ब्रेकिंग न्यूज़

पुढे काय?

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधून गोव्यात घरी आणले गेले आहे आणि त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. आजवर आपल्या आजारपणातही दाबोळीत उतरल्यानंतर तरतरीतपणे बाहेर चालत येणार्‍या ह्या माणसाला ज्या प्रकारे रुग्णवाहिकेतून गलितगात्र स्थितीमध्ये त्याच्या घरापर्यंत नेण्यात आले, ते दृश्य न पाहवणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे होते. कोणाच्याही आयुष्यामध्ये कमी अधिक आजारपण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर येत असते, परंतु पर्रीकर यांची आजवरची गोव्यातील राजकीय कामगिरी, त्यांचा उत्साह आणि आवेश, बुद्धीची चमक वर्षानुवर्षे अनुभवलेल्या गोमंतकीयांना त्यांच्या या जर्जर अवस्थेचा हा धक्का पचवणे खरोखरच जड गेले असेल यात शंका नाही. काल त्यांची प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात आले, परंतु त्याबाबत जी आत्यंतिक गोपनीयता सतत बाळगली जात आहे ती अनावश्यक आणि अकारण अफवांना आमंत्रण देणारी आहे. त्यांची प्रकृती जर इतकी खालावलेली असेल तर अशा व्यक्तीवर या स्थितीत मुख्यमंत्रिपदाचा भार राहू देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला गेला तर ते चूक नाही. केवळ राजकारणासाठी आणि पक्षाच्या फायद्यासाठी अशा प्रकारे या देहाची परवड करणे योग्य नाही. त्यांची प्रकृती सुधारेपर्यंत त्यांनी विश्रांती घ्यायला हवी असे म्हणणार्‍या जनतेला प्रशासनामधील सध्याची निर्नायकीही दूर व्हायला हवी आहे. पर्रीकरांच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीत भाजपा सध्या नेतृत्वहीन बनला असल्याने दोन्ही घटक पक्षांची सद्दी चाललेली दिसते आहे. त्यातून प्रशासनातील विसंवादही जनतेसमोर येऊ लागला आहे. हे असे किती काळ चालणार आहे? शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्ती नव्हे. व्यवस्था अधिक महत्त्वाची असते. गोव्याने आजवरच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक स्थित्यंतरे पाहिली. मध्यंतरी कमालीचे अस्थिर पर्वही गोव्याच्या राजकारणामध्ये येऊन गेले. सकाळी मुख्यमंत्री असलेला संध्याकाळी असेल की नाही याची शाश्‍वती नसलेल्या त्या काळामध्येही प्रशासन जेवढे ढेपाळले नसेल, तेवढे ते आज ढेपाळल्याची जनभावना बनलेली आहे. केवळ एक मनोहर पर्रीकर नावाचा एकखांबी तंबू नसल्याने सरकारची ही अवस्था झालेली आहे हे खेदजनक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत संघ परंपरेतून आलेल्या पक्षाच्या अनेक नेत्यांचे पानीपत झाले आणि पक्षापाशी नेतृत्वाची दुसरी फळीच नसल्याचे उघडे पडले. विद्यमान सरकारमध्ये जी मंडळी आहेत ती एक तर दुसर्‍या पक्षातून आयात झालेली आहेत किंवा प्रशासनाच्या बाबतीत अननुभवी तरी आहेत. सर्वांना आणि विशेषतः घटक पक्षांना सोबत घेऊन जाऊ शकणारा सरकारमध्ये तरी दुसरा कोणी नाही. अशा वेळी पक्ष आणि सरकारपुढील अडचणी वाढणे अपरिहार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी दोघा आजारी मंत्र्यांना डच्चू दिला आणि अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना पालवी फुटली. दबलेले आवाज बोलू लागले. मंत्रिपदासाठी दिल्ली वार्‍या सुरू झाल्या. मुख्यमंत्री आपल्याजवळील अतिरिक्त खातेवाटप करणार आहेत म्हटल्यावर त्यातही सुप्त सुंदोपसुंदी सुरू झाली. महत्त्वाच्या खात्यांवर अनेकांचा डोळा आहे. दोन दिशांना दोन तोंडे घेऊन चाललेल्या मगो आणि गोवा फॉरवर्डने आजवर मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वासाठीच या सरकारला पाठिंबा दिल्याचे वेळोवेळी सांगितलेले आहे. अशा वेळी सरकार – वजा – पर्रीकर म्हणजे शून्य तर नव्हे ना असा प्रश्न जनतेला पडला तर त्यात चुकीचे काही नसेल. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत आजवर दाखवलेला समंजसपणा दाखवून दोन्ही घटक पक्षांनी आणि अपक्षांनी ह्या सरकारच्या स्थैर्याची ग्वाही गोव्याला दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे आजारपण गोव्याने गेले आठ महिने अनुभवले, त्यातले चढउतार पाहिले. आधी लीलावतीतून, नंतर अमेरिकेतून, नंतर एम्समधून आपल्या आजारी अवस्थेतही पर्रीकर यांनी नाना प्रकारे मुख्यमंत्रिपदाचा कारभार वाहिला. जनतेनेही त्याला आक्षेप घेतला नाही. सहानुभूतीनेच त्याकडे आजवर पाहिले. परंतु असे किती काळ चालणार? सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि ती तशीच चालत राहायला हवी. सहानुभूतीचे रूपांतर आता नाराजीमध्ये होऊ लागले आहे. अशा वेळी पुढे काय होणार हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. पर्रीकरांची प्रकृती खरोखरच सुधारत असेल आणि ते पुन्हा कार्यमग्न होणार असतील तर ती चांगलीच बाब आहे, परंतु तसे होणार नसेल तर? ते या त्यांच्यावरील आणि गोव्यावरील संकटातून पूर्णपणे बरे व्हावेत हीच जनतेची इच्छा आहे, परंतु त्यांना त्यासाठी उसंत देणेही गरजेचे आहे. त्यांच्या तब्येतीचा, त्यांच्या कुटुंबाचा विचारही व्हायला हवा. केवळ राजकारण, सत्ता, सरकार, पक्ष याचा विचार करून चालणार नाही. येणार्‍या परिस्थितीला सामोरे जात काय करता येईल, सामंजस्याने आणि सहकार्याने या पुढची वाटचाल कशी करता येईल याबाबत विचार करून तसा विश्वास जनतेला देणे ही सरकारमधील सर्व घटकांची जबाबदारी आहे. सध्याची राजकीय अनिश्‍चितता एकदाची संपावी!