पर्रीकरांचा निरोप घेताना…

पर्रीकरांचा निरोप घेताना…

– नीना नाईक, पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पणजीच्या सर्व कार्यकर्त्यांना महालक्ष्मी ट्रस्टमध्ये ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता भेटतील, असा साधा एसएमएस आला. शंकेची पाल चुकचुकली. इतके दिवस येणार्‍या बातम्या अफवा नव्हत्या, त्यात तथ्य होते. पर्रीकर केंद्रात जाणार यात वाद नव्हता. फक्त क्षण महत्त्वाचा होता निरोपाचा. पणजीच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गोव्याचा आधारस्तंभ, कार्यकर्त्यांचा कणा विशेष कामगिरीसाठी ‘राष्ट्र’ प्रथम म्हणत दिल्लीला रवाना होणार. काही तासांचा अवधी! कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोनाफोनी चालू केली.महालक्ष्मी ट्रस्टकडे पाचच्या सुमारास कार्यकर्त्यांची पावले पडू लागली. उत्साह नावाची चीज मागे पडली होती. बैठकांना कार्यकर्ते येत तेव्हाचा जोश, गडबड, कुजबूज यातील काही नव्हते. आजचे वातावरण खूपच वेगळे होते. निरव शांतता म्हणावी की स्मशानशांतता म्हणावी हे कळत नव्हते. निरोपाचा क्षण इतका भयानक असू शकतो, याची प्रचीती पहिल्यांदा कार्यकर्त्यांकडून आली. कुणीच कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याची हिंमत करीत नव्हते. खळ्‌कन अश्रू केव्हा गालावर पडतील याची भीती सर्वत्र कार्यकर्त्यांना होती. काठोकाठ भरलेले डोळे, पडलेला चेहरा, हसण्याचा आव सर्वच आणत होते. पण दुःखी हसणे शेवटच्या पंक्तीत होते. हरवल्यागत कार्यकर्ते एकमेकांना पाहत होते.
शब्दांतून भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांचा सूर एकच होता. आमचे छत्र हरपले. अनाथ झालो, आम्हाला वाली कोण? ‘‘आमका भाईन फटयले……. भाई, भाई, भाई….’’ चा आक्रोश मनात खदखदत होता. काहींना तो सहन झाला नाही. आता आम्ही त्यांना फक्त टी.व्ही.वरच पाहणार. एक ना दोन हजार प्रश्‍न.
ते आले. शांततेला तडा गेला नाही. त्यांची मानसिकता त्यांना ठाऊक. आपण शनिवार, रविवार भेटत जाऊ. गोव्याला पोकळ आश्‍वासन देऊन त्यांनी त्यांचे दोन शब्द थांबवले. मोबाईल वाजत होता. हे एका अर्थी बरेच झाले. कदाचिता त्यामुळे कार्यकर्त्यांचे गहिवरलेले चेहरे पाहायला सवड मिळाली नाही. किंबहुना त्यांनी ते टाळले. भावनांचा बांध जो गच्च बांधून ठेवला होता, तो तर सुटणार नाही ना याची त्यांनाही भीती होती. कितीही झाले तरी गोव्याच्या मातीने घडवलेला, वाढवलेला पुढारी जरी असला तरी त्यांच्यावर माया करणारे कार्यकर्ते यांच्यापुढे आपला तोल ढासळू देणार नाहीत याची खूणगाठ बांधून ते आले होते. अश्रुंना वाट करून देणे सोपे असते. पण या क्षणी त्या भावनांना थोपवणे, धीराने सामोरे जाणे हे महत्‌प्रयासाचे काम. हेही त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
कार्यकर्त्यांचा आवेश वेगळा होता. सहज, सोपेपणाने काही म्हणून गेले,‘भाई, तुम्ही जाऊ नका. गोव्याला तुमची गरज आहे.’
‘इथे असताना आम्ही तुमच्या प्रकृतीला सांभाळत होतो. तुम्ही तिथे नवीन आहात. प्रकृतीला सांभाळा. देव तुमचा सांभाळ करो.’’
किती विश्‍वास कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर. आम्ही राष्ट्रासाठी तुम्हाला तिथे पाठवतो. तुम्ही स्वतःला सांभाळा. एकमेकांना धीर देता देता अश्रूंचा पूर वाहत होता. सांभाळणे, धीर देणे कुठेतरी फोल ठरत होते. नेहमीप्रमाणे पेक्षा असे म्हणेन की जास्त जलद गतीने ते गाडीत जाऊन बसले. गाडीपर्यंत पोहोचवायला गर्दी केली कार्यकर्त्यांनी. रामायणातले गाणे गुणगुणावेसे वाटले. थाब सुमंता…’’
जड अंतःकरणाने रेंगाळत रेंगाळत सर्व पांगायला लागले. चर्चा चालू होती. जो तो आपण राजकारणात कसे पडलो तो मथितार्थ काढला तर जो तो एकच बोलत होता की आम्ही राजकारणात आलो तेच मुळी पर्रीकरांमुळे. सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्ती राजकारणात उतरली आहे. राज्यात भले होईल, पाठिंबा दर्शविता दर्शविता इतकी वर्षे झर्रकन निघून गेली. त्यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, पुन्हा मुख्यमंत्री हा सर्व प्रवास पाहिला. कित्येक चढउतार पाहिले. गोव्याला बरेच काही दिले या व्यक्तीने. त्याची उजळणी शहाण्याने मनातल्या मनात करावी.
काही स्वतःला बुद्धिवंत म्हणणार्‍यांनी खिल्ली उडवली पर्रीकरांची. कबिरांनी म्हटले आहे,‘हाथी चलत हैं अपनी गत मे कुतर भुकत वा को भुकवा दे| तु तो राम् सुयर जग लढवा दे|
सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे जमलेले कार्यकर्ते त्यांनी काय कमावले? त्यांचा फायदा काय? त्यांना काय हवे होते. पणजीतले कार्यकर्ते फार फार वेगळे आहेत. पर्रीकरांच्या नेतृत्वावर त्यांचा अगाध विश्‍वास हाच त्यांचा आधार. कित्येक वर्षांपासूनचे. जुने जुने कार्यकर्ते, त्यात काही नवीन चेहर्‍यांची भर ही जमेची बाजू. त्यांच्या बर्‍या वाईटाला सतत सावलीसारखे हेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मायेच्या ओलाव्याची पावती डोळ्यांच्या कपारीतून झिरपताना निसटू शकत नाही.
ठणठणीत केलेल्या तिजोरीत परत लक्ष्मी भरायचे काम याच मुख्यमंत्र्यांनी केले. काय काय भोगले नाही यांनी. विविध प्रश्‍नांच्या भडीमारातून अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे पुढे येऊन उतरवलेले पेट्रोल दर असोत, खाणींचे प्रश्‍न असोत, गोव्यातील जनतेला झळ पोहोचू दिली नाही.
जगभर त्यांची वाहवा झाली. नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेतली. शाबासकीच्या रूपाने अथवा या व्यक्तीच्या कामाचा उरक पाहून हीच व्यक्ती संरक्षणाचे कार्य करू शकते असा विश्‍वास पंतप्रधानांनी दाखवला. यामुळे गोव्यातील प्रत्येकाची मान ताठ राहिली. कार्यकर्त्यांत कभी खुशी, कभी गम अशी परिस्थिती आहे. इतकेच वाटते, आज आम्ही कन्यादान करतोय राष्ट्रासाठी. सर्व कार्यकर्त्यांकडून आपणास हार्दिक शुभेच्छा! आपला प्रवास उन्नतीकडे जाणारा सुखकर होवो.

Leave a Reply