पाक संघात फवाद आलम परतला

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला २० सदस्यीय संघ जाहीर केला असून या संघात फलंदाज फवाद आलम याला स्थान देण्यात आले आहे. ‘अंतिम ११’मध्ये संधी मिळाल्यास तो तब्बल ११ वर्षांनंतर पाकिस्तानकडून कसोटी खेळेल.

मुख्य प्रशिक्षक व निवड समिती प्रमुख मिसबाह उल हक यांनी इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, फखर झमान व हैदर अली यांना स्थान दिलेले नाही. फवाद याने २००९ साली न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू फहीम अश्रफ व गुगली गोलंदाजीसह तळातील उपयुक्त फलंदाज असलेला शादाब खान यांच्याव्यतिरिक्त डावखुरा संथगती गोलंदाज काशिफ भट्टी व लेगस्पिनर यासिर शाह यांना स्थान दिले आहे. नियमित यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान याच्यासह माजी कर्णधार व यष्टिरक्षक सर्फराज अहमद यालादेखील वीस खेळाडूंत स्थान मिळाले आहे. मालिकेला ५ ऑगस्टपासून मँचेस्टर येथे सुरुवात होणार आहे.

पाकिस्तान कसोटी संघ ःअझर अली, बाबर आझम, आबिद अली, असद शफिक, फहीम अश्रफ, फवाद आलम, इमाम उल हक, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सर्फराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाझ व यासिर शाह.