ब्रेकिंग न्यूज़

पुतळ्यांच्या ठरावांचा कामकाजात समावेश न करण्याचा निर्णय

>> अन्य खासगी ठराव विधानसभेत स्वीकृत

पर्वरी येथे विधानसभा संकुलात पुतळ्याची मागणी करणारे पाच खासगी ठराव आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या खासगी कामकाजात समाविष्ट न करण्याचा निर्णय विधानसभेने काल घेतला.

येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी खासगी ठरावाची नोटीस दिली होती. भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मगोपचे आमदार दीपक पाऊसकर यांनी डॉ. राम मनोहर लोहीया आणि टी.बी. कुन्हा या स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे उभारण्याच्या खासगी ठरावाची नोटीस दिली होती.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुतळ्याचा विषय चर्चेचा बनला. पुतळ्यांच्या विषयावरून काही राजकारण्यांनी परस्परांवर आरोप – प्रत्यारोप सुध्दा केले. नवीन पुतळे उभारण्यासाठी राजकारण्याकडून मोर्चेबांधणी करण्यात आली. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत पर्वरी येथे विधानसभा संकुलात आणखी पुतळे उभारण्यास विरोध करणारा ठराव संमत केला. त्यामुळे विधानसभेच्या आवारात पुतळे उभारण्याच्या खासगी प्रस्तावावर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे तमाम जनतेचे लक्ष लागले होते.
पर्वरी येथे विधानसभा संकुलात पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा उभारताना या संकुलात आणखीन कुणाचाही पुतळा उभारण्यास मान्यता न देण्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे.

सभापती डॉ. सावंत यांनी पुतळ्याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. पुतळ्याचे सर्व खासगी ठराव कामकाजात समाविष्ट न करण्याच्या निर्णयाबाबत सभापती डॉ. सावंत अधिवेशनात सविस्तर विश्‍लेषण करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या शुक्रवारच्या कामकाजासाठी सादर केलेले पुतळ्याचे पाच खासगी ठराव कामकाजात नसतील. आमदारांनी दिलेले इतर खासगी ठराव विधानसभेने स्वीकारले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पुतळ्यासाठी प्रयत्न
सुरूच ठेवणार ः सरदेसाई
पुतळ्याचे खासगी ठराव कामकाजात समाविष्ट न करण्याबाबत सभापतीनी आपल्या अधिकारात निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोवा फॉरवर्ड जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यासाठी सर्वांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सर्व थरांवर प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.