ब्रेकिंग न्यूज़

पर्रीकरांच्या मिरामारवरील समाधी उभारणीची कोनशीला डिसेंबरमध्ये

>> १० कोटी रु. ची अर्थसंकल्पात तरतूद

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आगळे-वेगळे असे समाधी स्थळ मिरामार येथे ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे आकार घेणार असून त्याची कोनशीला पर्रीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येत्या १३ डिसेंबर रोजी बसवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

सुमारे १० कोटी रु. खर्चून हे समाधी स्थळ उभारण्यात येणार असून पर्रीकर यांचे संपूर्ण जीवन व कार्य याची माहिती देणारे एक दालनही या समाधी स्थळावर असेल. त्यात पर्रीकर यांचे बालपण व पुढे ते राष्ट्रीय नेते म्हणून कसे उदयास आले याविषयीची इत्यंभूत माहिती असेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. या समाधी स्थळाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद चिराग जैन (यूसीजे कंपनी) यांची काल निवड झाल्याची माहिती सावंत यांनी दिली.

या समाधी स्थळाची रचना कशी असावी यासाठी आम्ही वास्तुशिल्प तज्ज्ञांकडून प्रस्ताव मागितले होते. त्यासाठी पाच जणांनी आपले प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी चार जणांनी काल पर्वरी येथे मंत्रालयात उच्चस्तरीय समितीपुढे आपले प्रस्ताव ठेवले असता चिराग जैन यांच्या प्रस्तावाची निवड झाल्याने समाधी स्थळासाठीचे सल्लागार म्हणून त्यांनी नियुक्ती करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. १३ डिसेंबर रोजी कोनशीला बसवल्यानंतर पुढील सहा महिन्यांत हे समाधी स्थळ उभे राहणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. या समाधी स्थळासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. समाधी स्थळासाठी सरकारने अर्थसंकल्पात १० कोटी रु. ची तरतूद केलेली आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली.

भाऊंच्या समाधी स्थळालाही नवा साज
दरम्यान, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर (भाऊसाहेब) यांच्या समाधीलाही यानिमित्त नवा साज चढवण्यात येणार आहे. ही समाधी बांधण्यात आली त्याला कित्येक वर्षे झाली आहेत. त्यामुळे या समाधीचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले. भाऊंच्या स्मृतींनाही त्यामुळे उजाळा मिळू शकणार असल्याचे सावंत यावेळी म्हणाले.