ब्रेकिंग न्यूज़

पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

– संदीप मणेरीकर

‘आणि आता प्रख्यात लेखक आणि साहित्यिक बाळासाहेब यांच्या ‘परिसस्पर्श’ ह्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी करावे अशी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते.’ निवेदिकेने माईकवरून सांगितलं आणि लगेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपापले सदरे, कुर्ते, जाकीट, पैठणी, शालू सांभाळत उभे राहिले. समोर फोटोग्राफर्स फ्लॅश पाडण्यासाठी सज्ज झाले. उपस्थित श्रोते, बाळासाहेबांचे फॅन म्हणवणारे अनेकजण आपापले मोबाईल कॅमेरे घेऊन समोर येऊ सज्ज झाले. रिबिन काढण्यात आली. मान्यवरांनी पुस्तकं हातात घेऊन एकमेकांजवळ सुपूर्द केली. पुस्तकाचं कव्हर बघून झालं आणि ते समोरच्या लोकांसाठी प्रकाशन केलं हे दाखवण्यासाठी हातात घेऊन पोज देऊन उभे राहिले.

फटाफट फ्लॅश पडले. बाळासाहेबांना धन्य वाटलं. मान्यवरांना प्रश्‍न पडलेला होता की पहिलंच पुस्तक असून हे साहित्यिक प्रख्यात कसे झाले? एका मान्यवराने हळूच निवेदिकेला जवळ बोलावून प्रश्‍न विचारला असता, निवेदिकेने नकारात्मक मान हलवून खांदे उडवले व हे सारं निवेदन त्यांनीच लिहून दिल्याचं सांगितलं.
यानंतर पुस्तकाविषयी मान्यवरांची भाषणं झाली.

देवधर चाळीत रहाणार्‍या बाळासाहेब यांचे चाळीतील सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. याचं कारण बाळासाहेब हे चाळीतील सर्वात सहनशील व्यक्तिमत्त्व होतं. सटर फटर काहीतरी लिहून त्यांनी लेखनाची सुरूवात केली होती. चाळीतील दीपावली, गुढीपाडवा, गणेशोत्सव यासाठी नेहमी छोट्या छोट्या नाट्यछटा लिहून बाळासाहेब आज एका पुस्तकाचे धनी झाले.

‘अभिनंदन बाळासाहेब…. तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन काय शानदार झालं हो..’ देशपांडे हसत हसत बाळासाहेबांच्या खोलीत घुसले.
‘या या… बसा.’ एक खुर्ची पुढे सरकवत बाळासाहेबांनी त्यांना बसण्यास दिली.
‘खरंच मस्त कार्यक्रम झाला. आपल्या चाळीतील एक लेखक म्हणून नावारुपास आलेले तुम्हीच. पुढील काळात चाळीत तुमचा एक फोटो लागला पाहिजे बरं का..’ टाळीसाठी हात पुढे करत देशपांडे ओरडलेच.
बाळासाहेब लाजले. मात्र त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. असेल नसेल त्या ताकदीने देशपांडेंनी बाळासाहेबांना टाळी दिली आणि हेलपाटत गेलेल्या बाळासाहेबांना बाहेरून येणार्‍या गोरेनी सावरले.

‘अहो, बाळासाहेब, पहिल्याच पुस्तकाची इतकी नशा बरी नव्हे..’ आपल्याच विनोदावर हसत देशपांडेंकडे वळत गोरेंनी टाळीसाठी हात पुढे केला मात्र त्याच वेगाने त्यांनी तो पुन्हा मागेही आणला. देशपांडेंची टाळी देण्याची पद्धत चाळीत प्रख्यात होती. त्यामुळे त्यांना टाळी देण्याच्या भानगडीत कोणीच पडत नव्हते.
‘पण आज पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम अप्रतिम झाला. त्यात निवेदिका तर गोडच होती नाही का बाळासाहेब…’ गोरेंचं हे वैशिष्ट्य होतं. विषयापेक्षा इतर गोष्टीतील सौंदर्यस्थळं शोधत ती इतरांना सांगत फिरणे.
‘बाळासाहेबांची कधीपासून मी वाट बघत होतो.’ गोरेंच्या ह्या वाक्यावर देशपांडेनी, ‘त्या निवेदिकेची माहिती विचारायला का’ असा प्रश्‍न विचारला आणि गडगडाटी हसत टाळीसाठी बाळासाहेबांकडे वळले आणि त्याचवेळी बाळासाहेब गोरेंना बसण्यासाठी टेबल शोधण्यासाठी वळले.

