पुन्हा मोदी सरकारसाठी लोकांची तयारी
**BEST QUALITY AVAILABLE** Varanasi: Prime Minister Narendra Modi files his nomination papers from Varanasi Lok Sabha parliamentary constituency at collector's office, ahead of the 2019 general elections in Varanasi, Friday, April 26, 2019. (Twitter Photo/PTI)(PTI4_26_2019_000049B)

पुन्हा मोदी सरकारसाठी लोकांची तयारी

>> वाराणसीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा दावा

केंद्रात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भाजपसह एनडीएच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत येथील निवडणूक अधिकार्‍यांसमोर सादर केला.

भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, विदेश मंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल आदी नेत्यांसमवेत मोदी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर बनारस हिंदू विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य अन्नपूर्णा शुक्ला, जगदिश चौधरी, सुभाष चंद्र गुप्त व कृषी संशोधक राज शंकर पटेल यांनी सूचक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर मोदी यांनी सांगितले की, देशात सध्या आपल्या सरकारचेच वारे वाहत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सध्या उत्सवी वातावरण असून आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हेच खरे उमेदवार आहेत असे ते म्हणाले.

केंद्रात पुन्हा मोदी
सरकारसाठी लोक तयार
आपण सुशासनासाठी प्रामाणिकपणे काम केले असल्याने आपल्याला पुन्हा एकदा मोदी सरकार मिळावे यासाठी लोकांनी निर्णय घेतला आहे असा दावा त्यांनी केला.

पुढील ५ वर्षात
कामांची फळे मिळतील
वाराणसीत गुरुवारी आयोजिलेल्या रोड शो वेळी आपल्याला पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचे दर्शन घडले असेही मोदी यांनी स्पष्ट केले. गेली ५ वर्षे आपल्या सरकारने विविध कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यापुढील ५ वर्षांत या कामांची फळे चाखायला मिळतील असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेवर भर दिला. दहशतवादाला अत्यंत कठोरपणे प्रत्युत्तर दिले जाईल असे ते म्हणाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून मोदी यांनी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचा ३.३७ लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी कॉंग्रेसचे अजय राय हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. यावेळीही कॉंग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली आहे.