पाकच्या अंतरीम पंतप्रधानपदी शाहीद अब्बासींची निवड

नवाज शरीफ यांच्या गच्छंतीनंतर पाकिस्तानचे अंतरीम पंतप्रधान म्हणून काल शाहीद खाकन अब्बासी यांची निवड करण्यात आली. अब्बासी यांचा हा कार्यकाळ फक्त ४५ दिवसांचा असेल. त्यांनी पीपल्स पार्टीच्या नवीद कसर यांचा पराभव केला.
या निवडीसाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी काल कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचे सत्र बोलावले होते. यावेळी खासदारांनी शरीफ यांच्या जागी अंतरीम पंतप्रधान अब्बासी यांची निवड केली. या पदावर त्यांचीच निवड होईल, अशी शक्यता होती.
नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग – नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने शरीफ यांचे बंधू शाहबाज पाकच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्यास पात्र होईपर्यंत अब्बासी यांना अंतरीम पंतप्रधान म्हणून मान्यता दिली.
पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षांकडून एक सर्वमान्य उमेदवार निश्‍चित होत नव्हता. त्यामुळे पाचजण विरोधात होते. इम्रान खान यांच्या तेहरीचे इन्साफ पार्टीने अवामी मुस्लिम लिगचे रशीद यांचे नाव पुढे केले होते. ३४२ सदस्यीय पाक नॅशनल असेंब्लीत पीएमएल-एन पक्षाचे १८८ सदस्य आहेत. पाक सुप्रिम कोर्टने पनामा प्रकरणी नवाज शरीफ यांना दोषी ठरवल्याने त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते.