ब्रेकिंग न्यूज़

पर्वरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

>> दोन दलालांना अटक, ४ मुलींची सुटका

पर्वरी पोलिसांनी गुरुवारी रात्री सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना दोन दलालांना अटक केली तर तिसरा संशयित पोलिसांच्या तावडीतून सुटला. मोनू विजय पालसिंग (३२, नवी दिल्ली) व शिवकुमार भगवती प्रसाद (३०, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे असून जीवन ऊर्फ सौरभ मेहरा (नवी दिल्ली) हा फरार आहे. या कारवाईवेळी संशयितांच्या ताब्यातील ४ मुलींची पोलिसांनी सुटका केली.

विश्‍वसनीय सूत्रांकडून पोलिसांना संशयित गुरुवारी (दि. २२) रोजी रात्री वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक विश्‍वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पर्वरीतील एका हॉटेलजवळ दबा धरून बसले. रात्री ९.५० च्या सुमारास संशयित चार मुलींना घेऊन गिर्‍हाइकांना पुरविण्यास आले. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. मात्र, तिसरा संशयित पोलिसांच्या तावडीतून सुटला.

अटक करण्यात आलेले संशयित त्यांनी सोबत आणलेल्या चार मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होते. त्यांनी चारही मुलींना ग्राहकांना पुरविण्यासाठी पर्वरीतील एका हॉटेलनजीक आणले होते. मात्र, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तावडीत ते सापडल्याने या रॅकेटचा भांडाफोड झाला. पोलिसांनी संशयितांवर भा. दं. सं. ३७०, ३७०(अ) (२)३४ आणि ४, ५ व ७ या कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे.