ब्रेकिंग न्यूज़

पाया सांभाळा

राज्याच्या राजकारणातील विद्यमान घडामोडींनी नवे शिखर गाठलेले दिसते आहे. काल दिल्लीमध्ये भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेल्या सरकारमधील दोन्ही सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी नेतृत्वबदलाच्या विषयावर परस्पर विसंगत भूमिका मांडल्याचे दिसून आले. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पक्षनेतृत्व गोव्याच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे सूतोवाच केले, तर पर्रीकरांचे नेतृत्व बदलू नये आणि बदलायचीच वेळ येईल तेव्हा ज्येष्ठतेचा विचार व्हावा असा आग्रह मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी धरला. नेतृत्वबदल हा विषय खरे तर भाजपाचा अंतर्गत विषय जरी असला तरी हे सरकार सहयोगी पक्षांच्या टेकूवर अवलंबून असल्याने त्यांचे म्हणणे ऐकणे भाजपाध्यक्षांना भाग आहे. दोन्ही सहयोगी पक्षांमध्येच एकवाक्यता नसल्याने निर्णयाबाबत पेच निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच खुद्द प्रदेश भारतीय जनता पक्षामध्ये संघ परंपरेतून आलेले जुने-जाणते नेते आणि नव्या राजकीय संस्कृतीचे नव्याने पक्षात आलेले प्रतिनिधी यांच्यातील सुप्त संघर्षाने आता उघड रूप घेतले आहे. फ्रान्सिस डिसोझांच्या दबलेल्या सुराच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तर जाहीरपणे तोफा डागल्या. दोघांच्या तक्रारींमध्ये समानता आहे ती म्हणजे आपल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही वा शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाही देण्यात आली नाही हे त्यांचे म्हणणे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान कार्यपद्धतीकडे अंगुलीनिर्देश करणारी ही तक्रार आहे. आज पक्षाला आपल्या अनुभवी नेत्यांपेक्षा सत्तेची जास्त फिकीर दिसते. त्यामुळे सत्तेच्या दृष्टीने जे जे उपयोगी ठरतील, त्यांनाच पक्षामध्ये वाढते महत्त्व मिळू लागलेले दिसते आहे. याचे सर्वांत लक्षणीय उदाहरण म्हणजे विश्वजित राणे. राणेंना पक्षात येऊन जेमते वर्ष – दीड वर्षच उलटलेले असले, तरीही कॉंग्रेसचे आमदार फोडून त्या पक्षाला कमकुवत करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे सध्या पक्षात मानाचे स्थान प्राप्त झालेले दिसते. विश्वजित राणेंच्या या वेगवान उड्डाणांमुळे रक्ताचे पाणी करून गोव्यात भाजपा वाढवलेल्या संघपरंपरेतील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजीचे ढग दाटू लागलेले दिसत आहेत. नेतृत्वबदलाच्या विषयावरून हा असंतोष आता हळूहळू उसळी मारू लागलेला आहे. पर्रीकर यांनी आजवर गोव्यातील भाजपावर आपले प्रबळ वर्चस्व ठेवले. त्यांच्यापुढे ब्र काढण्याची इतरांची प्राज्ञा नव्हती. त्यामुळे कितीही मतभेद आणि मनभेद जरी झाले, तरी मुकाट्याने ‘हो’ ला ‘हो’ मिळवून अपमान गिळले जायचे. आता पर्रीकर हे आजारी असल्याने पक्षापासून दूर गेल्याने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवू शकेल असे नेतृत्व पक्षापाशी नाही. त्यामुळेच आजवर अधूनमधून प्रकटणारे दबलेले सूर आता हळूहळू मोकळे होऊ लागले आहेत. श्री. पर्रीकर यांची प्रकृती आता सुधारू लागल्याचे चित्र पुढे आणले जाते आहे. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक घेतल्याचेही सांगितले गेले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक घेण्यामागे अर्थातच राज्यात रोजगारसंधींची निर्मिती करण्याची आत्यंतिक निकड कारणीभूत आहे. रोजगार, सरकारी नोकरभरती, खाण यासारखे प्रश्न राज्यापुढे ‘आ’ वासून उभे आहेत आणि त्यांना चालना द्यायची असेल तर सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. निर्नायकी स्थितीत राज्याला किती पुढे रेटायचे यालाही काही मर्यादा आहे. मात्र, लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्याने तोवर गाडे असेच पुढे रेटले जाताना दिसते आहे. यदाकदाचित मुख्यमंत्रिपदासाठी पर्याय शोधण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले, तर आपले घोडे पुढे दामटण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यासाठी पक्षनेतृत्वावर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी जो तो धडपडतो आहे. यात आघाडी घेतली आहे ती अर्थात विश्वजित यांनी. कॉंग्रेसमुक्त भारताच्या ध्यासाने पछाडलेल्या भारतीय जनता पक्षासाठी असे मोहरे फायद्याचे ठरत असल्याने अशा मंडळींना पक्षात सुगीचे दिवस आले आहेत. परंतु त्यांना पक्षामध्ये सर्वस्वीकारार्हता लाभणार का याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. वरून लादले गेलेेले नेते कधी खाली रुजत नसतात हा इतिहास आहे. त्यामुळे जे कॉंग्रेसमध्ये पूर्वी घडायचे त्याच वाटेने भाजपा जाणार आहे का याचा विचार व्हायला हवा. पर्रीकर यांची जागा घेण्याची स्वप्ने पाहणार्‍यांनी आधी तशी स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. पक्षामध्ये स्वीकारार्हता निर्माण करावी लागेल. ‘कानामागून आला आणि तिखट झाला’ असे होऊ नये. भाजपाने गोव्यात शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे, परंतु त्याच्या आजच्या शिखराखाली जे पायाचे दगड होेते, त्यांनाच दूर सारले गेले तर मंदिर स्थिर उभे राहू शकणार नाही. त्यामुळे हा पाया सांभाळण्यासाठी आपल्या सत्तालालसेला आणि विस्तारवादाला थोडा लगाम घातला गेला तर ते पक्षाच्या हिताचे ठरेल. पक्षामध्ये नवी सत्तासंस्कृती रुजलेली नाही. जुन्या मूल्यांना बासनात गुंडाळलेे जात नाही याची ग्वाही पक्षनेतृत्वाने द्यायला हवी. पक्षाची प्रतिमा डागाळत तर नाही ना, हे पाहण्याची वेळ आली आहे!