पावसाचे पाणी खाण खंदकांमध्ये साठवणार

>> लवकरच कायद्यात दुरुस्ती : मुख्यमंत्री

राज्यातील खाण खंदकांचा पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वापर करण्यासाठी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नद्यांवर लोकांच्या सहकार्यातून नवीन बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मुख्यमंत्र्यांनी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांच्यासमवेत जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील सध्याच्या पाण्याच्या एकंदर परिस्थितीची आढावा घेतला. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, राज्यातील साळावली व इतर धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. साळावली धरणामध्ये ४४ दिवस पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. तसेच अंजुणे धरणामध्ये १९ दिवस, आमठणे धरणात १२५ दिवस, पंचवाडी धरणामध्ये १३ दिवस आणि चापोली धरणामध्ये ४० दिवस पुरले एवढा पाण्याचा साठा आहे. राज्यात एकूण ९ ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पुरविण्यात येत आहे. दरदिवशी ६५१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरण केलेले साधारण ३० ते ४० टक्के पाणी विविध माध्यमातून वाया जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गांजे येथून ३० एमएलडी आणि चार खाण खंदकातून दररोज १०० एमएलडी पाणी खेचून खांडेपार नदीत सोडण्यात येत आहे. आणखीन चार ते पाच खाण खंदकांतील पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पाणी खेचणे बंद केले जाणार आहे. राज्यात तूर्त पाण्याची समस्या नाही. आगामी काळात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील खाण खंदकांचा पाणी साठवून ठेवण्यासाठी वापर करण्याचा विचार सुरू असून त्यासाठी कायद्यात योग्य दुरुस्ती करण्याची गरज आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवून योग्य निर्णय घेण्याची विनंती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.