पेराल ते उगवते!

बागा – कळंगुट येथील एका आलिशान हॉटेलमध्ये चाळीस जणांच्या जमावाने घुसून जो काही धुडगूस घातला तो प्रकार अतिशय गंभीर आहे आणि सरकारच्या गृह खात्याने या गुंडगिरीच्या घटनेची अतिशय गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. या जमावाने अतिशय पूर्वनियोजीतरीत्या हा हल्ला चढवल्याचे एकूण घटनाक्रमावरून दिसते. पहाटे तीनच्या सुमारास हा दांडगटांचा जमाव हॉटेलमध्ये घुसला. मुख्य दरवाजा बंद करून त्यांनी आत धुडगूस घालून दहशत निर्माण केली. तेथील कॅसिनोतील महिला कर्मचार्‍यांचा विनयभंग केला, इतर कर्मचार्‍यांना जवळजवळ ओलीस ठेवले आणि सरतेशेवटी कोट्यवधींची रोकड आणि कॅसिनोतील चिप्स यावर डल्ला मारला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हा संपूर्ण जमाव परप्रांतीयांचा होता आणि त्यामध्ये काही महिला आणि अगदी तृतीयपंथीय देखील होते. या हॉटेलचा मालक आणि तेथे चालणार्‍या कॅसिनोचा चालक यांच्यातील वादातून हा सारा प्रकार घडला असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे देण्याघेण्याच्या वादातून कॅसिनोचालकाला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे सारे पद्धतशीरपणे घडवून आणले गेले असावे असे उपलब्ध माहितीवरून तरी दिसते, परंतु अशा प्रकारे सरेआम गुंडगिरीचा मार्ग जर एखाद्याकडून अवलंबिला जात असेल तर सरकार या बाबतीत केवळ बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसणार का हा खरा सवाल आहे. प्रस्तुत हॉटेलमालक परप्रांतीय. कॅसिनोचा चालक परप्रांतीय, धुडगूस घालणारे परप्रांतीय. बदनामी मात्र झाली आहे गोव्याची. या गुंडगिरीची गंभीर दखल गृह खात्याने घ्यायला हवी आणि कठोरातील कठोर कलमे यासंदर्भातील सर्व संशयितांवर लावली गेली पाहिजेत. हॉटेल मालक आणि तेथे चालणार्‍या कॅसिनोचा चालक यांच्यातील जो काही वाद असेल तो आधीच न्यायप्रवीष्ट आहे. त्यामुळे त्यासंदर्भात जो काही निकाल लागायचा तो न्यायालयात लागेल, परंतु जो काही प्रकार झाला तो एखाद्या देमार हिंदी चित्रपटातल्यासारखा आहे आणि पर्यटकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारा आहे. आधीच गोव्याच्या पर्यटनाला उतरती कळा लागलेली आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षात पर्यटकांची संख्या जवळजवळ अर्ध्याने खाली आली असल्याचे राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल दर्शवतो. अशा परिस्थितीत असली सामूहिक गुंडगिरी जर खपवून घेतली जाणार असेल तर गोव्यात यायला कोणताही कुटुंबवत्सल पर्यटक यापुढे धजावणार नाही. मुळात असे कौटुंबिक पर्यटक अलीकडे गोव्याकडे फिरकतही नाहीत, कारण सातत्याने येथील पर्यटनपट्‌ट्यामध्ये त्यांना येणारा अनुभव काही चांगला नसतो. देशी पर्यटकांची मद्यधुंद टोळकी, नंगे फकीर होऊन फिरणारे विदेशी पर्यटक स्त्री पुरूष, अमली पदार्थांची रेलचेल, नवी कॅसिनो संस्कृती यांनी गोव्याच्या पर्यटनाला असा काही विळखा घातलेला आहे की सुसंस्कृत पर्यटकांना गोव्यात यावेसेच वाटू नये. कौटुंबिक पर्यटक गोव्यापेक्षा शेजारील प्रदेशांना आज प्राधान्य दिसतात त्याचे कारण हेच आहे. मद्य आणि कॅसिनोच्या आकर्षणावरच जर आपण पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणार असू, तर असे गुलहौशी पर्यटकच येथे येणार! पेराल ते उगवते या न्यायाने आपणच लावलेल्या या विषवल्लीला असली विषारी फळेच लागणार! पर्यटनासंदर्भातील आजवरची नीती तपासून बघण्याची आता वेळ आलेली आहे. केवळ महसुलाच्या आशेने जे काही आजवर चालत आले त्याने गोव्याचे, येथील नव्या पिढीचे अपरिमित नुकसान केलेले आहे हे राजकारण्यांच्या ध्यानीही येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. कॅसिनोंवर गोमंतकीयांना बंदीची घोषणा कित्येक वर्षांपूर्वी झाली होती. आता त्याची अंमलबजावणी हे सरकार करायला निघाले आहे, परंतु ही असली वरवरची मलमपट्टी उपयोगाची नाही. गोव्याच्या पर्यटनाची प्राधान्ये तपासण्याची आवश्यकता आहे आणि नेत्यांनी विदेशांतील पर्यटन जत्रांना सहकुटुंब सहली काढल्याने गोव्याच्या पर्यटनाचा दर्जा वाढणार नाही. बागा मधील घटना हा गोव्याच्या पर्यटनाच्या भवितव्याच्या दृष्टीने धोक्याचा इशारा आहे. अशी गुंडगिरी मुळापासून मोडून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेचा धाक किनारपट्टीमध्ये निर्माण झाला पाहिजे. स्थानिकांकडून पर्यटकांवर हल्ले होण्याचे प्रकारही गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. आता परप्रांतीय येऊन स्थानिकांना बुकलून काढणार असतील तर अजबच प्रकार म्हणायला हवा. अशा प्रकारे जमाव पाठवून सरेआम गुंडगिरी करण्याची कोणाची मुळात हिंंमतच कशी होते? नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटामध्ये गोव्याला अमलीपदार्थांचे केंद्र असल्याचे दाखवण्यात आल्यावरून केवढा गहजब झाला. यापुढे गोव्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी देण्यापूर्वी चित्रपटाची कथा तपासून मगच परवानगी देण्यात येईल असे सरकारने जाहीर केले. पण गोव्याची खरी बदनामी चित्रपटांमुळे नव्हे, तर अशा प्रकारच्या खर्‍याखुर्‍या घटनांमुळे अधिक होते आहे. त्यामुळे बागातील घटनेच्या सूत्रधारावर अत्यंत कडक कारवाई सरकारने करावी आणि अशा गोष्टींना भविष्यात पायबंद घालावा.