पुन्हा अण्णा

विद्यमान नरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध काही करीत नसल्याने आपण या सरकारविरूद्ध पुन्हा आंदोलन ललकारणार आहोत, अशी घोषणा अण्णा हजारेंनी नुकतीच केली आहे. गेले वर्षभर प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिलेले अण्णा या निमित्ताने पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. अण्णांची भूमिका प्रामाणिक आहे यात शंकाच नाही, परंतु त्यांचा आजवर धूर्त माणसांनी कसकसा वापर करून घेतला हा सारा अनुभव गाठीस असतानाही आपण पुन्हा त्याच चुका करणार आहोत का याचा विचार त्यांनी आधी करायला हवा. ‘‘मै भी अण्णा, तुमभी अण्णा’’ म्हणत अण्णांभोवती फेर धरणारी मंडळी त्यांची आणि त्यांच्या आंदोलनाची शिडी वापरून विनासायास राजकारणात जाऊन पोहोचली. सत्तेचे सोपान चढली. अण्णांचा वापर केवळ स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी केला गेला. अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा आम आदमी पक्षाचा संकल्प केला, तेव्हा अण्णांच्या आंदोलनातून घडलेला पक्ष असेच स्वरूप त्याला देण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. राजकारणात भली माणसे कोणी असतील तर ती फक्त आम आदमी पक्षातच आहेत, असा आव आणला जाऊ लागला. पक्षप्रसिद्धीसाठी अण्णांची छायाचित्रेही वापरली जाऊ लागली, तेव्हा स्वतः अण्णांवर आपली छायाचित्रे वापरू नका असे सांगण्याची वेळ आली. त्यावेळी त्यांच्यासोबत राहिलेल्या किरण बेदी बघता बघता मोदींच्या प्रशंसक बनल्या आणि संधी मिळताच हळूच दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचल्या. आता केजरीवाल आणि त्या दिल्लीच्या मैदानात आमनेसामने आल्या आहेत. अण्णांनी जनलोकपालसाठी पुकारलेले आंदोलन हे ऐतिहासिक होते यात शंका नाही, परंतु ती त्या घडीची गरज होती. घोटाळ्यांमागून घोटाळे घडत होते. सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला होता. त्यावेळी हे सारे थोपवणारा कोणी तरी पुढे यायला हवा असे समाजाच्या सर्व थरांतील लोकांना वाटत होते. अशा नेमक्या वेळी अण्णा हजारे नावाचा निष्कलंक फकीर समोर आला आणि जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. जो प्रतिसाद तेव्हा अण्णांना लाभला तो अभूतपूर्व होता. मीडियानेही तेव्हा त्यांना डोक्यावर घेतले. जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या अण्णांना अटक करण्याची घोडचूक तत्कालीन सरकारने केली आणि अण्णांच्या पाठीशी अवघा देश उभा राहिला. तिहारमधून थेट रामलीला मैदानाकडे निघालेला तो विराट मोर्चा आठवा. ‘जनता आती है’ चा तो महासाक्षात्कार होता. परंतु एवढे मोठे जनसमर्थन असूनही अण्णांच्या त्या आंदोलनाचा पुढे फजितवडाच झाला. त्यांच्या आंदोलनाची सारी सूत्रे ‘टीम अण्णा’ कडे गेली आणि अण्णा हे त्यांच्या हातचे मोहरे बनून उरले. त्यांच्या प्राणांतिक उपोषणाची सूत्रे त्यांच्या स्वतःकडे आहेत की नाहीत असा प्रश्न जनतेला पडला होता. अण्णांच्या वागण्या बोलण्याला हळूहळू प्रति गांधीजी असल्याचा डौल येऊ लागला. ते स्वतःवरच खुश दिसू लागले. ज्या वेगाने अण्णा देशाच्या केंद्रस्थानी आले होते, तेवढ्याच वेगाने ते पुन्हा राळेगणसिद्धीच्या रानात फेकले गेले. माध्यमे त्यांना विसरली. अण्णांचे नाव घेत पुढे आलेली मंडळी अण्णांना मागे सारून स्वतः खुशाल सत्तोपभोगामागे लागली. त्यामुळे दुसर्‍या वेळी जेव्हा अण्णा आंदोलनासाठी पुढे झाले, तेव्हा त्यांना जनतेचा अल्प प्रतिसाद लाभला. आता पुन्हा एकवार अण्णा आंदोलनाची भाषा बोलत आहेत. परंतु जे आधी घडले, त्याचीच पुनरावृत्ती अण्णा होऊ देणार आहेत का? या देशाची गलीच्छ राजकीय व्यवस्था स्वच्छ झाली पाहिजे असे अण्णांना वाटते. आपल्या त्या भूमिकेशी ते प्रामाणिक आहेत. त्यामुळे सरकार कॉंग्रेसचे असो किंवा भाजपचे असो, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा आग्रह अण्णा धरत असतील, तर ते त्यांच्या निष्पक्षतेचेच प्रतीक मानावे लागेल. ‘‘कदाचित दहा, बारा, पंधरा वर्षे लागतील, पण कधीतरी अशी वेळ येईल की लोक पक्षापलीकडे जाऊन विचार करतील आणि ५४३ भली माणसे खासदार म्हणून निवडतील आणि देशात खरी लोकशाही येईल’’ हा अण्णांचा भाबडा विश्वास आहे. पण त्यांच्याभोवती गोळा होणार्‍या मंडळींच्या प्रामाणिकपणाची आणि निःस्पृहतेची हमी कोण देणार? पुन्हा एकदा अण्णा आपली शिडी होऊ देणार आहेत का?