ब्रेकिंग न्यूज़
पाण्यासाठी सलग सहाव्या दिवशी दाहीदिशा

पाण्यासाठी सलग सहाव्या दिवशी दाहीदिशा

>> डेडलाइन वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप

केरये – खांडेपार येथे फुटलेल्या ९०० मिमी मुख्य जलवाहिनीची सहाव्या दिवशी दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यश प्राप्त झाले नाही. परिणामी राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्याने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी बुधवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणी पुरवठ्याची डेडलाइन वाढल्याने त्रस्त नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील अनेक भागातील नागरिकांचे सलग सहाव्या दिवशी पाण्याअभावी अतोनात हाल झाले. टँकरद्वारे होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांची नाराजी आहे. टँकरच्या माध्यमातून होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. टँकरचे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भरपूर त्रास सहन करावे लागत आहेत. विविध भागात राहणार्‍या लोकांचा अंदाज घेऊन त्या त्या प्रमाणात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करायला हवा होता. जास्त लोकवस्ती असलेल्या भागात टँकरद्वारे कमी पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सोसावे लागत आहेत. टँकरच्या माध्यमातून होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे पाण्यासाठी लोकांमध्ये भांडणेसुध्दा होत आहेत.

केरये – खांडेपार येथील जलवाहिन्या फुटण्यापूर्वी पणजीसह तिसवाडी तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. जलवाहिनी फुटून पाण्याची टंचाई झाल्यानंतर पावसानेही दडी मारली आहे. पाऊस पडला असता तर नागरिकांना पावसाचे पाणी मिळू शकले असते.

व्हीआयपींना पाण्याचे टँकर
राजधानी पणजी आणि परिसरातील नागरिकांना पदरमोड करून टँकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी नोंदणी करून सुध्दा काही नागरिकांना टँकरचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून केवळ वरिष्ठ सरकारी अधिकारी, निवडक लोकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याची तक्रार आहे.

सरकारचे आश्‍वासन हवेत विरले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी मंगळवारी दुपारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्याला सुरुवात करून मंगळवारी संध्याकाळी पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. तथापि, निर्धारित वेळेत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारचे आश्‍वासन हवेत विरले आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाची मंगळवारी सकाळी पाहणी केली असून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेऊन पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. राजधानी पणजीसह आसपासच्या भागात बुधवारी नळाचे पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दुसर्‍या फुटलेल्या ७५० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला आणखीन चार ते पाच दिवस लागणार आहेत. दुसर्‍या जलवाहिनीची दुरुस्ती न झाल्याने कुंभारजुवा, माशेल या भागातील नागरिकांना नळाच्या पाण्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या भागात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला जाणार आहे. तसेच नळाद्वारे पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था झाल्यास नळाद्वारे पाणी पुरविले जाईल, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

काही भागात आज पाणीपुरवठा : पाऊसकर
गेले सहा दिवस बंद असलेला तिसवाडी आणि ङ्गोंड्यातील काही भागाचा पाणीपुरवठा आज (बुधवारी) सकाळी सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल सकाळी युद्धपातळीवर सुरू असलेल्या जलवाहिनी जोडण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

केरये – खांडेपार येथील जलवाहिनी ङ्गुटल्यानंतर तिसवाडी व ङ्गोंड्यातील काही भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येणार असून भविष्यात टँकरवर विसंबून राहावे लागणार नाही, असे मंत्री पाऊसकर म्हणाले.

केरये – खांडेपार येथील जलवाहिनी ङ्गुटल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची धावपळ झाली. चौपदरी रस्ताकाम करणार्‍या एमव्हीआर या कंत्राटदार कंपनीने सध्या जलवाहिनी जोडणीचे काम सुरू केले असून जोड घालण्यासाठी वेळ लागत आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने कामात व्यत्यय येत आहे.

पणजीसाठी वेगळ्या पर्यायावर विचार
राजधानी पणजी आणि तिसवाडी तालुक्याला ओपाहून पाणीपुरवठा करण्यात येतो. जलवाहिन्या ङ्गुटल्यामुळे हा पुरवठा ठप्प झाल्याने लोकांचे पाण्यावाचून मोठे हाल झाले आहेत. यापुढे केवळ ओपावर विसंबून न राहता साळावली तसेच पर्वरीहून पणजीला पाणीपुरवठा करता येतो की, नाही याचा विचार करण्यात येईल. भविष्यात पणजीवासीयांना पाणी टंचाईसाठी भटकावे लागू नये, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री पाऊसकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
कॉंग्रेसची मागणी
गेले सहा दिवस म्हणजेच सुमारे आठवडाभर तिसवाडी व फोंडा तालुक्यातील जनतेवर पाण्याविना दिवस सारण्याची पाळी आलेली असून राज्य सरकारचे हे मोठे अपयश आहे, असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

दोन तालुक्यांना तब्बल सहा दिवस पाणीपुरवठा नाही हा एक मोठा विक्रम आहे व तो प्रमोद सावंत यांच्या सरकारने केलेला आहे. यापूर्वी राज्याच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते, असे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारपासून पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, मंगळवारपर्यंतही त्यांना तो सुरू करण्यास यश आलेले नाही. बुधवारपर्यंत तरी तो सुरू होईल की काय, याबद्दल शंकाच असल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठा सुरू करता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन खुर्ची रिकामी करावी, असा खोचक सल्ला चोडणकर यांनी यावेळी दिला.