पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार

>> कॉंग्रेस विधीमंडळाची व्यूहरचना

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची मंत्र्यांकडून योग्य ती उत्तरे मिळावीत यासाठी कॉंग्रेस पक्ष सतर्क राहणार असून पक्षाचे सर्व आमदार मिळून सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
भाजप नेतृत्वाखालील आघाडी सरकार कॉंग्रेस पक्ष विधानसभेत विचारीत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे न देता वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबू लागले आहे. मात्र, या वेळी विधानसभा अधिवेशनात आम्ही त्यांना तसे करण्यास संधी देणार नसल्याचे कवळेकर यांनी सांगितले. बंद पडलेल्या खाणींच्या प्रश्‍नासह अन्य प्रश्‍नांवर सरकार योग्य उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले.