पूर्वजन्म, अनुवंश आणि वातावरण

  • प्रमोद ग. गणपुले (कोरगाव)

प्रत्येक मुलावर त्याचा पूर्वजन्म, त्याची आनुवंशिकता आणि वातावरण यांचा फार मोठा प्रभाव असतो. आपल्या घरातलं वातावरण संस्कारक्षम आणि अभ्यासपूरक बनवणं हे शंभर टक्के आपल्या हातात आहे. ते कसं बनवायचं याचं थोडंसं शिक्षण घेतलं तर आपण ते निश्‍चितपणे करू शकू. त्यासाठी थोडा वेळ काढायला हवा.

शेवटी बंड्याने या वर्षीही नववीत आपटी खाल्लीच. गेल्या वर्षी त्याच्या बाबांनी त्याला कसाबसा सांभाळून घेतला होता. आता यावर्षीही पुन्हा तेच म्हटल्यावर त्याचे बाबा उसळलेच. एकुलता एक मुलगा शिकावा, मोठा व्हावा म्हणून केलेली सर्व धडपड पाण्यात गेली होती.

बाबांनी त्याला चांगलाच फैलावर घेतला, ‘‘अरे, तूच कसा असा पुन्हा पुन्हा नापास होतोस, तुलाच कसा अभ्यास जमत नाही, एरवी अभ्यास सोडून बाकी विषयात तुझं डोकं बरं चालतं. त्या कोरगावकरांचा संजू बघ, वडलांच्या दुकानात काम करूनसुद्धा फर्स्ट क्लास घेतो. तो बाजूचा मधू बघ, घरात मागच्या अनेक पिढ्यांत कुणीही शिकलेलं नाही. तरीसुद्धा चांगल्या मार्कांनी पास होतो. पलीकडची ती यमी बघ, तिचे वडीलही माहीत नाही, तिची आई लोकांची धुणी-भांडी करून पोट भरते, तरी यमी पहिल्या पाचांत येते. तुलाच काय अशी धाड भरलीय? का आमचं नावच मातीत घालायचं ठरवलंयस्?’’
आता बंड्याच्या बाबांचा संयम सुटत चालला होता. तेवढ्यात आई मध्ये पडली म्हणून प्रकरण जरा शांत झालं.
खरं तर बंड्याच्या बाबांचा त्रागा व्यर्थ होता. बंड्याची तुलना इतरांशी करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. प्रत्येक मूल स्वतंत्रपणे जन्माला येतं. त्याचा इतरांशी काहीही संबंध नाही. दोन मुलं कधीच सारखी नसतात. हा जो फरक पडतो, त्याचं कारण म्हणजे प्रत्येक मुलावर त्याचा पूर्वजन्म, त्याची आनुवंशिकता आणि वातावरण यांचा फार मोठा प्रभाव असतो.

आपल्या मुलाचे या जन्मापूर्वी अनेक जन्म झाले आहेत असं आपलं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. मागच्या अनेक जन्मांचे संस्कार आपल्या मनाला चिकटून आपल्याबरोबर येतात. पूर्वजन्मांच्या संस्कारातून आपला स्वभाव बनला आहे. एखादा माणूस प्रेमळ असतो तर एखादा रागीट असतो; एखादा मनमिळावू असतो तर एखादा वादावादी करण्यात पटाईत असतो; एखादा उदार तर एखादा स्वार्थी असतो. हे जे गुण-दुर्गुण आहेत ते मनुष्य जन्माला आल्यावर निर्माण होत नाहीत. प्रत्येक माणूस जन्माला येतानाच ते घेऊन येतो. पूर्व जन्मातले प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत. म्हणून आज वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत. स्वभाव, आवडी-निवडी, मनाचा कल ही पूर्व जन्मांची देणगी आहे. म्हणून तर दोन जुळी मुलंही, जी केवळ काही मिनिटांच्या फरकाने जन्माला येतात ती वेगवेगळी असतात. त्यांच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या असतात.

