ब्रेकिंग न्यूज़
पुत्रवती भव!

पुत्रवती भव!

  •  सरिता नाईक
    (फातोर्डा-मडगाव)

खरं तर स्त्रीपुरुषांचं प्रमाण समसमान असलं पाहिजे तरंच सृष्टीचा समतोल राखला जाईल. पण सध्या परिस्थिती अशी आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुषांना जीवनसाथी मिळणं कठीण होऊ लागलं आहे. असंच जर चालू राहिलं तर कठीण आहे भावी पिढीचं!

शुभ्रा आणि सोहमचा विवाह संपन्न झाला. त्यांनी जोडीने आईबाबांना नमस्कार केला. बाबा म्हणाले, ‘‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव!’’ आई म्हणाली, ‘‘इष्टपुत्रा सौभाग्यवती भव!’’
खटकतंय ना काहीतरी? मला तरी खटकलं. अहो, त्या अष्टपुत्रांपैकी एक तरी कन्या होऊ दे असा आशीर्वाद का नाही दिला? किमान आईने तरी ‘कन्यावती भव’ असा आशीर्वाद का नाही बरं दिला?
अगदी पुराणकाळापासून आशीर्वाद देताना ‘कन्यावती भव’ असा आशीर्वाद कुणी दिल्याचे ऐकीवात नाही. देवांची स्तोत्रं म्हणताना तुमच्या लक्षात कदाचित आलं असेल- ‘पुत्रार्थी लभते पुत्रान्’ म्हणतात. पण ‘कन्यार्थी लभते कन्या’ असं नाही म्हणत. मागणं मागतानासुद्धा ‘पुत्रान् देही धनम् देही’ असतं कन्या देही’ असं कुठंही माझ्या वाचनात आलेलं नाही.

‘पुत्रवान् गुणवान् श्रेष्ठो भोग भोक्ताच मानवा’ किंवा रामदासस्वामींनीसुद्धा मारुती स्तोत्रात हे स्तोत्र पाठ केल्यास ‘पुत्र-पौत्र’ प्राप्त होतील असंच लिहिलं आहे. पुराणकाळी पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्ठी’ यज्ञ केला जायचा. पण ‘कन्या कामेष्ठी’ यज्ञ कोणीही केला नाही. असं का बरं असावं??
एखाद्या जोडप्याला पाच-सहा मुली झाल्या तरी मुलगा व्हावा म्हणून परत चान्स घेतला जातो. पण एक किंवा दोन मुलगेच झाले तरी मुलीसाठी म्हणून परत चान्स घेतला जात नाही. इतकी का मुलगी बिनमहत्त्वाची असते?

खरं तर मुलीशिवाय घराला शोभा नसते हे कुणीही कबूल करेल. मुली जशा आपल्या आईवडिलांची, कुटुंबियांची काळजी घेतात तशी काळजी घेणारी मुले (पुत्र) विरळाच असतात. विवाहानंतरसुद्धा मुली स्वतःच्या आईवडिलांची काळजी पूर्वीइतक्याच आस्थेने घेतात. काही दुखलं खुपलं तर धावून येतात. आई आपलं हृदय मुलीजवळ जसं मोकळं करू शकते, तशी मुलाजवळ नाही मोकळं करू शकत. मोठेपणी मुलगी आईची मैत्रीण बनते. ती आईच्या जास्त जवळ येते. मुलगा मात्र मोठा होईल तसा दुरावत जातो.

आईच्या मनातील विचार मुलीला न सांगताही समजतात पण मुलाला सांगूनही उमजत नाही. मुलगी म्हणजे अंगणातील वृंदावन आहे; ज्याच्याशिवाय घराला घरपण नसतं.
अशी ही मुलगी जन्मल्यानंतर मुलाचा जन्म झाल्यावर जसा आनंदोत्सव साजरा होतो तसा होत नाही. शेवटपर्यंत… मुलगा होऊ दे रे देवा… अशी प्रार्थना केली जाते. मुलगी होऊच नये असा प्रयत्न केला जातो. आईच्या गर्भातच तिचा नष्ट केले जाते… हे किती भयंकर आहे!!

संसारात स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच महत्त्वाचे असतात. स्त्रीशिवाय पुरुष आणि पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. संसार स्त्री आणि पुरुष या दोघांचाही असतो पण संसार सुंदर होतो तो स्त्रीमुळे. संसाराची काळजी पुरुषांपेक्षा स्त्रीच जास्त चांगली घेऊ शकते. संसारात रंग भरणारी तीच असते आणि आनंद निर्माण करणारी तीच असते. आपल्या मुलांना सांभाळण्याचं, त्यांना संस्कारांचं बाळकडू पाजण्याचं कार्य स्त्रीएवढ्या क्षमतेने पुरुष करूच शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला तरी स्त्रीइतक्या सहजतेने त्याला ते जमत नाही. कारण ती एक सहजप्रवृत्ती आहे, जी स्त्रीमध्ये उपजतच असते. याला काही मोजकेच पुरुष अपवाद असतात.

