पाकपेक्षा इंग्लंड अधिक सुरक्षित ः होल्डिंग

वेस्ट इंडीजचे माजी जलदगती गोलंदाज व प्रसिद्ध समालोचक मायकल होल्डिंग यांनी पाकिस्तानी संघ मायदेशापेक्षा इंग्लंडमध्ये अधिक सुरक्षित असेल, असे विधान काल बुधवारी केले.

पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. दुसरीकडे इंग्लंडने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बर्‍यापैकी यश प्राप्त केले असून पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंनी इंग्लंडमध्ये सुरक्षेची चिंता करू नये, असे होल्डिंग म्हणाले. इंग्लंड दौर्‍यावर येण्यास सज्ज झालेले पाकिस्तानचे २९ पैकी १० खेळाडू मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होेते. परंतु, यानंतरही हा दौरा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे दोन्ही मंडळांनी सांगितले आहे.

‘मायकी- होल्डिंग नथिंग बॅक’ या यूट्यूबवरील कार्यक्रमात बोलताना होल्डिंग पुढे म्हणाले की, इंग्लंडमध्ये पाकिस्तानी खेळाडू जैवसुरक्षित वातावरणात असतील. सध्या इंग्लंडमध्ये खेळाडूंना सराव करताना सहा फूट अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून पाकिस्तानचा दौरा सुरू होताच हे अंतर तीन फूटांपर्यत किंवा एक मीटरपर्यंत कमी करण्यात येईल, असा विश्‍वास होल्डिंग यांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होताच त्यांचा दोन आठवड्यांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल. यानंतर त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जैवसुरक्षित वातावरणात हलवण्यात येईल. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नसेल, असे स्वतः क्वॉरंटाईन असलेल्या होल्डिंग यांनी सांगितले. पाकिस्तानला इंग्लंडमध्ये येण्यास मनाई करायची असेल तर याचा हक्क इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळ व येथील नागरिकांनाच आहे, असे होल्डिंग पुढे म्हणाले. विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये येऊन काही दिवस लोटले आहेत. त्यांना अजूनपर्यंत कोणत्याच समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानलासुद्धा इंग्लंडमध्ये कोरोनाचा धोका नसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.