‘बाळासाहेब, आज आख्खी चाळ येणार आहे तुमच्या घरी…’ देशपांडे उद्गारले.
‘कशासाठी?’ चिंतातूर होत सौ. बाळासाहेबांनी बाहेर येत विचारलं.
‘अहो, तुमच्या ह्यांनी आज दुसरा पराक्रम केलाय ना? पहिला पराक्रम लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी गाजवला होता. त्यावेळी ते अगदी तरुण होते. त्याच्यापेक्षा तुम्ही… पण आता कुठे आहेत तुमचे चिरंजीव?’ गोरेंनी जीभ चालवली.
‘तो हॉलवरून आलाच नाहीये अजून..’ बाळासाहेबांनी सांगितलं.
‘पण त्या पराक्रमाच्यावेळी काही चाळीत एवढी माणसं नव्हती हो. पण आज तुमच्या ह्यांचा पराक्रम बघून चाळीतल्या प्रत्येक पोराटोराचीही छाती अभिमानानं फुगून आली आहे.’ देशपांडेंनी आपली छाती ५६ इंचांची करून दाखवली.
‘आता नुसत्याच शौर्यगाथा गायच्या की त्याच्यासोबत काही…?’ बाहेरून भोसले आले व येतायेताच त्यांनी आपल्या आवडीचा डायलॉग मारला.
‘हो हो देते…’ असे म्हणत सौ. बाळासाहेब आत गेल्या आणि बाळासाहेब बसण्याची सोय बघू लागले.

सुमारे तासभरात अख्खी चाळ बाळासाहेबांच्या घरात घुसली. अभिनंदनासाठी हात देऊन देऊन खांदा हलू लागला होता. सौ. बाळासाहेब या चाळकर्‍यांची सरबराई करून करून थकून गेल्या होत्या. चहा पाणी, फरसाण, शेव, चिवडा, यांचा खच पडला. पण हे चाळकरी किमान एकेक पुस्तक घेतील असा विचार बाळासाहेबांनी मनात केला.

अखेर देशपांडेंनी ‘बाळासाहेब, तुमच्या ह्या पुस्तकातील दोन कथा आम्हांला वाचून दाखवा पाहू…’ अशी ऑर्डर सोडली. आणि ‘वहिनी ह्या कथा वाचून झाल्या की पुन्हा एकेक कप चहा होऊन जाऊ द्या हो..’ असं सांगून गोरेंकडे टाळी मागितली. सावध गोरेंनी हात पुढे केलाच नाही. पण चहासाठी पाठिंबा दर्शवला.

बाळासाहेब पुस्तक घेऊन उभे राहिले. पहिलीच कथा ‘दगड’ त्यांनी वाचली. देशपांडेंनी आपल्या गडगंज आवाजात बाळासाहेबांचं कौतुक केलं. त्यानंतर दुसरी कथा वाचण्याचा आग्रह केला. दुसरी ‘झाड’ ही कथा वाचल्यावर गोरेंनी डोळ्यांना रुमाल लावला तर देशपांडेंनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांचं सांत्वन केलं. पुन्हा एकदा चहा झाला आणि ‘बाळासाहेब तुमच्या कथा मला तरी खूप आवडल्या. उद्या संध्याकाळी पुन्हा सर्व चाळकरी येतील तेव्हा उद्या आणखी दोन कथा वाचा.’ अशी ऑर्डर देऊन दोन मिनिटांच्या आत बाळासाहेबांची खोली रिकामी केली.
त्यानंतर बाळासाहेबांचे चिरंजीव आले. त्यांनी व सौ. बाळासाहेबांनी खोलीतील पसारा आवरला. हाश्श हुश्श करत एकदाची सर्वांनी पाठ जमिनीला टेकवली. बाळासाहेब लेखकाच्या राज्यात भरारी मारत होते तर सौ. बाळासाहेब यावेळी उद्याही असाच चहापाण्याचं धुमशान असेल की काय या विचारात चिंतातूर झाल्या होत्या.
दुसर्‍या दिवशी संध्याकाळ झाली. पाच सव्वापाच झाले आणि देशपांडेंचा आवाज घुमला, ‘बाळासाहेब… आज पुढच्या दोन कथा…’ मागोमाग गोरे, भोसले, दामले, सावंत, वगैरे चाळकरी जमा झाले आणि बाळासाहेबांनी आपल्या पुढच्या दोन कथा वाचण्यास घेतल्या. नेहमीप्रमाणे त्याही कथांना चाळकर्‍यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपली पसंती दर्शवली. पुन्हा चहा-पाणी झालं. ‘उद्या पुन्हा उर्वरित तीन कथा वाचा. त्या ऐकण्यासाठी चाळ येईल’ असं बजावून देशपांडे आणि कंपनी तीन मिनिटात निघून गेली आणि त्यानंतर सुमारे तीस मिनिटे बाळासाहेबांच्या घरातून केवळ हाश्श-हुश्श यांचेच आवाज निनादत होते.

