पॅरिश युथ नुवेला ‘सुपर सॉकर’ जेतेपद

पॅरिश युथ नुवेने स्पोर्टिंग क्लब दवर्लीचा काल रविवारी टायब्रेकरद्वारे ५-३ असा पराभव करत ३०व्या सुपर सॉकर आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युनायटेड बॉईज ऑफ दांडो कोलवा यांनी बाणावली येथील सेंट जॉन दी बाप्तिस्टा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत उभय संघ १-१ असे बरोबरीत होते. जेसन वालिस याने ४७व्या मिनिटाला एससी दवर्लीला आघाडीवर नेणारा गोल झळकावला तर निकलाव कुलासोने नुवेला ५७व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. यानंतर उभय संघांनी गोल नोंदविण्याचे प्रयत्न केले. परंतु, निर्धारित वेळेत गोलकोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे टायब्रेकरचा वापर करावा लागला. टायब्रेकरवर इनासियो कुलासो, डागले फर्नांडिस व सिडार कुलासो यांनी नुवेकडून तर वाल्मिकी मिरांडा व आग्नेलो कुलासो यांनी दवर्लीकडून गोलजाळीचा वेध घेतला. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या पॅरिश युथ नुवेने ४० हजार रुपये व करंडकाची कमाई केली तर दवर्लीला ३० हजार व करंडकावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक बक्षिसे (अंतिम फेरी) ः सर्वोत्तम आघाडीपटू ः फ्रान्सिस कुलासो (नुवे), सर्वोत्तम बचावपटू ः निकलाव कुलासो (नुवे), सर्वोत्तम गोल ः जेसन वालिस (दवर्ली), सामनावीर ः इनासियो कुलासो (नुवे), सर्वोत्तम मध्यरक्षक ः वाल्मिकी मिरांडा (दवर्ली), सर्वोत्तम गोलरक्षक ः शॉन रॉड्रिगीस.
वैयक्तिक बक्षिसे (स्पर्धा) ः स्पर्धावीर ः व्हिक्टोरिनो फर्नांडिस (सेंट अँथनी असोल्डा), उदयोन्मुख खेळाडू ः वालेरियान डिसा (युबी दांडो कोलवा), पहिली हॅट्‌ट्रिक ः आल्बिनो परेरा (नुवे), सर्वोत्तम गोलरक्षक ः जॉन्सन फर्नांडिस (सेंट अँथनी असोल्डा), शिस्तबद्ध संघ ः नावेली व्हिलेजर्स युनियन.