पॅरिश यूथ नुवेला कुस्तोदिओ फुटबॉल चषक

मायरॉन बॉर्जीसच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर पॅरिश यूथ नुवेने अंतिम सामन्यात आंबेली स्पोर्ट्‌स क्लबचा ३-० अशा गोलफरकाने पराभव करीत राय स्पोर्टिंग क्लब आयोजित ४८व्या कुस्तोदिओ स्मृती आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
रायच्या पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या समान्यावर वर्चस्व मिळविताना पॅरिश यूथ नुवेने १२व्याच मिनिटाला मायरॉन बॉर्जीने नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. दुसर्‍या सत्रात ६९व्या मिनिटाला मायरॉनने संघाला २-० अशा आघाडीवर नेले. तर लगेच पुढच्या मिनिटाला मायरॉनने आपली हॅट्‌ट्रिक साधताना पॅरिश यूथ नुवेला जेतेपद मिळवून दिले.

विजेत्या पॅरिश यूथ नुवेला रु. ४८,००० व चषक तर उपविजेत्या आंबेली स्पोर्ट्‌स क्लबला रु. ३५,००० व चषक प्राप्त झाला.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते अवरलेडी ऑफ स्नोज चर्चचे फा. कॉन्सेंसिकाव सिल्वा आणि क्वाद्रोस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक इवाको क्वाद्रोस यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

वैयक्तिक बक्षिसे ः उत्कृष्ट स्ट्रायकर व अंतिम सामन्यातील पहिला गोल – मायरॉन बॉर्जीस (पॅरिश यूथ नुवे), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ – सीडीजे रायबंदर, अंतिम सामन्यातील उत्कृष्ट मध्यपटू – फ्रान्सिस कुलासो (पॅरिश यूथ नुवे), सर्वाधिक गोल – लॉयड कादोजो (राय स्पोर्टिंग क्लब), स्पर्धेतील उत्कृष्ट मध्यपटू – हेडन पिंटो (आंंबेली स्पोर्ट्‌स क्लब), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट बचावपटू – निक्लाव कुलासो (पॅरिश यूथ नुवे), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट स्ट्रायकर – नियाल कार्दोजो (आंबेली स्पोर्ट्‌स क्लब), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलरक्षक – बेन्नी सिल्वा (आंबेली स्पोर्ट्‌स क्लब).