पर्रीकरांकडून पणजीकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेली दोन दशके पणजीचे प्रतिनिधीत्व केले. परंतु त्यांनी पणजीकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॅसिनोंमुळे मांडवी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. राष्ट्रीय सागरी संशोधन संस्था व प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी नदीतील पाण्याची तपासणी करावी व त्यांच्या अहवालानुसार प्रदूषणास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
कॅसिनो कॉंग्रेसच्या काळातच गोव्यात आणल्याचे त्यांना सांगताच जबाबदार असलेल्या सर्वांवरच कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
पर्रीकर यांनी प्रत्येक बाबतीत पणजीकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मतदारांनी त्याच्या विरोधात मतदान करावे व तक्रारही नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणात संपूर्ण भगवेकरण करण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्र सरकार मसूदा तयार करीत आहे. भगवेकरण असलेले शिक्षण धोरण गोव्यात चालेल का असा प्रश्‍न करून या बाबतीत पर्रीकर यांनी केंद्राला काय सांगितले आहे, हे जनतेला कळले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पणजी हे राजधानी शहर आहे. झोपडपट्टीतील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने कोणतेही कार्यक्रम राबविलेले नाहीत. स्टार्टअपच्या बाबतीतही तीच स्थिती आहे, असे नाईक म्हणाले.