दोन जुळे भाऊ होते. त्यापैकी एक खूप सज्जन, प्रामाणिक आणि परोपकारी होता तर दुसरा मात्र एकदम विरुद्ध स्वभावाचा होता. तो चिडखोर, रागीट, भांडखोर, व्यसनी असा होता. एकदा सहज कुणीतरी या दुसर्‍या भावाला विचारलं, ‘‘काय रे, तुम्ही दोघे जुळे भाऊ, पण तू हट्टी, भांडखोर, व्यसनी आणि तो बघ कसा नीट वागणारा… तू असा कसा झालास?’’ तर तो म्हणाला, ‘‘मी लहान होतो तेव्हा आमची गरिबी होती. आई खूप कष्ट करायची, वडील काहीही करत नसत, उलट पिऊन मस्ती करायचे. पण आई मात्र त्यांची चांगली ऊठ-बस करायची. त्यांना बसल्या जागी काहीही न करता आयतं जेवण-खाण मिळायचं. मी लहान असताना हे बघायचो. तेव्हाच मी ठरवलं, आपणही बाबांसारखंच बसून खायचं. त्यासाठी धाकदपटशा दाखवावाच लागतो. म्हणून मी असा आहे.’’

हाच प्रश्‍न त्यानं पहिल्याला विचारला तर तो म्हणाला, ‘‘माझ्या लहानपणी आई खूप कष्ट करून आम्हाला सांभाळायची. तरीसुद्धा बाबा तिच्यावर ओरडायचे, तिला मारायचे. खूप प्यायचे ते. मला आईची कीव यायची. म्हणून मी तेव्हाच ठरवलं.. आपण मोठं झाल्यावर असं काहीही करायचं नाही, ज्यामुळे आपल्या घरातील माणसांना दुःख होईल! म्हणून मी हा असा आहे.’’ एकाला वडलांचा रूबाब आवडला तर दुसर्‍याला आईची दया आली. हा फरक कशाने पडला? मानसिकतेमुळे. ही मानसिकता बनली पूर्वजन्मांच्या संस्कारांमुळे.

आपल्या मुलांवर त्यांच्या पूर्वजन्मांचा जसा मोठा प्रभाव आहे तसाच आनुवंशिकतेचाही मोठा प्रभाव आहे. आनुवंशिकतेमुळे आपल्याला शरीर मिळतं. आपल्या शरीराचा संबंध केवळ आपल्या आई-वडलांशी नसतो तर मागच्या अनेक पिढ्यांशीही असतो. मुलांचा रंग, रूप, शरीराची ठेवण, उंच-बुटका, जाड-बारीक, काळा-गोरा या सार्‍या गोष्टी आनुवंशिकतेवर अवलंबून असतात. त्यामुळे ‘‘तूच कसा दिसायला असा? नाहीतर त्याला बघ…’’ या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार केला पाहिजे.

