पाळेमुळे उखडा

मेरशीत मुंबईच्या पर्यटकांवर स्थानिक गुंडांनी सशस्त्र हल्ला चढविण्याची परवाची घटना सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्याला अशा प्रकारची गुंडगिरी परवडणारी तर नाहीच, शिवाय अशा प्रकारे दिवसाढवळ्या तलवारी आणि चॉपरनी हल्ला करण्याची हिंमत पणजीपासून हाकेच्या अंतरावरील गावात गुंडांना होते ही बाब राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. हा नुसता मारामारीचा प्रकार असता तर त्याकडे अपवादात्मक घटना म्हणून दुर्लक्ष करता आले असते, परंतु तलवारी, चॉपर, कोयते यांचा वापर हल्लेखोरांनी केला. दिवसाढवळ्या अशा प्रकारे सशस्त्र हल्ला चढवणार्‍या या गुंडांची हिंमत तरी बघा! त्यामुळे गृह खात्याने राज्यात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज प्रकर्षाने भासते आहे. हा हल्ला म्हणजे केवळ पर्यटक आणि स्थानिक यांच्यातील बाचाबाचीचे पर्यवसान होेते असे म्हणून त्याकडे डोळेझाक केली जाऊ नये. गोव्यात लोकसंख्येहून जवळजवळ दुप्पट प्रमाणात पर्यटक येतात. त्यामध्ये कौटुंबिक पर्यटक असतात, तसेच सडाफटिंगही बाई – बाटलीच्या मोहाने येतात. अशा मद्यपि पर्यटकांच्या गटांशी स्थानिकांचे वाद होण्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत, परंतु कौटुंबिक पर्यटनासाठी आलेल्या सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकांशी अत्यंत किरकोळ कारणावरून भांडण उकरून काढून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. शांतताप्रिय गोव्याची त्यामुळे देशभरात नाचक्की झाली आहे. गोव्यातील काही गावे गुंडगिरीसाठी कुख्यात आहेत, त्यातील मेरशी हे एक. मेरशी, सांताक्रुझ, ताळगाव, कालापूरचे नामचिन गुंड पूर्वीपासून कुख्यात होते. त्यांची आपसातील टोळीयुद्धे अनेकदा गाजली आहेत. मध्यंतरी ‘प्रोटेक्टर्स’ च्या नावाखाली खंडणीखोरी आणि गुंडगिरीने जोर धरला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री रवी नाईक यांनी अत्यंत खमकेपणाने त्या गुंडगिरीचा कणाच मोडून काढला होता. तशी धमक अन्य कोणत्याही नेत्याला आजवर दाखवता आलेली नाही, उलट या गुंडपुंडांना असलेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजाश्रयच अशा प्रकारची गुंडगिरी फोफावण्यास कारणीभूत ठरत असतो. अशा गुंडांचे काही म्होरके तर लोकप्रतिनिधीही बनले. त्यामुळे पोलिसांनी एखाद्या गुंडाला पकडले तर आपल्या ‘कार्यकर्त्या’ ला सोडवण्यासाठी राजकारण्यांचा फोन जाणे ही गोव्यात आम बात बनलेली आहे. गुन्हेगारी फोफावते ती यामुळेच. मध्यंतरी कोलवाळ तुरुंगात अश्पाक बेंगरे या गुंडाची दुसर्‍या गुंडाने हत्या केली. सडा उपकारागृहात चाळीस – पन्नास गुंडांनी हैदोस घालून प्रचंड नासधूस केली. गोव्यात हळूहळू अंडरवर्ल्ड मूळ धरू लागलेले नाही ना असा प्रश्न अशा घटनांमुळे निर्माण होतो. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायला जाणारा पर्यटक सर्वांत प्रथम आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करीत असतो. काश्मीरमध्ये यंदा पर्यटन अर्ध्याने कमी झाले, कारण ते राज्य सुरक्षित नाही. गोव्यात पर्यटकांवर हल्ल्यांचे प्रकार अधूनमधून होत असतात. मेरशीची घटना ही अधिक गंभीर स्वरूपाची आहे, कारण त्यात प्राणघातक शस्त्रांचा वापर झाला. एखाद्या सराईत गुंडांच्या टोळीने करावा तशा प्रकारचा हा हल्ला आहे. अशा सराईत गुन्हेगारांसाठी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना जबाबदार धरले गेले तरच हे प्रकार थांबतील. आता या आणि अशा प्रकारच्या इतर टोळ्यांची पाळेमुळे खणून काढून सर्वांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी सरकारची आहे. गोवा हा शांततामय प्रदेश ही गोव्याची ओळख आपल्याला पुसून टाकायची नसेल तर अशा प्रकारची गुन्हेगारी डोके वर काढत असतानाच तिची पाळेमुळे उखडण्याची हिंमत सरकारने दाखवायला हवी.