पावसाच्या पूर्वतयारीची लगबग

  • अंजली आमोणकर

निसर्ग – पशुपक्षी – मानव हे सगळेच पर्जन्यऋतुला सामोरं जाण्याकरता आपापल्या तर्‍हेने पूर्वतयारी करत असतात. ही तयारी जरी वेगवेगळ्या स्वरूपाची भासली – दिसली तरी अंतस्थ हेतु समान असतो व तो म्हणजे हा ऋतू जास्तीत जास्त सुसह्य करण्याचा. शेवटी या सर्व तयार्‍यांना निसर्ग धुडकावून लावत काय कहर करायचा तो करतोच.

पांगारा, पळस, गुलमोहर आपल्या लालचुटुक फुलांच्या बहराने सर्वांना पाऊस तीन-चार आठवड्यांवर आल्याची वर्दी देतात. बहाव्याचे सोनपिवळे, लांबोडके घोस त्या वर्दीला आनंदाने अनुमोदन देतात. अंडी घेऊन पळणार्‍या मुंग्या, झाडावर घरटे बांधणारा कावळा, पावसाची पूर्वतयारी करू लागतात.

शहरात दोन दिवसांची ‘पुरुमेंताची’ फेरी लागली व मन खडबडून जागं झालं. इतके दिवस घामाच्या चिकचिकाटात, उकाड्याच्या फुफाट्यात, उन्हाळ्याला फक्त भलं-बुरं म्हणत, हुश्य हुश्य करण्यात लक्षातंच आलं नव्हतं – ‘पावसाळा दाराशी येऊन ठेपलाय’ म्हणून!!

मध्येमध्येच ह्या वादळा, त्या वादळापायी बरसून गेलेल्या धारांनी, गावागावांतून मातीचा गंध दरवळला होताच. पावसाची पूर्वतयारी करण्यात जो तो आपल्या परीने गुंतला होता. बरसलेल्या काही धारांमुळे, मऊ झालेल्या मातीवर नांगर धरण्यात शेतकरी मग्न होते. टिटवी बाई शेतांच्या बंधार्‍यांवरून ‘पेरते व्हा – पेरते व्हा’चा संदेश देत होतीच. अनेक ठिकाणी उभी असलेली छोटी छोटी मिठागरं – पूर्ण उंचीला यायची वाट बघताना दिसत होती. सुट्‌ट्या संपायला जेमतेम आठवडा उरला व बाजारात रेनकोट-छत्र्यांची धूम उडाली. शालेय वस्तूंच्या आवकीत, पावसाळ्याचे खास चपला-बूट-गमबूट वगैरे हातपाय ताणून जागा अडवायला लागले. घरे शाकारली जाऊ लागली. प्लॅस्टीकची आवरणं, आडोसे जिथे तिथे घातले गेलेले नजरेस पडू लागले. आता मच्छीमारीचा सिझन बंद होणार म्हणून घरांत ‘सुकी-खारी’ मासळी डब्यांमध्ये भरली गेली. महानगरपालिकाही आळोखे पिळोखे देत उठली. गावागावांतल्या पंचायतींना – शहरातल्या महानगरपालिकांना सरकारी आदेश सुटले. अति वाढलेल्या, धोकादायक झाडांची छाटणी, गटारे नाल्यांची सफाई, खड्यांची बुजवणी सुरू झाली. गळणार्‍या घरांच्या दुरुस्त्या होताना सर्वत्र दिसू लागल्या, आणि या सर्वावर पुरुमेताच्या – साठवणीच्या – फेरीनं शिक्कामोर्तब करून टाकलं. वर्षभराकरता लागणारी कडधान्य, आमसुलं, चिंच, सुकी-खारी, लोणची-पापड, सांडगे वगैरेची यथेच्छ खरेदी या फेरीत झाली.