चार दिवस बाई घरात नसली तर घराचा भंगारखाना होतो. एक वस्तू जागेवर सापडत नाही. घरातला व्यवस्थितपणा, स्वच्छता, टापटीप हे सगळंच स्त्रीवर अवलंबून असतं. स्त्री नसलेल्या घराला घरपण असत नाही. इतकं सारं असूनही पुरुषाला कधीच वाटत नाही की खरंच स्त्री आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे! पुत्र जन्माला येण्यासाठी कुठंतरी कन्याही जन्माला यावी लागते. पुत्र झाल्यावर त्याचा संसार फुलवण्यासाठीही कुठंतरी कन्या जन्मावी लागते.. हे का लक्षात घेतलं जात नाही?
पूर्वीच्या काळी पुरुषांनी अर्थार्जन करायचं आणि स्त्रियांनी घरात स्वयंपाक-पाणी, मुलाबाळांचा सांभाळ, त्यांना संस्कारक्षम बनवणं, पाहुण्यांची आवभगत करणं, सणसमारंभ साजरे करून आपली संस्कृती टिकवणं हे सगळं करायचं अशी पद्धत होती. पण ही इतकी महत्त्वाची काम करूनसुद्धा अर्थार्जन करणार्‍या पुरुषालाच जास्त महत्त्व दिलं जायचं. समाजात स्त्रियांचं स्थान गौणच होतं.

आता तर पुरुषांच्या जोडीने, किंबहुना त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन स्त्रिया अर्थार्जन करत आहेत. काबाडकष्टाची कामेही करतात आणि संसारही सांभाळतात. आता असे एकही क्षेत्र सापडणार नाही की जिथे स्त्रिया नाहीत. ती घर सांभाळते, ती ऑफिसमध्ये नोकरी करून उच्चाधिकारापर्यंत पोहचते. ती व्यापार-उद्योगही करते. ती हरएक प्रकारचे वाहन, अगदी विमानसुद्धा चालवते. ती लष्करामध्ये काम करते. आता तर स्त्रिया प्रत्यक्ष युद्धात पुरुषांच्या बरोबरीने भाग घेत आहेत म्हणे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना अग्नी देणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणं ही पुत्राची मक्तेदारी समजली जायची पण आता ते कार्यही कन्या करू लागल्या आहेत. तरीही मुलीचे महत्त्व कमी का? हल्लीच माझ्या एका मैत्रीणीचे यजमान वारले. तिला तीन विवाहित मुली आहेत, त्या येऊन- जाऊन तिची काळजी घेतात. पण तिला वाटतं की एखादा मुलगा-सून असती तर आपल्याला हक्काची कायमची सोबत मिळाली असती. तिला कदाचित हे माहीत नसावं की तीन तीन मुलगे असूनही बर्‍याच जणी एकाकी आहेत.
जास्त वाईट याचं वाटतं की स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू बनतात. सासू सुनेला त्रास देते तर काही ठिकाणी याउलट सासूला सूनेचा जाच होतो. नणंद भावजयीला पीडते, भावजयही नणंदेला पीडते. गर्भजलपरीक्षा करून मुलीचा गर्भ नष्ट करण्यास भाग पाडण्यास एखाद्या सासूचाच हात जास्त असतो असे म्हणतात.

मुलीपेक्षा मुलगा महत्त्वाचा मानला जातो याचं एक ताजं, प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण- सात-आठ महिन्यांपूर्वी मी मातृछायेच्या रुग्णाश्रयात कार्य करत असतानाची गोष्ट. एके दिवशी दोन माणसं रुग्णाश्रयात आली. त्यांना मातृछायेमधून दत्तक मूल- मुलगा हवा होता. मी त्यांना मूल दत्तक घेण्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती, नियम वगैरे सांगितले. आणि त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला मूल होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे का?’’ त्यावर त्यातला एक माणूस म्हणाला, ‘‘अहो, आजच मला गो.मे.कॉ.(जीएमसी) मध्ये तिसरी मुलगी झालेली आहे. तिला मातृछायेमध्ये देऊन त्यांच्याकडून मुलगा दत्तक घ्यायचा असे आम्ही ठरवले आहे. हे ऐकून थोडा वेळ मी अगदी सुन्नच होऊन गेले. काही वेळाने मी त्यांना विचारले, ‘‘कायहो, असं करायला मुलीची आई तयार आहे का?’’ तर म्हणाला, ‘‘आम्ही अजून विचारलं नाही. पण आम्ही तिला तयार करू.’’
यावरून बघा मुलासाठी स्वतःच्या बीज, रक्त, मांसाच्या मुलीचा त्याग करून, तिला अनाथ बनवून तिच्या आईच्या मनात एक कायमचा सल ठेवून पुत्र प्राप्त करण्याची त्यांची तयारी होती. आम्ही त्यांना खूप समजावून सांगून पाठवलं खरं पण कोण जाणे पुढं त्यांनी काय केलं ते!

खरं तर स्त्रीपुरुषांचं प्रमाण समसमान असलं पाहिजे तरंच सृष्टीचा समतोल राखला जाईल. पण सध्या परिस्थिती अशी आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुषांना जीवनसाथी मिळणं कठीण होऊ लागलं आहे. असंच जर चालू राहिलं तर कठीण आहे भावी पिढीचं!