पी. चिदंबरम यांची जामीनावर मुक्तता

पी. चिदंबरम यांची जामीनावर मुक्तता

>> सर्वोच्च न्यायालयाने बाजूला सारला दिल्ली उच्च न्यायालयाचा निवाडा

तिहार तुरूंगात तीन महिन्यांहून अधिक काळ घालविल्यानंतर अखेर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना काल सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मिडिया प्रकरणी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रियांच्या औपचारीक पूर्ततेनंतर रात्री उशिरा चिदंबरम यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. पुत्र तथा खासदार कार्ती चिदंबरम, त्यांचे समर्थक व कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी त्यांचे तुरुंगाबाहेर जोरदार स्वागत केले.

न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर करताना अंमलबजावणी संचालनालयाचा दावा मान्य करता येणार नाही असे स्पष्ट केले. चिदंबरम हे सत्ताधार्‍यांच्या बाजूने नाहीत किंवा त्यांच्याकडे कोणते सरकारी पदही नसल्याने ते पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे. हा अंमलबजावणी संचालनालयाचा दावा मान्य करता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

वरीलप्रकरणी ७४ वर्षीय पी. चिदंबरम १०६ दिवस कोठडीत राहिले. जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना अटी घातल्या आहेत. चिदंबरम यांनी या खटल्याप्रकरणी जाहीर वक्तव्य करू नये, तसेच प्रसार माध्यमांना मुलाखत देऊ नये या अटींचा त्यात समावेश आहे. इडीच्या आवश्यकतेनुसार चौकशीसाठी उपस्थित राहण्याचीही अट त्याना घातली आहे.

न्यायालयातील सुनावणी दरम्यान इडीच्या वकिलांनी सांगितले की एक साक्षीदार हा चिदंबरम यांच्याच राज्यातील असल्याने त्याने चिदंबरम यांच्यासमोर येण्यास तयार नसल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने सांगितले की या गोष्टीस चिदंबरम यांना जबाबदार धरता येणार नाही. कारण त्या साक्षीदाराला चिदंबर यांनी किंवा त्यांच्यातर्फे कोणी धमकी दिल्याचा कोणताही पुरावा नाही.

गेल्या दि. १५ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावणारा आदेश दिला होता. तो आदेश न्या. आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रद्दबातल ठरवित चिदंबरम यांना जामीन मंजूर केला. न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. ऋषिकेश रॉय यांचाही या खंडपीठावर समावेश आहे.
या खंडपीठाने चिदंबरम यांना पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करू नये, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये किंवा न्यायालयाच्या आदेशाविना देशाबाहेर जाऊ नये अशा अटीही घातल्या आहेत. २ लाख रु.चा जात मुचलका व दोन हमीदार दिल्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात यावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मोकळी हवा मिळाल्याचा आनंद
तुरुंगातून बाहेर येताच पी. चिदंबरम पत्रकारांना सामोरे जाताना म्हणले, ‘१०६ दिवसानंतर मोकळ्या हवेत श्‍वास घेताना खूप आनंद झाला. माझ्यावर एकही आरोप लागू झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी यावर अधिक बोलणार नाही.’

तुरुंगाबाहेर जल्लोषी स्वागत
पी. चिदंबरम यांची तुरुंगातून सुटका होण्याआधीपासूनच तिहार तुरुंगाबाहेर त्यांचे पुत्र कार्ती यांच्यासह त्यांचे समर्थक, युवा कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तेथील वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना कार्ती चिदंबरम यांनी सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका वड्रा यांनी सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल आभार मानले.

सूड भावनेने ठेवले तुरुंगात ः राहुल
पी. चिदंबरम यांना सूड भावनेने १०६ दिवस तुरुंगात ठेवले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आता सोडल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

राज्यसभेत उपस्थित राहणार
पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून चिदंबरम राज्यसभा अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ वकील असलेल्या नलिनी यांनी चिदंबरम यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. चिदंबरम यांचे पुत्र तथा लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.