तसे पहायला गेले तर सर्वच पशुपक्षी, झाडे कमी-अधिक फरकाने पावसाची आससून वाट बघत पूर्वतयारीला लागतात. पांगारा, पळस, गुलमोहर आपल्या लालचुटुक फुलांच्या बहराने सर्वांना पाऊस तीन-चार आठवड्यांवर आल्याची वर्दी देतात. बहाव्याचे सोनपिवळे, लांबोडके घोस त्या वर्दीला आनंदाने अनुमोदन देतात. अंडी घेऊन पळणार्‍या मुंग्या, झाडावर घरटे बांधणारा कावळा, पावसाची पूर्वतयारी करू लागतात. उन्हाळ्यात स्थलांतरण करून आलेले पक्षी, घरी परतताना दिसू लागतात.
वैद्यक शास्त्रावर प्रगाढ विश्‍वास असणारे, स्वतःची तब्येत नीटपणे जपणारे पावसाची पूर्वतयारी म्हणून पंचकर्म – विरेचन वगैरे करून आधीच मोकळे होतात तर सरकारी व खाजगी स्वास्थ्य संस्था व हॉस्पिटले पावसाळ्यात होणार्‍या निरनिराळ्या रोगांच्या लसींचे उपलब्धीकरण सुरू करतात.

पावसाळ्यात येतो चातुर्मास. हिंदू धर्माचे ऐंशी टक्के सण, या चातुर्मासातच येतात. श्रावणातले उपास-तापास, ही खरे तर शरीर शुद्धीकरणाची पावसाळ्याला तोंड देण्याचीच तयारी असते. गणपती-मूर्ती तयार करणार्‍या लोकांची पूर्वतयारी हळुहळू सुरू झालेलीच असते. पावसाळ्यात घराबाहेर पडणे कठीण म्हणूनच सर्व व्रतं-वैकल्यं-सण-उत्सवांच्या दिवशी घरीच भजन-कीर्तन-आरत्या ह्यांचा दणका उडवून देतात.

पावसाळ्यात त्रास नको म्हणून सरकारी, निमसरकारी संस्था नाटके, भजनं, खेळ यांच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा उरकून घेतात. पावसाळ्याला तोंड देण्याचीच पूर्वतयारी असते ती!! अगदी ऑलिम्पिकपासून ही दक्षता घेतलेली दिसून येते खरी!!
सुट्‌ट्यांचे निमित्त करून सर्व प्रवास, ट्रेकिंग, लग्नकार्य, महोत्सव, संम्मेलनं ह्यांना उन्हाळ्यात उरकून टाकलं जातं!!
या सर्वांत भारतीय रेल्वे कशी मागे राहील? साचलेल्या – तुंबलेल्या पाण्यामुळे, संततधारेमुळे व पुरांमुळे वाहून जाणार्‍या रुळांची, कोसळणार्‍या दरडींची काळजी आधीपासूनच घेतली जाते. मैलोमैल लांब असणार्‍या डोंगरांना, चक्क जाळीचे नेट बसवले गेलेले आपण पाहतोच. समांतर किंवा बदली गाड्यांची व्यवस्था, कचरा सफाई वगैरे कामं जोरदार तयारीने होताना दिसतात.
निसर्ग – पशुपक्षी – मानव हे सगळेच पर्जन्यऋतुला सामोरं जाण्याकरता आपापल्या तर्‍हेने पूर्वतयारी करत असतात. ही तयारी जरी वेगवेगळ्या स्वरूपाची भासली – दिसली तरी अंतस्थ हेतु समान असतो व तो म्हणजे हा ऋतू जास्तीत जास्त सुसह्य करण्याचा. शेवटी या सर्व तयार्‍यांना निसर्ग धुडकावून लावत काय कहर करायचा तो करतोच. पण म्हणून दरवर्षी ‘नेमेचि’ येणार्‍या या पावसाळ्याला भिऊन कोणी पूर्वतयारी करायचा राहात नाही.
पावसाळ्याच्या सिझनला जशी जशी पूर्वतयारी करावी लागते तशी इतर कोणत्याही सिझनला करावी लागत नाही हे मात्र खरे.