पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव

>> भारतीय जवानांची करडी नजर : लेफ्ट जनरल ढिल्लॉं

भारत सरकारने घटनेतील ३७० कलम रद्द केल्याच्या दिवसापासून पाकस्थित दहशतवादी प्रत्येक रात्री भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी एकत्र होत आहेत अशी माहिती श्रीनगर येथील १५ कॉर्पस्‌चे लेफ्ट. जनरल के. जे. एस ढिल्लॉं यांनी काल वृत्त संस्थांना दिली. मात्र अजूनही सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही असे ते म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) दहशतवादी तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची जमावाजमव चालल्याच्या हालचाली आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरीचे त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न आहेत. मात्र त्याचा शोध घेऊन त्यांचे प्रयत्न उधळण्यात आमचे जवान यशस्वी ठरत असल्याचे ढिल्लॉं म्हणाले. सीमेपलीकडील हालचालींवर आम्ही करडी नजर ठेवून आहोत असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरात स्थिती सर्वसामान्य
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील स्थिती सध्या सर्वसामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. लोक मोकळेपणे फिरत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली झाली आहेत. इस्पितळेही नेहमीप्रमाणे नागरिकांना सेवा देत आहेत. खाजगी व सार्वजनिक वाहनांचीही वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे ईद उत्सव उत्साहात साजरा केला जाईल यात शंका नाही असे ढिल्लॉं यांनी सांगितले.

अजित डोवालांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीरात तळ ठोकून असून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ते घेत आहेत.