पुलवामा : सोमवारच्या दशहतवादी हल्ल्यातील जखमी जवान शहीद

>> दहशतवाद्यांच्या पुलवामातील कारवाया सुरूच

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अरिहाल येथे सोमवारी वाहनामधून गस्त घालणार्‍या लष्करी जवानांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी ९ जवानांपैकी दोन जवानांची प्राणज्योत काल मालवली अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. दरम्यान अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत एक जवान काल शहीद झाला. तर या चकमकीत गेल्या १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दोन दहशतवादी ठार झाले.

सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. त्यात ९ जवानांसह दोन नागरिकही जखमी झाले होते. मात्र सदर प्रवक्त्याने सोमवारी दहशतवाद्यांचा तो अयशस्वी प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया दिली होती. जवानांना किरकोळ जखमा झाल्याचे त्याने म्हटले होते.

दहशतवाद्यांनी पोलीस स्थानकावर
हातबॉंब फेकला : अनेक जखमी
दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात काल एका गजबलेल्या मार्गावर दहतवाद्यांनी पोलीस स्थानकावर हातबॉंब फेकल्याने अनेकजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.