पाटो- पणजी येथील ‘स्पेसिस’ इमारत सील

पाटो-पणजी येथील ‘स्पेसिस’ इमारतीत असलेल्या न्यायालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्यानंतर काल एकच धावपळ उडाली. नंतर संपूर्ण इमारतच सील करण्याचा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला.

सदर कर्मचारी हा गेल्या आठवडाभर रजेवर होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने काल तातडीने संपूर्ण इमारतच बंद करण्यात आली. जे-जे कोण वरील कर्मचार्‍याच्या संपर्कात आले होते त्या सर्वांना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केवळ तातडीची प्रकरणेच पणजीत घेतली जाणार आहेत तर इतर प्रकरणे म्हापसा न्यायालयाच्या इमारतीत घेतली जाणार आहेत, असे कळविण्यात आले आहे.

मांगूर हिलशी संबंधित नवे ३० रुग्ण
मांगूर हिलमध्ये नवीन १६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, मांगूर हिलशी संबंधित नवीन १४ रुग्ण आढळले आहेत. तसेच सडा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ४३ वर पोहोचली आहे. वास्को परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४४७ एवढी झाली आहे.