात १८ जून रस्ता आणि आत्माराम बोरकर या दोन प्रमुख रस्त्यावर पे पार्किंग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पे पार्किंगसंबंधी निविदा जारी करून ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पे पार्किंग योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

मिरामार सर्कल ते शारदा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर पे पार्किंग केले जाणार आहे. मिरामार सर्कल ते धेंपो महाविद्यालयापर्यंत वाहन पार्किंगवर बंदी घातली जाणार आहे. शहरात नागरिक व व्यापार्‍यांनी चार चाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहनांचा जास्त प्रमाणात वापर करावा या उद्देशाने दुचाकी वाहन चालकांकडून पार्किंग शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मडकईकर यांनी सांगितले.
महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी राबविलेल्या पे पार्किंगचे ठेकेदाराकडे २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने पे पार्किंग योजना राबविताना सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले. कॅसिनोमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वाहन पार्किंगसाठी जीटीडीसीच्या वाहन तळात सोय करण्यात आली आहे.