पियुष गोयल जय शहांचे सीए आहेत काय? ः सिन्हा

भ्रष्टाराचाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’च्या बाता मारणार्‍या भाजपने अमित शहापुत्र जय शहा यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे नैतिकता गमावली असल्याचे वक्तव्य करीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी या वादात उडी घेतली आहे. जय शहांच्या कंपनीच्या भरभराटीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे वृत्त द वायर या डिजिटल वृत्त माध्यमाने केल्यानंतर या माध्यमावर अब्रुनुकसानीचा दावा गुदरण्याच्या कृतीवरही सिन्हा यांनी टीका केली. तसेच या वृत्तानंतर जय शहा यांची पाठराखण करण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर धावल्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.

जय शहांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणारे पियुष गोयल हे काय जय शहांचे चार्टर्ड अकौंटंट (सीए) आहेत काय असा सवाल सिन्हा यांनी केला. या प्रकरणाची सरकारने पूर्ण चौकशी करायला हवी असे ते म्हणाले. तसेच देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची नियुक्ती जय शहा यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मान्यता ही बाबही अयोग्य आहे. याआधी असे कधी घडले नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले.