पुन्हा दहशत

0
153

एअर इंडियाच्या विमानांमध्ये आत्मघाती हल्लेखोर आज घातपात घडवून आणतील अशा धमक्या मिळाल्याने देशातील विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीचा हा ईमेल हे कोण्या पोराटोराचे काम असेल म्हणून दुर्लक्ष करता येत नाही, कारण आयएसआयएस आणि अल कायदा यांनी देशात घातपात घडवण्याचा मोठा कट रचलेला आहे अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना यापूर्वीच मिळालेली आहे. त्यामुळे अशी कोणतीही धमकी गांभीर्यानेच घ्यावी लागेल. आयएसआयएसच्या उदयानंतर जगभरातील दहशतवादी शक्तींचे मनोधैर्य वाढल्याचे दिसून आले आहे, कारण इराक व सिरियाच्या आयएसआयएसच्या कब्जातील भूमीमध्ये त्यांना हक्काचे आश्रयस्थान मिळू शकणार आहे. आयएसआयएस ही आज जगातील सर्वांत श्रीमंत दहशतवादी संघटना ठरलेली आहे, कारण जेव्हा त्यांनी इराक आणि सिरियाच्या भूप्रदेशावर कब्जा केला, तेव्हा तेथील कच्च्या तेलाच्या विहिरीही त्यांच्या ताब्यात आल्या. या तेल विहिरींमधून रोज काढले जाणारे तेल काळ्या बाजारात दलालांना सवलतीच्या दरात विकून आयएसआयएसच्या म्होरक्यांनी प्रचंड पैसा कमावलेला आहे अशी माहिती आता मिळत आहे. रोज पन्नास हजार बॅरल कच्चे तेल या विहिरींतून काढले जाते. म्हणजेच अब्जावधी डॉलरचा पैसा बिनबोभाट आयएसआयएसच्या खात्यात रोज जमा होतो आहे. आजवर अल कायदा वा तत्सम दहशतवादी संघटनांचे अर्थकारण हे धर्मवेड्या धनिकांच्या पैशावर बेतलेले असे. शस्त्रास्त्र तस्करी, अमली पदार्थ व्यवहार यातून येणारा गुन्हेगारी जगताचा काळा पैसाही दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जात असे. मात्र, स्वतःचे उत्पन्न स्त्रोत असलेली आयएसआयएस हे एक वेगळेच प्रकरण आहे आणि दिवसेंदिवस ते आर्थिकदृष्ट्या आणि शस्त्रास्त्रे, मनुष्यबळ, प्रभाव या सर्व दृष्टींने अधिकाधिक प्रबळ बनत चाललेले आहे. जगभरातील इस्लामी धर्मांधांना आयएसआयएसने भारल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातल्या दोन खेड्यांमधील दोघेजण आयएसआयएसला सामील होण्यासाठी चालले असताना हैदराबादेत संशयावरून ताब्यात घेतले गेले. त्यांना फेसबुकवरून जाळ्यात पकडून जिहादसाठी चिथावले गेले होते. आयएसआयएस आणि जगभरातील तिचे समर्थक धर्मवेड्या तरूणांना आपल्या जाळ्यात अडकवून जिहादसाठी प्रवृत्त करण्यासाठी फेसबुक आणि तत्सम सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांनाच नव्हे, तर जगभरातील तरुणींना सोशल मीडियाद्वारेच ‘जिहाद अल निकाह’ साठी प्रेरित करण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर होऊ लागलेला आहे आणि त्याला भुलून पाश्‍चात्त्य देशांतील अठरा ते पंचवीस वयोगटातील कित्येक तरुणी इराक आणि सिरियाकडे पलायन करू लागल्या आहेत. आयएसआयएसला सामील झालेल्या तरूण – तरुणींमध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्पेन, बेल्जियम अशा विविध देशांतून आलेल्यांचा समावेश आहे. भारतामध्ये आयएसआयएसचे वेड कसे पसरू लागले आहे त्याचे दाखलेही गेल्या काही महिन्यांत मिळालेच आहेत. मुंबईहून काहीजण आयएसआयएसला जाऊन मिळाले, श्रीनगरमध्ये त्याचे झेंडे नाचवले गेले, तामीळनाडूमध्ये आयएसआयएस असे लिहिलेले टी शर्टस् घालून फोटो काढले गेले, इतकेच काय, लखनौतून आयएसआयएसला जाऊन मिळालेल्या आणि भारतात परतलेल्या तरुणांचा परतल्यावर जोरदार सत्कारही झाला. या सगळ्या घटना निश्‍चितच चिंताजनक आहेत. अल कायदाने भारतात आपली शाखा स्थापन केल्याची घोषणा केलेलीच आहे. या दोन्ही संघटनांमध्ये वर्चस्वावरून चढाओढ सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या, परंतु दोघांनी मिळून घातपाती कारवाया घडवण्याचा खरोखरच कट आखलेला असेल तर त्यातून भविष्यातील धोक्यांची चाहुल लागते. हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्या कल्पनेपलीकडच्या शस्त्रास्त्रांचा आणि माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. इराकी सैनिकांविरुद्ध आयएसआयएसने क्लोरीनयुक्त स्फोटकांचा वापर केला होता. त्यामुळे रासायनिक, जैविक शस्त्रास्त्रांपासून इलेक्ट्रॉनिक गॅजेटस्‌पर्यंत सुसज्ज असलेल्या आधुनिक दहशतवाद्यांचा आपल्याला सामना करायचा आहे याची नोंद सुरक्षा यंत्रणांनी घ्यायला हवी. आव्हान मोठे आहे आणि त्याचा मुकाबला सोपा नाही.