पहिल्यांदाच खासदार बनलेल्या अभिनेत्री नुसरत जहॉं तुर्कस्तानात विवाहबद्ध

तृणमूल कॉंग्रेसतर्फे लोकसभा खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अभिनेत्री नुसरत जहॉं या कोलकातास्थित उद्योजक निखिल जैन यांच्याशी तुर्कस्तान देशात नुकत्याच विवाहबद्ध झाल्या. विवाह सोहळ्याच्या तयारीत असल्यामुळेच खासदारपदाची शपथ नुसरत घेऊ शकलेल्या नाहीत.

प. बंगालमधील बसिरहाट लोकसभा मतदारसंघातून नुसरत जहॉं निवडून आल्या आहेत. त्यांनी स्वतःहून आपल्या विवाह सोहळ्याचे पती निखिल जैन यांच्यासह असलेले एक छायाचित्र सोशल मिडियावर टाकले असून त्याखाली निखिल जैन यांच्यासोबत ‘आनंदी क्षणांसह’ अशी ओळ टाकली आहे.

नुसरत यांनी या सोहळ्यावेळी पारंपरीक लाल लेहेंगा आणि वर निखिल जैन गुलाबी शेरवानीत अशी ही नवपरिणीत जोडी छायाचित्रात दिसत आहे. तुर्कस्तानमधील बोडरूम या शहरात झालेल्या या विवाह सोहळ्याला नुसरत जहॉं व निखिल जैन यांची निकटची मित्रमंडळी व कुटुंबिय उपस्थित होते.

अभिनेत्री असलेल्या नुसरत जहॉं आणि त्यांची मैत्रीण अभिनेत्री मिमि चक्रवर्ती यांनी यंदा राजकारणात उडी घेत अनुक्रमे बसिरहाट व जादवपूर या लोकसभा मतदारसंघांमधून विजय संपादन केला आहे. त्या दोघींही प्रचंड बहुमतासह निवडून आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतील खासदारांच्या शपथविधीला उभय नवनिर्वाचित खासदार विवाहसोहळ्याच्या धामधुमीमुळे उपस्थित राहू शकलेल्या नाहीत.