पुढच्यास ठेच..

‘कॅफे कॉफी डे’च्या माध्यमातून कॉफीला प्रतिष्ठा आणि व्यावसायिक मोल मिळवून देणारे बी. जी. सिद्धार्थ यांच्यावर आत्महत्येची वेळ ओढवणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. व्यवसायात आपण अपयशी ठरलो, आपल्यावर कर्जदात्यांचा दबाव होता, आयकर विभागाकडून आपला छळ होत होता, त्यामुळे आपण हा तणाव सहन करू शकत नाही अशा आशयाचे पत्रही त्यांच्या घरी आढळले आहे. वरवर पाहता सफल भासणार्‍या एखाद्या व्यवसायाच्या मुळाशी किती ताणतणाव असू शकतात याचे विदारक व तितकेच धक्कादायक दर्शन यातून घडते आहे. एखाद्या व्यावसायिकाने व्यावसायिक ताणतणावांतून आत्महत्या करण्याची ही काही पहिली घटना नाही. आजवर असंख्य छोट्या मोठ्या उद्योजकांवर अशा प्रकारची वेळ ओढवल्याच्या दुःखद घटना घडलेल्या आहेत. कष्टाने व्यवसाय वाढवत नेत असताना कधी कधी तो आपल्या आवाक्याबाहेर कधी गेला हे त्याच्या प्रवर्तकाच्या लक्षात येत नाही आणि मग अचानक उद्भवलेल्या एखाद्या विपरीत परिस्थितीमधून सावरायचे कसे हे न उमगल्याने सगळे दोर कापलेल्या स्थितीत नैराश्याने घेरले जाताच मग स्वतःचा जीव संपविण्याचा टोकाचा मार्ग अनुसरला जातो. आपल्या देशात कर्जदात्या बँकांना हजारो कोटींना बुडवूनही काही गेंड्याच्या कातडीचे लोक विदेशात पळून जाण्याचा सोपा मार्ग अनुसरत आले आहेत हा भाग वेगळा, परंतु सर्वसाधारण व्यावसायिकाला असे अपयश आणि त्यातून येणारे नैराश्य पचवणे जड जात असते. सिद्धार्थ यांच्यावर हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का ओढवली हे काही आपल्यापुढे पुरते स्पष्ट झालेले नाही. त्यांचे व्यावसायिक साम्राज्य प्रचंड आहे. ‘कॅफे कॉफी डे’ची देशभरातली सतराशे आस्थापने, हजारो एकरच्या कॉफीच्या बागायती, चिकमगळूर आणि कबिनीतल्या ‘सेराय’ सारखे सप्ततारांकित रिसॉर्टस्, रिअल इस्टेट, एसईझेड, आयटी पार्क वगैरे नानाविध क्षेत्रांमध्ये त्यांचे साम्राज्य विस्तारलेले होते. दोन वर्षांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्यावर करबुडवेगिरीचा आरोप करीत पंचवीस ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. सिद्धार्थ यांच्या व्यवसायाची गुंतागुंत लक्षात घेता खरोखरीच त्यांच्याकडून करबुडवेगिरी झाली होती का आणि त्यांचा आयकर विभागाकडून छळ चालला होता का हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे, परंतु त्यांच्यावरील एकूण कर्जाचे प्रमाण आणि प्रत्यक्षातील त्यांची त्याहून कितीतरी पट अधिक असलेली संपत्ती पाहता त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलण्याची खरोखर गरज होती का हाच प्रश्न या घडीला सर्वांना पडलेला आहे. मध्यंतरी आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. ‘माइंडट्री’सारख्या आयटी कंपनीतील स्वतःचे भागभांडवल त्यांनी एल अँड टीला विकून बत्तीसशे कोटी मिळवले होते. ‘कोकाकोला’शी त्यांच्या हातमिळवणीच्या वाटाघाटी सुरू होत्या. असे असताना आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत त्यांनी जाणे धक्कादायक ठरते. ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आहेत, त्यामुळे त्यांचा राजकीय कारणांसाठी छळ होत होता असे म्हणावे तर कृष्णा हे मूळचे कॉंग्रेसजन असले तरी सध्या भाजपामध्ये आहेत. शिवाय सिद्धार्थ हे मुळात एका सधन कॉफी बागायतदाराच्या कुटुंबातील होते व त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर हा व्यवसाय मोठा केला होता. प्रतिष्ठेच्या शोधात असलेल्या नवश्रीमंत तरुणाईला त्यांनी ‘कॉफी डे’ची चटक लावली. एक गोष्ट मात्र या सार्‍या प्रकरणातून प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे भारतामध्ये उद्योग व व्यवसायांबाबत सरकारची भूमिका ही अधिक पारदर्शी व साह्यकारी असणे आवश्यक आहे. एकीकडे ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ ची बात करायची आणि दुसरीकडे राजकीय कारणांखातर आयकर आणि ईडीचा ससेमिरा मागे लावायचा हा दुटप्पीपणा देशात फार चालला आहे. शिवाय उद्योग व्यवसायाशी संबंधित नानाविध कायदे कानून आणि त्यातून उद्योजकांची होणारी ससेहोलपट यातून कर्तृत्ववान माणसेही नाउमेद झाल्याखेरीज राहत नाहीत. शेवटी शिखरावर पोहोचलेला माणूस तिथे एकटाच असतो. त्याला एकट्यानेच तिथल्या वादळवार्‍याला तोंड द्यायचे असते, टिकायचे असते. सरकारने अशाश्‍वत परिस्थितीतून आपल्या उद्योग व्यवसायाचे होडके पुढे रेटणार्‍यांच्या आणि काही तरी कर्तृत्व दाखवू पाहणार्‍यांच्या मार्गामध्ये विनाकारण अडथळे पेरले जाणार नाहीत याची तरी किमान खबरदारी घेतली पाहिजे. परंतु सरकारी यंत्रणांचा आणि त्यातील भ्रष्ट प्रवृत्तींचा एकंदरित पवित्रा हा असहकार्याचाच असतो. एकेकाळी देशात ‘परमिट राज’ने उच्छाद मांडला होता, तो आज नाही, परंतु उद्योजकतेला अनुकूल वातावरण देशात खरोखरीच आहे का हा सवाल सिद्धार्थ यांच्या मृत्यूच्या या घटनेने उपस्थित केलेला आहे आणि त्याचे उत्तर राज्यकर्त्यांनी शोधणे आवश्यक आहे. उद्योजक व्यावसायिकांसाठीही सिद्धार्थ यांची आत्महत्या हा मोठा धडा आहे. संकटात खंबीर राहायचे असेल तर ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीनुसार त्यांनी वागणेही तितकेच आवश्यक आहे!