पांघल, कृष्णनची खेलरत्नसाठी शिफारस

भारतीय बॉक्सिंग महासंघाने सोमवारी विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांघल व अनुभवी विकास कृष्णन यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते त्रिकुट लवलिना बोर्गोहोईन (६९ किलो), सिमरनजीत कौर (६४ किलो) व मनीष कौशिक (६३ किलो) यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
महिला संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक मोहम्मद अली कमार व साहाय्यक प्रशिक्षक छोटेलाल यादव यांची शिफारस द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी ‘बीएफआय’ने केली आहे. सहावेळची विश्‍वविजेती मेरीकोम हिला मार्गदर्शन केलेल्यांमध्ये यादव यांचा समावेश आहे.

ध्यानचंद पुरस्कारासाठी (जीवनगौरव) बीएफआयने २००८ सालची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदक जिंकलेल्या उषा नागिशेट्टी यांचे नाव पुढे केले आहे. मिलान येथे २००९ साली झालेल्या पुरुषांच्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आमंत्रित केलेल्या खेळाडूंत नागिशेट्टी या एकमेव महिला होत्या. भारतातील महिला बॉक्सिंगला नवी उभारी देण्यात नागिशेट्टी यांचे मोठे योगदान आहे.

२०१३ ते २०१७ या कालावधीत त्यांनी अनेक महिला बॉक्सिंगपटूंना घडविले आहे. पांघल याला अजूनपर्यंत एकही राष्ट्रीय पुरस्कार लाभलेला नाही. मागील तीन वर्षांपासून त्याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जात होती. परंतु, २०१२ साली अजाणतेपणामुळे डोपिंग प्रकरणात सापडल्याने पुरस्कार देणार्‍या समितीेने त्याच्या नावाचा विचार केला नाही. दुसरीकडे कृष्णन याला २०१२ साली अर्जुन पुरस्कार लाभला होता. खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ आहे.

खेलरत्न पुरस्कार हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे दिला जातो. ७.५ लाख रुपये व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्याला ५ लाख रुपये मिळतात. मागील वर्षी पॅरा ऍथलिट दीपा मलिक व कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना खेलरत्न पुरस्कार लाभला होता. मेरीकोम, विजेंदर या बॉक्सिंगपटूंना यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.