तिसर्‍या दिवशी अखेर उवरित तीन कथा बाळासाहेबांनी वाचून काढल्या. सर्व पुस्तक चाळकर्‍यांसमोर वाचून झाल्यानंतर चहा पाणी झालं.
‘तुमच्या एकंदरित नऊही कथा ऐकल्यानंतर त्याही तुमच्या तोंडून म्हणजे प्रत्यक्ष लेखकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद काही वेगळाच होता. पुलंनी असाच एक कार्यक्रम राबवला होता. त्यात ते स्वतःच स्वतःच्या कथा वाचून दाखवत होते. आणि त्याला अफाट कीर्ती मिळाली होती.’ देशपांडेंच वाक्य मध्येच तोडत गोरे म्हणाले, ‘पुलंप्रमाणेच वपुंनीही प्रयोग केले होते असेच….’
‘हो.. हो.. दमा मिरासदारांनी तर उच्चांक गाठला होता. पण तशाच प्रकारचा आनंद आम्हां चाळकर्‍यांना पुन्हा एकदा बाळासाहेबांनी दिलेला आहे. ‘परिसस्पर्श’ ह्या नावाप्रमाणेच ह्या चाळीला बाळासाहेबांसारख्या लेखकाचा परिसस्पर्श झालेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आमचंही सोनं करून टाकलेलं आहे. त्यांनाही अगदी सोन्यासारखं आयुष्य लाभावं आणि त्यांनी जास्तीत जास्त लेखन करावं अशी मी ईश्‍वराकडे प्रार्थना करतो.’ आणि देशपांडेंनी आपला उपदेश थांबवला.

‘बाळासाहेबांनी यापेक्षाही अधिक सुरस आणि रंजनात्मक, जरा हटके म्हणजे तारुण्याच्या आठवणी पुन्हा जागृत करणार्‍या प्रेमकथा लिहाव्यात, मसाला वगैरे टाकून आणि त्यांचंही असंच पुस्तक प्रकाशित करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रकाशनानंतर बाळासाहेबांनी असंच आपल्या पुस्तकाचं वाचन चाळकर्‍यांसाठी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.’ गोरेंनी आपले रंग दाखवले.

‘हो वाचन करावं पण तेही आपल्याच घरात आणि अशाच किंवा ह्यापेक्षाही अधिक कडक..चहा-पाण्यासह…’ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ हसत भोसलेंनी पुडी सोडली.
बाळासाहेबांना सर्वांनी हात दिला. (चाळकर्‍यांनी हात दाखवला) आणि सर्व चाळकरी तीन मिनिटांच्या आत निघून गेले. लगेच बाळासाहेबांच्या खोलीतून हुश्शऽऽहुश्श आवाज सुरू झाला तेव्हा बाळासाहेब आज तरी आपली पुस्तकं खपतील म्हणून कोपर्‍यात उघडून ठेवलेल्या पुस्तकांच्या खोक्याकडे शून्य नजरेनं पहात होते.