कधी-कधी सहज बोलताना आपण म्हणतो, ‘‘आमचा बाबू अगदी मामाच्या वळणावर गेलाय, आमची यमी अगदी आत्यासारखी बोलते, तो अगदी आपल्या वडलांसारखाच भर-भर चालतो.’’ हे जे साम्य आहे तोही आनुवंशिकतेचाच परिणाम आहे. यामधली एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर त्यात त्या मुलाची काय चूक? आपल्या मुलांच्या वागण्या-बोलण्यावर आई-वडलांचा, आपल्या घराण्याचा फार मोठा प्रभाव असतो. आपल्याकडे कोकणीत काही चांगल्या म्हणी आहेत, ‘‘फुडलां जोत तसां फाटलां जोत’’, ‘‘बी तसां भात’’ – या म्हणी एका अर्थानं आनुवंशिकतेचंच महत्त्व पटवतात. त्यामुळे एखादा मुलगा सावळा असला, बुटका असला, हडकुळा असला तर तो केवळ त्याचा दोष नाही… हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण! त्याचाही फार मोठा प्रभाव आपल्या मुलांच्या जीवनावर असतो. आपल्या घरांत किंवा आपल्या सभोवताली वातावरण कसं आहे त्यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. मुलं नेहमी अनुकरणांतून शिकतात. आपल्या घरातली माणसं कसं बोलतात, कसं वागतात, काय-काय करतात अशा सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आणि अनुकरण लहान मुलं करीत असतात. घरातली माणसंच शिव्या घालून बोलत असतील तर मुलंही तसंच बोलतील. घरातली माणसं आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर ठेवतील तर मुलंही मोठ्यांचा आदर ठेवतील. घरात रोज वर्तमानपत्र येत असतील, ती वाचली जात असतील तर मुलंही त्याचंच अनुकरण करतील. घरात सतत भांडणं-वादावादीच चालू असेल तर मुलंही भांडखोर आणि वादविवाद करणारेच बनतील. म्हणून घरांत चांगलं वातावरण ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी मुलांनी जसं बोलायला हवं, असं मोठ्यांना वाटतं.. तेच मोठ्यांनी बोलावं. मुलांनी जसं वागायला हवं, असं मोठ्यांना वाटतं… तसंच मोठ्यांनी वागावं. मुलांनी जे करायला हवं असं मोठ्यांना वाटतं… तसंच मोठ्यांनी करावं म्हणजे मुलं त्यांची नक्कल करतील. त्यामुळे पुढे निर्माण होणारे अनेक प्रश्‍न सुटतील.

पूर्वजन्मातून स्वभाव मिळतो; आनुवंशिकतेतून शरीर मिळतं आणि वातावरणातून संस्कार मिळतात. पहिल्या दोन गोष्टींत आपण कोणतीही ढवळाढवळ करू शकत नाही कारण ते आपल्या हातात नाही. परंतु वातावरण निर्माण करणं अजूनही आपल्या हातात आहे. आपल्या घरात अभ्यासपूरक वातावरण कसं निर्माण करता येईल याचा विचार करायला हवा.

घरांत रोज वर्तमानपत्र येत असेल, मुलांच्या हाताला मिळेल असं ठेवलेलं असेल तर मुलंही केव्हातरी सहजपणे उघडून बघतील. हळूहळू आवड निर्माण होईल. घर स्वच्छ असेल, सर्व वस्तू जागच्या जागी असतील, कोपर्‍यात डस्टबीन असेल तर आपोआपच स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त यांचा संस्कार होईल. भिंतीवर देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, साधुसंतांची चित्र असतील तर त्यांच्या रोजच्या दर्शनानेही मनावर उदात्ततेचे, राष्ट्रभक्तीचे संस्कार होतील. घरातल्या माणसांचे गप्पांचे विषयही समाज, देश, धर्म, ज्ञान असे असतील आणि ते मुलांच्या कानावर पडत असतील तर या विषयांची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होईल. घरासमोर छोटी बाग असेल, आपण मातीत काम करत असू, मुलांचा त्यात सहभाग असेल तर आपोआपच पर्यावरण रक्षणाचा संस्कार होईल. घरांत कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी असतील तर मुलांवर दया, करुणा, प्रेम याचे संस्कार होतील. घरी येणार्‍या, जाणार्‍या माणसांचं आदरातिथ्य होत असेल तर मुलांवरही तेच संस्कार होतील.

आपल्या घरातलं वातावरण संस्कारक्षम आणि अभ्यासपूरक बनवणं हे शंभर टक्के आपल्या हातात आहे. ते कसं बनवायचं याचं थोडंसं शिक्षण घेतलं तर आपण ते निश्‍चितपणे करू शकू. त्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. चला तर मग आपण आपल्या घरांत संस्कारक्षम आणि अभ्यासपूरक वातावरण निर्माण करण्याच्या कामाला लागू या!